- संतोष वायंगणकर
हाराष्ट्रातील इतर प्रांतापेक्षा कोकण प्रांत सर्वार्थाने निराळा, वेगळाच आहे. दुर्दैवाने कोकणातील लोकांना त्यांच्या अतिचिकित्सक, समाधानी वृत्तीने आणि शेजाऱ्याच्या प्रगतीचे संशोधन करण्याच्या वृत्तीने ‘खेकड्या’च्या प्रवृत्तीत नेऊन बसविला गेला आहे. महाराष्ट्रातील राजकीय पुढाऱ्यांनी कोकणाला नेहमी सापत्न वागणूक दिली. याचे कारण स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्रात सत्तेवर नेहमीच पश्चिम महाराष्ट्राचे वर्चस्व आणि वरचष्मा राहिला. स्व. वसंतराव नाईक मुख्यमंत्री असतानाही महाराष्ट्राच्या सत्तेत प. महाराष्ट्राच अधिक राहिला. त्याचा सर्वाधिक फायदा प. महाराष्ट्राने घेतलेला आपणाला दिसेल. कोकणातील माणसं उत्साही, सण कोणताही असो त्याच्या आनंदाला पारावर असत नाही. गणेशोत्सव, शिमगोत्सव हे दोन कोकणातील मोठे सण आहेत. खिशात पैसे नसतानाही सणासुदीच्या दिवसांत झाले तरी कर्जाऊ पैसे घेतील. परंतु सणाचा आनंद कुटुंबाने साजरा करावा हा आग्रह असतो. म्हणूनच गणेशोत्सवात आणि शिमगोत्सवात अवघी मुंबई कोकणात असते. सणांची इथल्या ग्रामदेवतांची ओढ कोकणातील माणसांना अस्वस्थ करते. नोकरीला असलेले रजा मिळत नसेल तर बिनपगारी रजा घेतील; परंतु गाव गाठतील. इतर वेळी फुटभर जमिनीसाठी वाद घालणारे बोली-भाषण नसलं तरी आनंदाने आणि उत्साहाने सहभागी होताना दिसतात. रायगड, रत्नागिरीमध्ये शिमगोत्सव अमाप उत्साहात साजरा केला जातो. होळी खेळवणे हा जो काही प्रकार रत्नागिरी जिल्ह्यात आहे तो पाहताना आपणाला क्षणभर थांबायला होतं, देहभान हरपून उत्साहाने होळी, पालखी खेळवली जाते. रेवस ते रेडी हा किनारपट्टीचा भाग नव्हे तर संपूर्ण कोकणात सणांचं स्वरूप फार वेगळे असते. ग्रामदेवता त्यांच मानकऱ्यांचे मानपान हा सारा वेगळ्या लिखानाचा विषय आहे. ग्रामदेवता मंदिरातील मामांच्या बाबतीत कोणीही कसलीही तडजोड कोकणात करीत नाहीत. यामुळेच वर्षानुवर्षे कोकणातील ग्रामदेवतांच्या मानकऱ्यांचे वाद हे विशेषत: दसरा, होळी या उत्सवाच्या वेळी उफाळून आलेले असतात. वर्षानुवर्षे परंपरागत हे वाद जसे आहेत ते तसेच राहिले आहेत. अर्थात हे सारं सणासुदीच्या ‘देव कार्या’पुरतेच असतात. त्यानंतर सारे एकत्रच असतात. हीच तर कोकणातील जगण्याची गंमत आहे.
यावेळी कोकणातील जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका सहा महिन्यांसाठी पुढे गेल्या म्हणून नाहीतर या शिमगोत्सवात कोकणातील राजकारण अधिक रंगणार होते. कोकणात रशिया-युक्रेन युद्ध, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची भूमिका, युक्रेनने काय करायला हवे होते यावर चर्चा करणारी आणि युद्ध काळातही सल्लागारांची कोकणात कमी नाही. राजकारण हे फार इथल्या मातीत आणि माणसांमध्ये मुरलेलं आहे. दुर्दैवाने जो अमाप उत्साह सणांच्या बाबतीत कोकणात असतो, त्याच्या दहा टक्केचा उत्साह कोकणातील जनतेच्या मनात कधी विकासाच्या चर्चेचा विषय येत नाही. हे खरंतर दुर्दैवच म्हणावे लागेल. पंचवीस वर्षांपूर्वी पूर्णपणे मुंबईतील चाकरमान्यांवर अवलंबून असणारं कोकण आज बरचसं बदललं आहे. हाच सकारात्मक आणखीही बदल घडू शकेल; परंतु नकारात्मक आणि अतिचिकित्सक विचारांचा फार मोठा पगडा कोकणातील माणसांवर आहे. कोणत्याही विषयात प्रश्नांची मालिका आपल्या कोकणातील माणसांचा मनात तयार असतात. कान आणि मन यात अधिक कोणाच ऐकायला हवं तो शहाणपणा आजही आपल्यात येत नाही.
कानावर आढळणाऱ्या विचारांवर विश्वासून आपण चालतो यामुळे मनाने दिलेला योग्य निर्णयही आपल्याला चुकीचा वाटू लागतो. विकास आणि राजकारण यामध्येही आपण राजकारणापेक्षा विकासाला अधिक महत्त्व दिले पाहिजे. हे जेव्हा कधी कोकणाला समजेल जो सुदिन समजावा. कोकण एक दुसऱ्याचे पाय खेचण्यात मग्न असण्याचा फायदा नेहमीच उर्वरित महाराष्ट्रातील राजकीय नेते, पुढाऱ्यांनी उचलला आहे. याची आठवण झाली म्हणून सांगतो, सिंधुदुर्ग आणि लातूर जिल्ह्याची निर्मिती एकाच दिवशी झाली. परंतु लातूर जिल्ह्याचे मुख्यालय दोन वर्षांत उभे राहू शकले. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी सिंधुदुर्गच्या मुख्यालय विकासाचा निधीही लातूरकडे त्याकाळी वळविला. आम्ही मात्र मुख्यालयाचा वाद न्यायालयीन प्रक्रियेत घोळ घालत बसलो. यामध्ये तब्बल दहा वर्षे सिंधुदुर्ग मागे गेला. आपण नेमकं काय करतो आणि आपल्या करण्याने नेमकं काय होतं याचा कधीतरी आपण सर्वांनीच विचार केला पाहिजे. सण, उत्सवांचा आनंद आपण घेतलाच पाहिजे. उत्साहाने साजरे केलेच पाहिजेत; परंतु त्याबरोबरच भविष्यातील वाटचालीत विकासाला महत्त्व देण्याची खऱ्या अर्थाने आवश्यकता आहे. कोकणातील या शिमगोत्सवातही विकासाच्या आणि कोकणहिताच्या आड येणाऱ्या विचारांची होळी व्हावी. मग काय सारा आनंदी आनंदच !