चापोली (जि. लातूर) : चाकूर तालुक्यातील चापोली येथील शेतमजूर तातेराव किसनराव भालेराव यांचे मंगळवारी पहाटे हृदयविकाराने निधन झाले. त्यांचा मुलगा सूरज दहावीला आहे. मंगळवारपासूनच दहावीची परीक्षा सुरू झाली. घरात वडिलांचा मृतदेह असताना दहावीचा पेपर देण्याचा निर्णय मुलाने घेतला आणि मराठीचा पेपर दिलाही. यामुळे अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले.
चापोली येथील तातेराव किसनराव भालेराव (वय ४६) हे मागील काही महिन्यांपासून आजारी होते. त्यांच्यावर नियमित उपचारही सुरू होते. मंगळवारी पहाटे त्यांचे हृदयविकाराने निधन झाले. त्यांचा मुलगा सूरज यंदा दहावीला. त्यातच त्याची परीक्षाही आलेली. मंगळवारी त्याचा मराठीचा पेपर होता. त्याला नातेवाईकांनी परीक्षेला जाण्यासाठी तयार केले. त्याने परीक्षेहून आल्यानंतरच तातेराव भालेराव यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय नातेवाइकांनी घेतला. त्यामुळे सूरजने परीक्षा दिली. सकाळी ११ ते २ या वेळेत त्याने मराठीचा पेपर दिला. त्यानंतर वडिलांच्या अंत्यविधीला उपस्थित राहिला. वडिलांच्या पार्थिवाला भडाग्नी सूरजनेच दिला. तातेराव भालेराव यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी असा परिवार आहे.