ग्राहकांच्या हिताचे संरक्षण झाले पाहिजे : पियुष गोयल

नवी दिल्ली : ग्राहकांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी तसेच उच्च दर्जाची उत्पादने आणि सेवा यांच्या निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक आहे मात्र, छोटे व्यावसायिक आणि व्यापारी यांचा छळ करण्यासाठी या कायद्यांतील तरतुदीचा वापर होता कामा नये असे केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी स्पष्ट केले.


जागतिक ग्राहक अधिकार दिनानिमित्त “न्याय्य डिजिटल अर्थपुरवठा” या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या एक दिवसीय कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री गोयल यांनी छोट्या व्यापाऱ्यांची परिस्थिती विषद केली आणि ते म्हणाले: “कायद्याच्या नावाखाली छोटे व्यावसायिक आणि लहान व्यापाऱ्यांची होत असलेली छळवणूक थांबली पाहिजे.” उद्घाटनपर भाषणात त्यांनी कायदेशीर वजनमापे शास्त्र कायद्यातील काही तरतुदींना गुन्हा या वर्गवारीतून मुक्त करण्याची गरज असल्याचा मुद्दा त्यांनी मांडला.या संदर्भात समस्येवर संबंधित भागधारकांनी अधिक सविस्तर चर्चा करावी असे आवाहन त्यांनी केले. ग्राहकांचे हित तसेच अधिकार यांचे संरक्षण करण्यासाठी विविध संस्थांनी हाती घेतलेल्या उपक्रमांचे गोयल यांनी कौतुक केले.


दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींविरुद्ध ग्राहक व्यवहार मंत्रालयाने केलेल्या कारवाईच्या घटना केंद्रीय मंत्र्यांनी उपस्थितांशी सामायिक केल्या. ते म्हणाले की , जगातील पहिल्या क्रमांकाची टूथपेस्ट असल्याचा दावा जाहिरातींमधून करणाऱ्या टूथपेस्ट कंपनीवर कारवाई करण्यात आली. तसेच उत्पादनांचा साठा अगदी अल्प काळात संपूर्णपणे विकला गेल्याचा दावा करणाऱ्या दुसऱ्या एका कंपनीविरुद्ध देखील अशीच कारवाई करण्यात आली. ते पुढे म्हणाले, “जर तुम्हांला ग्राहकांच्या शक्तीचा अंदाज घ्यायचा असेल तर भारताकडे पहा आणि उच्च दर्जाच्या उत्पादनांची सक्रियतेने मागणी करणाऱ्या ग्राहकांनी भारतातील कंपन्यांना अधिक चांगल्या दर्जाच्या वस्तू उत्पादित करण्यास कसे प्रेरित केले आहे तेही लक्षात घ्या.”


गोयल यांनी भारतीय मानक ब्युरोने हाती घेतलेल्या दर्जा प्रमाणीकरणाच्या कामाबाबत देखील माहिती दिली. हॉलमार्किंगच्या सुविधेमुळे दर्जा, शुद्धता आणि पारदर्शकता यांच्या बाबतीत असलेल्या ग्राहकांच्या हक्कांची पूर्तता होत आहे याचा त्यांनी उल्लेख केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'सबका साथ, सबका विकास आणि सबका प्रयास' या मंत्राचे अनुकरण करत, सर्व राज्य सरकारे, उद्योग संस्था आणि संबंधितांना आवाहन केले की सचोटीपूर्ण व्यवसायांना संधी उपलब्ध करून देतानाच विद्यमान कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या आणि ग्राहकहिताच्या आड येणाऱ्या अनुचित व्यवसाय प्रथांवर कठोर कारवाई करण्यात यावी. ग्राहक संरक्षणाचे उद्दिष्ट असलेल्या सरकारच्या नवीन धोरणात्मक निर्णयांना उद्योगधंद्यांनी पाठिंबा देण्याचे गोयल यांनी अधोरेखित केले. व्यवसाय तसेच ग्राहक संरक्षणासाठी सर्वांगीण वातावरण तयार करण्यासाठी सरकारसोबत भरीव काम करण्याचे आवाहनही त्यांनी केले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नंदन नीलेकणी उपस्थित होते. बदलत्या डिजिटल प्लॅटफॉर्मसोबत बदलण्याची गरज आणि वाढत्या जटिल डिजिटल प्रोटोकॉलसोबत ग्राहक निवारण पद्धती त्याप्रमाणे सज्ज असण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित करत सरकारच्या सर्वांगीण दृष्टिकोनाची गरज व्यक्त केली.

Comments
Add Comment

आता 'ईव्हीएम' मतपत्रिकेवर उमेदवारांचे रंगीत फोटो; बिहारमधून सुरुवात

नवी दिल्ली: निवडणुकीदरम्यान मतदारांना स्पष्टता मिळावी आणि गोंधळ कमी व्हावा या उद्देशाने 'भारतीय निवडणूक

'राहुल गांधींनी काढली घुसखोर वाचवा यात्रा'

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त राजधानी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात

लिओनेल मेस्सीने पंतप्रधान मोदींना पाठवली वाढदिवसाची 'ही' खास भेट

नवी दिल्ली: आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशभर ७५ वा वाढदिवस साजरा होत आहे. वेगवेगळ्या

केरळमध्ये 'ब्रेन-इटिंग अमीबा'चा हाहाकार; १८ जणांचा बळी, ही लक्षणे दिसल्यास तातडीने व्हा सावधान!

नवी दिल्ली : केरळमध्ये पुन्हा एकदा 'ब्रेन-इटिंग अमीबा' (Brain-Eating Amoeba) चा धोका वाढला असून, या वर्षी या जीवघेण्या संसर्गाचे

पंतप्रधान मोदींनी वाढदिवसानिमित्त महिलांना दिली खास भेट; सुरु केले 'हे' नवे अभियान

धार: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातील धार येथे महिलांसाठी 'स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान'ची घोषणा

भारत धमक्यांना घाबरत नाही, घरात घुसून मारतो - पंतप्रधान मोदी

भोपाळ : “हा नवा भारत आहे, तो कोणत्याही अणुबॉम्बच्या धमक्यांपासून घाबरत नाही. हा नवा भारत घरात घुसून मारतो,” असे