मुंबई : दिशा सालीयान प्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि नितेश राणे यांच्या विरोधात मालवणी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी काही अटी आणि शर्तींवर राणे पिता पुत्रांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. दिंडोशी सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. यू. बघेले यांनी निर्णय दिला आहे.
दिशा सालीयन वर लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप राणे पिता-पुत्रांनी केला होता. त्यानंतर दिशा सालीयानच्या आई आणि वडिलांनी राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली होती. दिशा सालीयान सुशांतसिंह राजपूतची मॅनेजर होती. सुशांतच्या आत्महत्येपूर्वी तिने काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. यानंतर काँट्रोव्हर्सीला सुरुवात झाली. या प्रकरणात राणे पितापुत्रांची मालवणी पोलीस ठाण्यात तब्बल आठ तास चौकशी करण्यात आली होती.
त्यावेळी नारायण राणे यांनी अमित शाहांना फोन लावल्याचा दावा केला. या फोनमुळे त्यांना पोलिसांनी सोडले, असे राणे म्हणाले. त्यानंतर नितेश राणे यांनाही अटक होणार का, असा प्रश्न उपस्थित होत होता. अखेर केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांना कोर्टाने अटक पूर्व जामीन मंजूर केला आहे.