मुंबई : राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्याविरोधात माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. दरेकर बोगस मजूर असल्याचे दाखवत मुंबई बँक, हजारो ठेवीदार आणि सरकारची वर्षानुवर्षे फसवणूक करत असल्याचा आरोप आम आदमी पक्षाचे राज्य सचिव धनंजय शिंदे यांनी करत पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.
धनंजय शिंदे यांनी केलेल्या तक्रारीत असे म्हटलेय की, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे बोगस ‘मजूर’ असल्याचे व मुंबई बँक, हजारो ठेवीदार व सरकारची वर्षानुवर्षे फसवणूक करत आहेत. मुख्य म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात प्रवीण दरेकर हे बोगस मजूर असूनही मुंबई बँकेचा अध्यक्ष होते. २०१४-१५ ते २०१९- २० या काळात मुंबई बँकेत प्रवीण दरेकर व गँगने जवळपास २००० कोटींचा आर्थिक घोटाळा व नियम धाब्यावर बसवून काम केल्याचे सहकार विभागाच्या चौकशी अहवाल व चाचणी लेखापरीक्षण अहवालात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कोणाताही ‘पेन ड्राईव्ह बॉम्ब’ न देता आम्ही आपणास थेट हे अहवालच देण्यास तयार आहोत, असे त्यांनी देवेंद्र फडणवीसांना म्हटले आहे.
आम आदमी पक्षाने दोन महिन्यांपूर्वी मुंबई बँक, हजारो ठेवीदार व सहकार विभागाची ‘मजूर’ असल्याचे भासवून वर्षानुवर्षे फसवणूक करणारे आमदार व विरोधी पक्षनेता प्रवीण दरेकर यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. मात्र माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत होते. सहकार विभागाचे सह निबंधक बाजीराव शिंदे यांनी मजूर म्हणून प्रवीण दरेकर याना अपात्र घोषित केले. त्यानंतर त्यांचा जबाब ही पोलिसांनी नोंदवला तसेच सर्व कागदपत्रे सहकार विभागाने देऊनही पोलीस गुन्हा दाखल करत नव्हते. याबाबत आम आदमी पक्षाच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे गुन्हा दाखल व्हावा म्हणून सातत्याने पाठपुरावा केला. शेवटी आम्ही जनआंदोलन करण्याची तयारी सुरु केली तेव्हा आज दोन महिन्यांनी मुंबई बँकेच्या बोगस व बनावट मजुरावर गुन्हा दाखल झाला आहे, असे धनंजय शिंदे यांनी सांगितले.
प्रवीण दरेकर यांची ज्या ‘प्रतिज्ञा सहकारी मजूर संस्थे’त मजूर म्हणून नोंदणी आहे, तेथे कागदोपत्री दरेकर हे ‘रंगारी’ मजूर असल्याचे दिसते. भ्रष्टाचाराचा बराच रंग (चुना) त्यांनी गेले अनेक वर्ष मुंबई बँकेला लावला आहे. सहकार विभागाच्या अहवालानुसार प्रतिज्ञा मजूर संस्थेतील मजूर म्हणून नोंद असलेले जवळपास सर्व सदस्य हे बोगस मजूर आहेत. त्यामुळे सहकार विभागाने प्रतिज्ञा मजूर संस्थेचे पाच वर्षांचे लेखा परीक्षण करून मागील पाच वर्षात प्रवीण दरेकर या बोगस व श्रीमंत मजुराने नेमकी किती मजुरीची कामे केली व किती मजुरी यासाठी त्याना मिळाली याचा लेखाजोखा मांडावा, अशी आम आदमी पार्टीने मागणी केली आहे.
दरम्यान, जर आपणास पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या ना खाऊंगा ना खाने दुंगा, भ्रष्टाचार मुक्त भारत, ही भूमिका मनापासून मान्य असेल तर आपण प्रवीण दरेकर यांची तात्काळ पक्षातून हकालपट्टी कराल. अन्यथा पंतप्रधान मोदी यांची भूमिका आपणास मान्य नाही असे महाराष्ट्रातील जनता मानल्याशिवाय राहाणार नाही. आयात दरेकरांना भाजपने आतातरी नारळ द्यावा आणि ओरिजनल भाजपच्या चांगल्या आमदाराला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पद द्यावे, अशी मागणी धनंजय शिंदे यांनी केली आहे.