शिबानी जोशी
आज ग्राहक राजा त्यामानाने बराच जागरूक आहे. पण ४० वर्षांपूर्वी तेवढी जागरूकता नव्हती.तेव्हाची परिस्थिती पण वेगळी होती. वस्तंूचा कलाबाजारही होत असे आणि ग्राहकांचा विचार करणारा मंचही तितका समर्थ नव्हता. गुढीपाडवा हा पंचांगातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त! याच दिवशी १९७५ साली काही द्रष्ट्या विचारवंतांनी एकत्र येऊन अन्नधान्यांचा काळाबाजार, कृत्रिम टंचाई, ग्राहकांवर बाजारपेठेत होणारे अन्याय यातून मार्ग काढण्याचा उपाय म्हणून ग्राहकांना संघटित करण्याचा निश्चय केला आणि मुंबई ग्राहक पंचायतची स्थापना झाली. त्यासाठी ग्राहक कुटुंबांचे संघ बनवून त्यांना दैनंदिन गरजेच्या वस्तूंचे रास्त दरात मासिक वाटप करणे हे उत्तम साधन होऊ शकेल, असा विचार करून त्याची अंमलबजावणी दादरच्या वनिता समाजात श्रीफळाच्या वाटपाने त्यांनी या मुहूर्तावर केली. या मान्यवरांमध्ये बिंदुमाधव जोशी यांच्यासारखे कार्यकर्ते, एकेकाळी संघाचे कार्यकर्ते असलेले संगीतकार सुधीर फडके, पत्रकार पां. वा. गाडगीळ, नगरसेवक मधू मंत्री अशा अनेकांचा समावेश होता. मुळात अशा अभिनव वितरण व्यवस्थेची कल्पना पुण्यात बिंदुमाधव जोशी यांनी सुमारे एक वर्षापूर्वी अमलात आणलेली होती. स्वदेशनिष्ठा, स्वावलम्बन, श्रमप्रतिष्ठा, विश्वस्त भावना या ग्राहक चळवळीच्या तत्त्वांचे पालन पहिल्यापासून ग्राहक पंचायतीत केले जाते.
शक्यतो छोट्या उत्पादकांकडून व ते न जमल्यास घाऊक बाजारातून मालाच्या दर्जाशी तडजोड न करता खरेदी; कोठेही दुकान न काढता, सदस्यांकडून आगाऊ घेतलेल्या मागणीइतकीच खरेदी करून मालाचे वेळापत्रकानुसार नियमित वितरण; नफा घ्यायचा नाही पण तोटाही होऊ द्यायचा नाही; सुरुवातीला दरमहा १० वस्तूंचे वितरण करणारी संस्था आज ९५ ते १०० वस्तूंचे आणि वर्षाकाठी ४५० ते ५०० विविध वस्तूंचे वितरण करते. मुंबई, पुणे, वसई-विरार, पालघर, ठाणे, रायगड व रत्नागिरीपर्यंतचे सुमारे ३६००० ग्राहक या वितरण व्यवस्थेचा लाभ घेत आहेत. हा सर्व व्याप सांभाळण्यात विशेषतः वितरणासाठी करावयाच्या खरेदीत महिला कार्यकर्त्या आघाडीवर आहेत!
ग्राहकांना संघटित करण्याचे ते माध्यम असून ग्राहक, उत्पादक, व्यापारी या सर्वांचे हित साध्य करणारी सक्षम ग्राहक चळवळ बांधणे हे संस्थेचे ध्येय आहे. ते साध्य करण्यासाठी ग्राहक शिक्षण, ग्राहक संरक्षण, संघटन, संशोधन. विभाग विविध उपक्रम करीत असतात. ‘ग्राहक तितुका मेळवावा’ हे संस्थेचे मुखपत्र चालवले जाते. तसेच जागृत ग्राहकांना आपल्या तक्रारींचे निवारण करून घेण्यासाठी विनामूल्य मार्गदर्शन करण्यासाठी दहा मार्गदर्शक केंद्रे ठिकठिकाणी कार्यरत आहेत. बहुसंख्य ग्राहकांना भेडसावणाऱ्या प्रश्नांवर मोहिमाही केल्या जातात. रिक्षांसाठी इलेक्ट्रोनिक मीटर्स बंधनकारक होणे, वीज दर निश्चिती, रेरा कायद्याची अंमलबजावणी असे अनेक प्रश्न विधायक मार्गाने सोडवले आहेत.
ग्राहक संरक्षण कायद्याचा लाभ ग्राहकांना मिळावा म्हणून केलेल्या विविध प्रयत्नांत अनेक ग्राहकाना नुकसानभरपाई मिळवून दिली आहे.रेराअंतर्गत येणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी सलोखा मचाची यंत्रणा उभारण्यात पुढाकार संस्थेन घेतला आहे. याखेरीज अनुचित व दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींविरुद्ध कारवाई केली जाते. लोकप्रिय झालेल्या ग्राहक पेठांचे आयोजन करून ग्राहकांना रास्त दरात माल व छोट्या उद्योजकाना संधी अशी दुहेरी भूमिका पंचायत अनेक वर्षं पार पादत आहे. ग्राहक हक्कांना युनोची मान्यता मिळवण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचे कार्य कले आहे. गेल्या ४७ वर्षांत संस्थेच्या कार्यकर्त्यांनी स्वयंसेवी पद्धतीने त्याची पोचपावती म्हणून संस्थेला अनेक राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. संस्थेचे माजी अध्यक्ष कै. गंगाधर गाडगीळ यांनी या कार्याचे वर्णन “मुंग्यांनी रचलेला मेरू पर्वत” या शब्दात केला होता, ते खरोखरच आजही लागू पडते. ग्राहक पंचायतीच्या या उपक्रमाला २५ वर्षं झाली आहेत.