Wednesday, April 23, 2025
Homeमहत्वाची बातमीतुरुंगात जायला घाबरणारे आम्ही लोक नाही

तुरुंगात जायला घाबरणारे आम्ही लोक नाही

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरे सरकारला इशारा

मुंबई : “प्रश्न कुठे आणि कोणी बदलले हे मला माहिती आहे. पण त्याने काही फरक पडत नाही. कोणताही गुन्हा नसताना माझ्या वडिलांना इंदिरा गांधींनी दोन वर्षे तुरुंगात ठेवले होते. त्यामुळे तुरुंगात जाण्यासाठी घाबरणारे आम्ही नाहीत. ज्यांनी प्रश्नावली बदलली त्यांनी लक्षात घ्यावे की आम्ही भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर लढतच राहणार आहोत. यासंदर्भात कायदेशीर लढाई असेल ती लढू,” असा इशारा विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला दिला आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मुंबई सायबर पोलिसांनी पाठवलेली नोटीस आणि त्यांची केलेली चौकशी यावरून भाजप आक्रमक झालेला आहे. त्याचे पडसाद आज, सोमवारी विधानसभा सभागृहातही उमटले. देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. मुंबई सायबर पोलिसांनी चौकशीत विचारलेले प्रश्न हे आरोपीसारखे होते, असे फडणवीस म्हणाले.

जाणीवपूर्वक कुणीतरी आधीची प्रश्नावली बदलून या व्यक्तीला गुंतवता येते का? आरोपी-सहआरोपी करता येतं का? अशा प्रकारचे प्रश्न होते. मला काहीही फरक पडत नाही. मी एक वकील आहे आणि मला समजतं. मी तर या ठिकाणी सर्वसामान्य नागरिक म्हणून सुरक्षित आहे. मी अतिशय जबाबदारीने वागलो आहे. मला तर असं वाटतं की, कालचे प्रश्न पाहिल्यानंतर याला काहीतरी राजकीय वळण आहे. मला काहीही अडचणी नाहीत, असे फडणवीस म्हणाले. मी ज्या घरातून येतो ते सगळ्यांना माहिती आहे. प्रश्न कुणी आणि कुठे बदलले हे सगळे मला माहीत आहे. त्याने काहीही फरक पडत नाही. माझ्या वडिलांना इंदिराजींनी दोन वर्षे जेलमध्ये ठेवण्यात आले होते. कुठलाही गुन्हा नव्हता. माझ्या काकूलाही १८ महिने तुरुंगात ठेवले होते. तुरुंगात जायला घाबरणारे लोक नाही, असे फडणवीस यांनी ठणकावून सांगितले. आम्ही जनतेसाठी लढणारे आहोत. ज्यांनी प्रश्नावली बदलली त्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे. भ्रष्टाचाराचे मुद्दे आहेत. त्याच्यावर आम्ही लढत राहणार आहोत आणि म्हणून तुम्हाला काय करायचे असेल ते करा, आम्ही कायदेशीर लढाई लढू, असेही ते म्हणाले.

पोलीस बदल्यांमध्ये महाघोटाळा झाल्याचे उघड करताना, सभागृहात दिलेल्या माहितीचा स्रोत उघड करणे बंधनकारक नसून, विरोधी पक्षनेता म्हणून मला विशेषाधिकार असल्याचा दावा फडणवीसांनी केला होता. त्यावर आज, सभागृहात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी उत्तर दिले. देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेली नोटीस आरोपी नव्हे, तर जबाब नोंदवण्यासाठी होती, असं वळसे पाटील यांनी स्पष्ट केलं. फडणवीसांनीही आपल्याला पोलिसांनी चौकशीत कोणते प्रश्न विचारले, याबाबत सभागृहात माहिती दिली. मला पोलिसांनी आधी जी प्रश्नावली पाठवली होती, त्यावर मी लेखी उत्तर देऊन कळवलं होतं. मी याची उत्तरे देणार आहे, असे सांगितले होते. कारण मला विशेषाधिकार वापरायचा नाही. त्यात लपवण्यासारखे काहीच नाही. पण प्रश्नावलीतील प्रश्न आणि काल मला विचारण्यात आलेले प्रश्न यात खूप फरक होता. प्रश्नावलीतील प्रश्न हे साक्षीदारासाठी होते, तर काल मला पोलिसांनी विचारलेले प्रश्न हे आरोपी असल्यासारखे होते, असा खळबळजनक दावा फडणवीसांनी सभागृहात केला. तुम्ही ऑफिशियल अॅक्टचा भंग केला आहे असे तुम्हाला वाटत नाही का? असा प्रश्न मला विचारण्यात आला. असे चार-पाच प्रश्न आहेत. असे प्रश्न साक्षीदाराला विचारतात का? असा सवाल फडणवीसांनी उपस्थित केला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -