Wednesday, July 3, 2024
Homeताज्या घडामोडीमुख्यमंत्री पदासाठी गोव्यात रस्सीखेच!

मुख्यमंत्री पदासाठी गोव्यात रस्सीखेच!

पणजी : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत गोव्यातील सत्ता भाजपने कायम राखली आहे. निवडणूक निकालानंतर आता सत्तास्थापनेच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. पण मुख्यमंत्रिपदावरुन गोवा भाजपमध्ये दोन गट झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदासाठी गोव्यात बंड होणार का? याची चर्चा रंगली आहे. गोवा भाजपमध्ये अंतर्गत वाद सुरु झाल्यामुळे भाजप विरुद्ध भाजप असा सामना रंगलाय का? हा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.

गोव्यात सर्वात जास्त विधानसभेचे उमेदवार निवडून आणून भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष झाला. त्यामुळे मुख्यमंत्री हा भाजपचा होणार यात शंका नाही. मात्र आता गोव्याचे माजी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याविरोधात त्यांच्याच पक्षाचे उमेदवार विश्वजीत राणे यांनी शड्डू ठोकल्यामुळे मुख्यमंत्री पदासाठी चुरस निर्माण झाली आहे.

नुकतीच झालेल्या निवडणुकीत सर्वात जास्त उमेदवार निवडून आणत भाजप हा पक्ष सर्वात मोठा पक्ष झाला आहे. मात्र त्यांना एक उमेदवार कमी पडल्यामुळे ते बहुमताचा आकडा पार करु शकले नाहीत. याचाच फायदा घेण्याचा प्रयत्न काही आमदार घेत असल्याचे समोर आले आहे.

मागील दोन दिवसांपासून गोव्यातील प्रमुख दैनिकांमध्ये विश्वजीत राणे यांच्या पत्नी दिव्या विश्वजीत राणे यांच्या विजयाच्या जाहिराती छापून येत आहेत. यामधे भाजपच्या सर्व प्रमुख नेत्यांचे फोटो छापून येत आहेत, मात्र भाजपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार प्रमोद सावंत यांचा फोटो नसल्यामुळे सर्वांनीच भुवया उंचावल्या आहेत. तर दुसरीकडे याच जाहिरातीत महिला शक्तीचा उदय झाला आहे, अशा आशयाचा मजकूर देखील छापण्यात आला आहे. त्यामुळे गोव्याला महिला मुख्यमंत्री मिळणार का? याची चर्चा रंगली आहे.

गोवा राज्याच्या स्थापनेपासुन आत्तापर्यंत झालेल्या विधानसभा निवडणुकांतील सर्वोच्च मताधिक्याचा विक्रम. तब्बल १३ हजार ९४३ मताधिक्याने विजयी. पर्ये मतदारसंघातून निवडून येणाऱ्या त्या पहिल्या महिला तसेच एवढ्या प्रचंड मताधिक्याने निवडून येणाऱ्या त्या पहिल्याच उमेदवार आहेत. याच जोरावर राणे पती पत्नी मुख्यमंत्री बदलण्यासाठी दबाव आणत आहे.

दुसरीकडे मुख्यमंत्री प्रोमद सावंत यांना १७ भाजप आमदार आणि तीन अपक्ष आमदार यांचा पाठींबा असल्याचे बोलले जात आहे. म्हणून कोणी कितीही प्रयत्न केला तरी मुख्यमंत्री प्रमोद सावंत असतील असा विश्वास सावंत यांच्या समर्थकांना आहे. ‘माझ्या नेतृत्वात ही निवडणूक लढली गेली. मला विश्वास आहे की पक्ष मला योग्य जबाबदारी देईल आणि मी ती पूर्ण इमानदारीने पार पाडेन, असा विश्वास प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला.

मुळात विश्वजित राणे आणि प्रमोद सावंत यांच्यातील संघर्ष हा याआधी देखील गोव्यातील नागरिकांनी पाहिला आहे. कोरोना काळात विरोधी पक्षात असलेल्या विश्वजित राणे यांनी प्रमोद सावंत यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते. त्यावेळी प्रमोद सावंत यांनी देखील जोरदार प्रतिकार केला होता.

विश्वजीत राणे यांनी अचानक स्वतंत्रपणे राज्यपाल श्रीधरन पिल्लई यांची नुकतीच राजभवनात भेट घेतल्याने, गोव्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून दैनिकात येणाऱ्या जाहिराती आणि महिला मुख्यमंत्री पदासाठी खेळलेल्या कार्डला प्रमोद सावंत कशाप्रकारे उत्तर देणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, सत्तास्थापनेसाठी भाजपचे केंद्रीय निरीक्षक आज संध्याकाळी गोव्यात दाखल होत आहेत. आज रात्रीपर्यंत गोव्याचा नवा मुख्यमंत्री कोण या प्रश्नाचे उत्तर मिळण्याची शक्यता आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -