Tuesday, December 3, 2024
Homeमहत्वाची बातमीसुडापोटीच माझ्यावर कारवाई : फडणवीस

सुडापोटीच माझ्यावर कारवाई : फडणवीस

मुंबई (प्रतिनिधी) : राजकीय सुडातूनच मला नोटीस बजावण्यात आली. तसेच चौकशी केली. पोलीस यंत्रणेचा वापर करून राज्य सरकार माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही सगळे पुरावे सीबीआयला देऊ, असे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यांनी मुंबई पोलिसांनी केलेल्या चौकशीनंतर सांगितले. बदल्याच्या महाघोटाळ्याप्रकरणी पोलिसांनी फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी रविवारी दोन तास चौकशी करण्यात आली.

राज्यातील बदल्यांच्या महाघोटाळ्याची माहिती केंद्रीय गृह सचिवांना दिली. या महाघोटाळ्याची सीबीआयकडून चौकशी सुरू आहे. याआधी महाघोटाळ्याचा अहवाल राज्य सरकारने दाबून ठेवला होता. राज्य सरकारने कोणतीच कारवाई केली नव्हती, असेही फडणवीस यांनी म्हटले. वेळेत राज्य सरकारने याची चौकशी केली असती, तर हे करावं लागलं नसतं. याआधी मुंबई पोलिसांकडून मला पोलिसांनी प्रश्नावली पाठवली होती. मात्र ती प्रश्नावली आणि आज विचारण्यात आलेल्या प्रश्नांमध्ये मोठा फरक होता, असे फडणवीस म्हणाले. मला आरोपी अथवा सहआरोपी करता येईल का, मी गोपनीय कायद्याचा भंग केला, असा रोख पोलिसांचा होता.

माझ्या आरोपानंतर कोर्टाने या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश दिले आहेत. माझ्यावर व्हिसलबोअर कायदा लागू झाला पाहिजे, असे फडणवीस यांनी म्हटले. खा. संजय राऊत घाबरून पत्रकार परिषद घेतायेत, केंद्रीय तपास यंत्रणावर आरोप करतात. मला नोटीस आल्यावर मी पत्रकार परिषद घेऊन सांगितले. संजय राऊतांवर अशी वेळ आली, तर मला का बोलावले, असे म्हणत का घाबरतात? असा हल्लाबोल फडणवीस यांनी केला.

आरोपी असल्यासारखी प्रश्नांची सरबत्ती

गोपनीय कायद्याचा भंग केला आहे आणि मीच आरोपी आहे, असे प्रश्न मला विचारण्यात आले. यापुढेही राज्य सरकारचे काळे कारनामे बाहेर काढणार. सभागृहात उपस्थित करत असलेल्या प्रश्नामुळे ही चौकशी दबावासाठी करण्यात आली असल्याचा आरोपही फडणवीस यांनी केला.

मलिक यांच्यावर कारवाई करा

पोलीस बदली घोटाळा प्रकरणी मी पत्रकार परिषदेत माहिती दिली. मात्र ट्रान्सस्क्रिप्ट आणि इतर माहिती पत्रकारांनी दिली नाही. अतिशय संवेदनशील असल्याने ही माहिती दिली नाही. या प्रकरणात आयपीएस अधिकाऱ्यांच्या नावाचा समावेश असल्याने केंद्रीय गृहसचिवांना ही माहिती, यादी दिली. या उलट राज्य सरकारचे मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकारांना ही माहिती देत नावे उघड केली. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली.

सत्य बोलल्यावर नोटीस पाठवली जाते : आमदार नितेश राणे

सत्य बोलल्यावर एफआयआर नोंदवला जातो किंवा नोटीस पाठवली जाते, असे आमदार नितेश राणे यांनी फडणवीस यांच्या पोलीस चौकशीनंतर म्हटले. महाराष्ट्रात नोटीस मिळणे हे गुड मॉर्निंग मेसेजसारखे झाले आहे. मेसेज येताच नोटीस मिळते. देवेंद्र फडणवीस वस्तुस्थितीच्या आधारे बोलतात, तरीही त्यांना नोटीस पाठवली आहे, बॉम्बस्फोटात असणारा आरोपी दाऊद याविषयी आम्ही आमची भूमिका मांडली आहे. दाऊदवर एवढे प्रेम असेल, तर महाराष्ट्र सरकारच्या सर्व मंत्र्यांनी आपल्या केबिनमधून गांधीजींचा फोटो काढून दाऊदचा फोटो लावावा आणि त्याला महाराष्ट्र भूषण द्यावा असेही राणे यावेळी म्हणाले. आम्ही हिंदू आहोत आणि हिंदुत्वाबद्दल आम्ही बोलणारच, असे राणे यावेळी म्हणाले.

दुसरा व्हीडिओ बॉम्ब आज-उद्या येतोय : चंद्रकांत पाटील यांचे सूचक विधान

फडणवीस यांच्या पेनड्राइव्हनंतर आज किंवा उद्या आणखी एक व्हीडिओ बॉम्ब येणार असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केले आहे. केंद्रीय तपास यंत्रणांकडून तुम्ही आम्हाला त्रास देता म्हणून आम्ही तुम्हाला त्रास देतो, असे सुरू आहे. देवेंद्र फडणवीस यांनी एक व्हीडिओ बॉम्ब टाकला. एका व्हीडिओ बॉम्बमुळे सगळं चिडीचूप झालंय. दुसरा व्हीडिओ उद्या-परवा येतोय. दुसरा व्हीडिओ तर खूपच स्ट्राँग आहे. फडणवीस यांच्या पाठीमागे पूर्ण भाजप तसेच जनता आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

जबाब घेणे हे कायद्याने बंधनकारक : गृहमंत्री

फोन टॅपिंग आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या बदली घोटाळ्यातील प्रकरणात गोपनीय माहिती उघड केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडून देवेंद्र फडणवीस यांची चौकशी झाल्यानंतर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. राज्य गुप्तचर विभागाच्या कागदपत्रांच्या गहाळ होण्याच्या प्रकरणाच्या संदर्भात मुंबई सायबर पोलीस ठाण्यात २६ मार्च २०२१ रोजी यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य गुप्तवार्ता विभागाची माहिती गहाळ झाल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्यांचा या प्रकरणाशी संबंध आहे त्यांचा जबाब घेणे कायद्याने बंधनकारक आहे, असे दिलीप वळसे-पाटील म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -