Saturday, July 13, 2024
Homeदेशमोदींच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक

मोदींच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक

नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धसंघर्ष अद्यापही सुरूच आहे. रशियाकडून युक्रेनमध्ये बॉम्बहल्ले तसेच हवाईहल्ले केले जात असल्यामुळे जीवित तसेच वित्तहानी होत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने देशाची सुरक्षा तसेच सध्याच्या जागतिक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी रविवारी उच्चस्तरीय बैठक घेतली. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धसंघर्षाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी झालेल्या बैठकीला महत्त्वाच्या व्यक्तींची उपस्थिती होती. बैठकीला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर, परराष्ट्र सचिव हर्षवर्धन तसेच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आदी महत्त्वाच्या व्यक्ती आजच्या बैठकीला उपस्थित होत्या. बैठकीमधील चर्चेचा तपशील अद्याप समजू शकलेला नाही. मात्र देशाची सुरक्षा आणि जागतिक पातळीवरील राजकारण यावर या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे.

रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्ष कमी व्हावा यासाठी भारतानेही अनेक प्रयत्न केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि युक्रेनचे समकक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्यासोबत फोनद्वारे चर्चा केली आहे. तसेच प्रत्यक्ष संघर्ष टाळून चर्चेतून मार्ग काढण्याचे आवाहन भारताने या दोन्ही देशांना केलेले आहे. दरम्यान या दोन्ही देशांत युद्ध सुरू झाल्यानंतर नेटोमध्ये सहभागी असलेल्या देशांनी युक्रेनला पाठिंबा दर्शविलेला आहे. रशियाची आर्थिक कोंडी व्हावी यासाठी रशियन तेल तसेच गॅसच्या आयातीवर अमेरिकेने बंदी घातली आहे. भारताने मात्र या युद्धाबाबत सावध भूमिका घेतलेली आहे. संयुक्त राष्ट्रात रशियाविरोधात मांडलेल्या ठरावावर भारत तटस्थ राहिलेला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -