खासगी कोचिंग क्लासच्या शिक्षकाला अटक
मुंबई : मुंबईत महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा रसायनशास्त्राचा पेपर फुटल्याची बातमी ताजी असतानाच आज नगरच्या श्रीगोंद्यातही गणिताचा पेपर फुटल्याचे समोर आले आहे.
त्याआधी शनिवारी विलेपार्ले आणि मालाड भागात परीक्षा केंद्रावर पेपर फुटला. काही विद्यार्थ्यांच्या फोनमध्ये प्रश्नपत्रिका आढळली असून ते परीक्षा केंद्रावर उशिरा पोहोचले होते. याप्रकरणी विलेपार्ले पोलिसांनी मालाड येथील एका खासगी कोचिंग क्लासच्या शिक्षकाला अटक केली आहे.
शनिवारी रसायनशास्त्राचा पेपर होता आणि काही विद्यार्थी परीक्षा केंद्रावर उशिरा पोहोचले. तपासणी केली असता या मुलांच्या फोनमध्ये त्यादिवशी होणाऱ्या रसायनशास्त्राचा पेपर आढळला. या पेपरफुटीच्या प्रकरणात एका खासगी कोचिंग क्लासच्या शिक्षकाचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांना असून त्या शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. परीक्षेच्या आधी या शिक्षकाने प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांच्या व्हॉट्सअॅप ग्रूपवर पाठवली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी बारावीचा रसायनशास्त्राचा पेपर झाला होता. मात्र, परिक्षा सुरू होण्याआधीच मुकेश यादव या खाजगी कोचिंग क्लासच्या शिक्षकाने हा पेपर त्याच्या तीन विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर (व्हाट्स अॅप) दिला होता. पोलिसांनी या प्रकरणी तीन विद्यार्थ्यांची चौकशी देखील केली आहे. पेपरफुटीसाठी मुकेश यादवसोबत आणखी कोणाच सहभाग आहे का, पेपर मिळवण्यासाठी काही आर्थिक व्यवहार झाला का, याआधीदेखील पेपर फुटलेत का, आदी मुद्यांवरही पोलीस तपास सुरू आहे. पोलिसांकडून आता या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. फुटलेला रसायनशास्त्राचा पेपर किती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला, याचीही माहिती पोलीस घेत आहेत. प्राथमिक माहितीनुसार फक्त तीन विद्यार्थ्यांना हा पेपर मिळाला आहे.
यापूर्वी अनेक शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातील काही ठिकाणी पेपर फुटल्याची तक्रार सोशल मीडियावर केली होती. प्रश्नपत्रिकेचे फोटो अनेक अॅप्सवर व्हायरल झाल्याचा आरोप या विद्यार्थ्यांनी केला आहे.
दरम्यान, “शनिवारी, दिनांक १२ मार्च रोजी झालेल्या इयत्ता बारावीच्या रसायनशास्त्र विषयाची प्रश्नपत्रिका फुटलेली नाही. पेपर फुटला, असा चुकीचा प्रचार काही समाजमाध्यमातून सुरू आहे, त्यात कोणतंही तथ्य नाही,” अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी विधान परिषदेत दिली.