Friday, May 9, 2025

देशमहत्वाची बातमी

काँग्रेस अध्यक्षपदासाठी राहुल गांधी यांच्या नावाचा आग्रह

काँग्रेस अध्यक्षपदासाठी राहुल गांधी यांच्या नावाचा आग्रह
नवी दिल्ली : पाच राज्यांच्या निवडणुकीत काँग्रेसने सपाटून मार खाल्यानंतरही काँग्रेस नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. याआधी राहुल गांधी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असला तरी पक्षातील निष्ठा दाखवण्यासाठी राहुल गांधी यांनीच अध्यक्ष व्हावे, असा आग्रह रविवारी दिल्लीत पार पडलेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत काही काँग्रेस नेत्यांनी धरला. यावेळी मुख्यालयाजवळ जमलेल्या काँग्रेस समर्थकांनी राहुल गांधी यांच्या अध्यक्षपदी नियुक्तीच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली.

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर काँग्रेस कार्यकारिणीची रविवारी बैठक झाली. बैठकीत पराभवाच्या कारणांचा आढावा घेण्याबरोबरच भविष्यातील रणनीतीवर चर्चा करण्यात आली. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होत्या. या बैठकीत राहुल गांधी, प्रियांका वड्रा, हरीश रावत, मल्लिकार्जुन खर्गे आणि अंबिका सोनी यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते. या बैठकीत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, दिल्ली प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा अलका लांबा, अनिल भारद्वाज यांसह अनेक नेत्यांनी राहुल गांधी यांनी अध्यक्षपद स्वीकारावे, अशी मागणी केली. यावेळी राहुल गांधी अध्यक्ष व्हावे, यानेच पक्ष एकसंध राहील, असे मत गेहलोत यांनी सभेपूर्वी व्यक्त केले.

असंतुष्ट गटही सक्रिय

शुक्रवारी काँग्रेसमधील असंतुष्ट गटाच्या म्हणजेच जी-२३ गटातील वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली, ज्यामध्ये भविष्यातील रणनीतीवर चर्चा करण्यात आली. गुलाम नबी आझाद यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीला आनंद शर्मा, कपिल सिब्बल आणि मनीष तिवारी यांसारखे दिग्गज उपस्थित होते. दरम्यान, गांधी कुटुंबातील सदस्यांनी सर्व संघटनात्मक पदांचा राजीनामा दिल्याचे वृत्त काँग्रेस पक्षाने फेटाळून लावले.
Comments
Add Comment