प्रियानी पाटील
स्त्री म्हणजे वात्सल्य, स्त्री म्हणजे मांगल्य
स्त्री म्हणजे मातृत्व, स्त्री म्हणजे कर्तृत्व
प्रहारमधील जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर उत्साहात झालेला ‘प्रहार महिला संवाद’ हा कार्यक्रम मान्यवर महिलांच्या कर्तृत्वाच्याच दिशेने पुढे सरकला आणि प्रत्येकीच्या अनुभवाचे बोल साऱ्यांनाच मंत्रमुग्ध करून गेले. सोनचाफ्याच्या दरवळीने संवादाचं रूप लेऊन साकार झालेला ‘प्रहार महिला संवाद’ कार्यक्रम अपेक्षेपेक्षा जास्त बहरला. ८ मार्च २०२२च्या पूर्वसंध्येला विविध क्षेत्रांतील मान्यवर महिलांची उपस्थिती त्यांच्या अनुभवाचा ठसा उमटवून गेली.
दैनिक प्रहारचे संपादक माननीय सुकृत खांडेकर यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. प्रास्ताविकातून सर्व महिला या आपापल्या क्षेत्रात कशा यशस्वी आहेत हे स्पष्ट केले, तर प्रहारचे व्यवस्थापक (एच. आर.) ज्ञानेश सावंत यांच्या हस्ते उपस्थित सर्व मान्यवर महिलांचा पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन स्वागत करण्यात आले, तर प्रियानी पाटील यांनी सर्व मान्यवर महिलांचा परिचय करून दिला. आभार प्रदर्शनाची सूत्रे असिस्टंट व्यवस्थापक (मार्केटिंग) कल्पना घोरपडे यांनी हाती घेतली.
आज महिलांसाठी खरं तर कोणतेही क्षेत्र नवे नाही. साहित्य क्षेत्र असो किंवा असो पत्रकारिता… क्षेत्र जिथे, ती पाय रोवते, तिथे ती सिद्ध होते. उद्योग क्षेत्राचा वसाही तिला लाभल्याने आपल्यासवे आपल्या असंख्य सखींचे संसार कसे उभे राहतील, अनेक स्त्रीया या क्षेत्रात कशा पुढे येतील, याचाही अनुभव या संवाद कार्यक्रमातून यावेळी अनुभवास मिळाला.
प्रहार संवाद कार्यक्रमात सहभागी झालेल्या महिलांमध्ये पत्रकारिता क्षेत्रात बराच काळ कार्यरत राहिलेल्या वैजयंती आपटे यांच्या मनोगतातून, त्या ज्येष्ठ अभिनेते विनय आपटे यांच्यासोबतच्या विवाहानंतर त्यांनी निवडलेले नाट्य क्षेत्र आणि त्यातही त्या कशा रममाण झाल्या, इतकेच नाही तर आज झी मराठीच्या हवा येऊ द्या कार्यक्रमातही त्यांचा असणारा पाठिंबा, निर्मितीतील सहभाग आज बऱ्याच अंशी महत्त्वाचा ठरत आहे. यावरूनच क्षेत्र कोणतेही असो, स्त्रीने एकदा ठरवले की, ती त्या क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवून त्या क्षेत्रात कशी यशस्वी ठरते हे वैजयंती आपटे यांच्या धडाडीवरून दिसून येते. पत्रकार म्हणूनही त्यांचे धडाडीचे अनुभव आजच्या महिला पत्रकारांसाठी उपयुक्त आणि मार्गदर्शकच ठरणारे.
…तर बाईच्या सहनशीलतेचा ठाव घेणारा माजी आमदार तृप्ती सावंत यांचा अनुभव बरंच काही सांगून जाणारा ठरला. एखाद्या क्षेत्राच्या यशासाठी किंवा डावपेच, खेळी लढवण्यासाठी विशेषत: राजकारणात स्त्रीचा मतांसाठी उपयोग करून घेऊन नंतर डावललं कसं जातं, याचं जितजागतं उदाहरण देऊन तृप्ती सावंत यांनी जगाची एक रीतच दाखवून दिली.
आज समाज बदलला, महिला दिनाला महिलांचे गोडवे गायले गेले तरी एक स्त्रीच स्त्रीवर अन्याय कसा करते, याचंही संवादरूपी उदाहरण या कार्यक्रमातून पाहावयास मिळाले. लोकमत डिजिटलच्या सीनियर पदावर कार्यरत असलेल्या शैलजा जोगल यांनी आई-वडिलांची एकुलती एक असले तरी एका मुलासारखी जबाबदारी त्यांनी आज पेलली असल्याचे संवादातून दिसून आले.
१८ वर्षे पत्रकारितेत कार्यरत राहून नासा ग्लोबल या कंपनीत पॉलिटिकल कन्सल्टंन्ट म्हणून कार्यरत राहिलेल्या सुवर्णा दुसाने या आज नासा ग्लोबलमार्फत निवडणुकीचे सर्व्हे करणे, संबंधित उमेदवारांना भाषणाचे मुद्दे देणे, निवडणुकीच्या तयारीसाठी आवश्यक साहित्य बनवून देणे, डॉक्युमेंटरी, रिल्स जिंगल्स, तसेच सोशल मीडिया स्ट्रॅटेजी कशी असावी याबाबत प्रोफेशनल सल्ला देणे, आदी कार्य करताना सुवर्णा दुसाने या क्षेत्रात आज ठामपणे आणि निडरपणे उभ्या आहेत.
सुमेधा रायकर-म्हात्रे या यूएस कॉन्स्युलेटमध्ये सीनियर मीडिया अॅडव्हायझर आहेत. अमेरिकन वकिलातीमधील १८ वर्षांच्या कारकिर्दीआधी त्या १५ वर्षे इंग्रजी मीडियामध्ये इंडियन एक्स्प्रेस आणि राजकीय व न्यायालय विश्लेषक, गेली दहा वर्षे त्या मिड डेमध्ये कल्चर स्वयंपाक प्रयोगावरच्या त्यांच्या नर्मविनोद कॉलमला नुकतेच लाडली मीडिया मानांकन मिळाले आहे. त्यांच्याशी संवाद साधताना एक आत्मविश्वास साऱ्याजणींना मिळून गेला. एखाद्या क्षेत्रात कार्यरत राहताना आपल्या वागण्याबरोबरच संवाद किती महत्त्वाचा आहे, हे त्यांनी सांगितले, तर मराठा मंडळ, मुलुंड, मुंबई या सामाजिक संस्थेमध्ये महिला आघाडीच्या सदस्या तसेच अपना बाजार या ग्राहक संस्थेच्या मुलुंड शाखेच्या कार्यकारिणी सदस्य असलेल्या सोनाली सावंत या महिलांना प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व म्हणून आज आदर्श ठरल्या आहेत.
‘प्रहार महिला संवाद’ या कार्यक्रमात संवादाच्या माध्यमातून प्रत्येकजण दिलखुलास प्रकट झाले. अंतरीच्या भावना, आपले मनोगत, कार्याचा आढावा मनमोकळेपणाने देताना त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद, उत्साह अमाप ओसंडून वाहत होता. झालेल्या चर्चा संवादातून खळाळत होता. हा अनुभव केवळ एका महिला दिनापुरता मर्यादित राहणारा नाही, तर अनेकींनी आजवरच्या कार्यातून कमावलेला अनुभव हा अनेक पिढ्यांना उपयुक्त ठरणारा असून अनेकींना प्रोत्साहन देखील देणारा ठरणार आहे हे निश्चित.
कार्यक्रमाची सांगता करताना दैनिक प्रहारच्या कल्पना घोरपडे यांनी सर्वांचे मन:पूर्वक आभार मानले. सर्वांचे अनुभव येणाऱ्या पिढीला देखील कसे मार्गदर्शक ठरणारे आहेत, हे कल्पना घोरपडे यांनी आभार प्रदर्शनावेळी आवर्जून सांगितले.
उत्साह, गंभीरता, रंगत
रोहित गुरव
समाजातील कर्तृत्ववान महिलांशी मनमोकळा संवाद साधण्याची संधी महिला दिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित ‘प्रहार महिला संवाद’ कार्यक्रमाच्या माध्यमातून दै. प्रहार वृत्तपत्रातील महिला कर्मचाऱ्यांना मिळाली. या कार्यक्रमात वैजयंती आपटे, अॅड. रिया करंजकर, सोनाली सावंत, सुमेधा रायकर-म्हात्रे, शैलजा जोगल, सुवर्णा दुसाने, तृप्ती सावंत या विविध क्षेत्रांत यश संपादन करणाऱ्या महिला सहभागी झाल्या होत्या. या महिलांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील सकारात्मक-नकारात्मक अनुभव सांगितले. महिलांचे यश, आलेल्या अडचणी, चांगेल-वाईट अनुभव, धडपड, ओढावलेले प्रसंग, त्यावर केलेली मात अशा विविध विषयांवर मनमुराद गप्पांनी कार्यक्रमाची रंगत वाढवली. त्यात कधी गंभीरतेची कटुता होती, तर कधी उत्साही प्रसंग, कुठे गंमतीदार किस्से होते, तर कुठे आलेल्या अडचणी, जुन्या आठवणी, करिअरची कवाडे, मार्गदर्शन यावर मान्यवरांनी भाष्य केले. उपस्थित प्रहारच्या महिला वर्गाने प्रश्न विचारत मान्यवरांना बोलते ठेवले. त्यात कार्यक्रमाची रंगत वाढवली ती लेखक, गीतकार प्रवीण दवणे यांच्या संवाद कौशल्याने. दोन तास चाललेल्या या कार्यक्रमात मान्यवर भरभरून व्यक्त झाले. त्यामुळे उत्साह, गंभीरता अशी दुहेरी रंगत अनुभवास आली.
माजी आमदार तृप्ती सावंत यांनी स्वत:चे अनुभव कथन करून स्त्री प्रश्नांना वाचा फोडण्याचा प्रयत्न केला. पतीच्या निधनानंतर अनुभवलेले कटू प्रसंग त्यांनी हळव्या शब्दांत मांडले. राजकीय पक्षांकडून झालेला अन्याय व्यक्त करताना त्या भावनिक झाल्या. त्यामुळे त्यांच्या मनोगतादरम्यान वातावरण गंभीर झाले होते.
युवा पत्रकार शैलजा जोगल यांनी वृत्तनिवेदनादरम्यानचे काही गंमतीदार किस्से सांगितले. उपस्थितांच्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी अचानक वृत्तनिवेदनादरम्यान टेलिप्रॉम्पटर बंद पडल्यानंतर निवेदकाची कशी कसरत असते? असा प्रसंग ओढावलाच तर वेळ कशी मारून न्यायची? यावरचे स्वत:चे अनुभव सांगितले. विविध वृत्तवाहिन्यांमधील काम, येथील कामाचा ताण, दबाव आणि त्यातून येणारी मजा यावर त्या भरभरून बोलल्या. इतर क्षेत्रांतील कामातील अनुभव आणि तेथे लहान असल्याने झालेले लाड, तेथील कर्मचाऱ्यांना तंत्रज्ञातील केलेली मदत, त्यातून त्या वरिष्ठ कर्मचाऱ्यांकडून झालेली स्तुती असे उत्साही अनुभव सांगितले. वृत्तनिवेदनाचे काम करताना जबाबदारीची गरज, निवेदक म्हणून टिकून राहण्यासाठी आवश्यक असलेले कौशल्य अशा महत्त्वपूर्ण विषयावर शैलजा जोगल व्यक्त झाल्या.
अॅड. रिया करंजकर यांनी स्त्रीयांचे विविध प्रश्न मांडत ते सोडवण्याचे लक्ष्य ठेवूनच वकिली क्षेत्रात आल्याचे सांगितले. धम्मलिपी या प्राचीन भाषेचे त्यांनी शिक्षण घेतले असून लेण्यांवरील भाषा समजण्याच्या उत्सुकतेपोटी त्यांनी ही लिपी शिकल्याचे त्या म्हणाल्या. त्यामुळे उपस्थितांमध्ये धम्मलिपीबाबत उत्सुकता ताणली. त्यांनी विचारलेल्या प्रश्नांवर रिया करंजकर यांनी समाधानकारक उत्तरे दिली.
धडाडीच्या पत्रकार आणि पॉलिटिकल कन्सल्टंट सुवर्णा दुसाने यांनी विविध वृत्तवाहिन्यांवरील कामाचे अनुभव कथन केले. राजकारण हा आवडीचा विषय असल्याने तसेच घरातही व्यावसायिक वातावरण असल्याने त्यांनी नासा ग्लोबल ही कंपनी सुरू केली. या कंपनीच्या माध्यमातून त्या पॉलिटिकल कन्सल्टंट म्हणून काम करत आहेत. सध्याच्या ‘दिखता है वही बिकता है’च्या जमान्यात लोकप्रतिनिधींच्या प्रमोशनची निकड त्यांनी व्यक्त केली. जगातील मोठे देश, तेथील राजकारण, त्या देशांतील पॉलिटिकल कन्सल्टंट आणि आपल्या देशातील राजकारण असा फरक त्यांनी दाखविला. त्यामुळे उपस्थितांना चांगले मार्गदर्शन मिळाले.