कथा : डॉ. विजया वाड
इंटरनॅशनल शाळेत प्रभा खरे तर शिक्षक म्हणून बरोबर नव्हती. नव्वद शिक्षकांत ती एकटीच पाचवार साडी नेसे. बाकी शिक्षक इंग्रजी पोषाख करीत वा अगदी गेला बाजार कुडता पैजामा!
“अहो, प्रभा खरे बाई इंडियन पेहराव करतात. त्यांना सांगा जरा टकाटक पेहराव करायला.” पालक सांगून बघत पण हेडसर मात्र कानाडोळा करीत. व्यवस्थित पिन केलेली साडी, इस्त्रीचा ब्लाऊज! तक्रार कसली करणार? प्रभाचे इंग्रजी तर एकदम ब्रिटिश घाटणीचे होते. तिच्या ब्रिटिश काऊन्सिलच्या बायका आठवड्यातून २ तास येत असत नि प्रभाचा एक्सेंट पक्का ब्रिटिश होण्याचं कारण त्या बायका!
प्रभा फर्डं इंग्रजी बोले ते मात्र पालकांना एक्सेप्ट! पण हर सारी! सारी वॉज द प्रॉब्लेम. प्रभा तू पाश्चात्त्य पेहराव का नाही करत? एकदा सीमा साखरे या पालकांनी विचारले, तेव्हा ती मान उडवून म्हणाली, ‘माय सारी इज द ग्रेस ऑफ दि स्कूल’ पालक यावर काय बोलणार?
शाळेत तपासनीस आले तेव्हा मात्र पंचाईत झाली. सारे पंजाबी पोशाखात तर इंग्लिश पोशाखात! प्रभा खरे तेवढी साडीत. तपासनीस म्हणाले, “प्रभाताई ‘वेगळ्याच’ दिसतात.” हेड सरांना ‘वेगळ्या’ या शब्दाचा अर्थ कळेना. उपहास की कौतुक? मोघम उत्तर द्यावे म्हणून सर म्हणाले, “इंडियन ‘पेहराव’ बरा ना?” काही पालक तक्रार करतात. पण मी त्याकडे दुर्लक्ष करतो. अशी पुस्तीही वर विधानाला जोडली त्यांनी सेफ साईड म्हणून. तपासनीस न्यूट्रल का होते ते मुख्याध्यापकांना कळेना.
पालक सभा झाली तपासनीसांसमवेत. काही पालक म्हणाले, ‘इंटरनॅशनल शाळेत भारतप्रेम जरा उतू प्रभाबाईंसोबत. ‘मी भारतीय आहे, मज सार्थ गर्व आहे, माझ्याच भारताचे मी एक बीज आहे.’ हे गाणं रोज तासाला गाऊन घेतात विद्यार्थ्यांकडून. पालकांना आपली मुलं सिंगापूर, यूएस, युरोप इथे पाठवायची होती. पण सारीच पंचाईत! केवळ प्रभाबाईंमुळे मिस्टर सोनावले, मिस्टर मराठे हे तर चिडलेच. संवाद साधताना म्हणाले, “मिस्टर मराठे, आमचा शांतनू भलताच देशप्रेमी निघाला हो.”
“का? काय झालं मिस्टर सोनावले?” मिस्टर मराठेंनी प्रश्न केला. “अहो सर्व्ह करीन, तर भारतासाठीच” … सोनावले उत्तरले. “अहो आमची श्यामली तर म्हणतेच तेच हो!” “काय म्हणते?”
“भारतमाता की जय!
भारतास अर्पियले हे सर्व प्राण माझे… मम देश साऱ्या साऱ्या जगात गाजे. असं काय काय म्हणत असते.”
“भारतप्रेम आहेच तसं! पण मला श्यामलीला यूएसला पाठवायचं आहे. मलाही शांतनूला सिंगापूरला पाठवायचे आहे. त्यासाठी मी प्रयत्न करीत आहे.”
दोन पालक कुजबुजले…, तशी शाळाही ‘हलू’ लागली. ‘प्रभा खरे’ हे नाव काळ्या यादीत गेले पालकांच्या. अतिप्रेम नकोच हो भारताबद्दल. इंग्लंड, अमेरिकेत कसं राहाणार? आमचा मुलगा, आमची मुलगी इंडियन नव्हे, इंटरनॅशनल व्यक्तिमत्त्व आहेत भावी जगाची!
आख्खी शाळा अशा विचारात बुडाली. मुख्याध्यापकांना सांगण्यापर्यंत मजल गेली.
“प्रभा खरे जागवा जरा सर. अति मराठी मराठी जप चालूय. भाषेबद्दल प्रेम आम्हालाही आहे पण इंग्लिश भाषा…त्याचं काय? इंटरनॅशनल शाळेत एवढी फी भरा नि मराठीचा उदो उदो? ये नहीं चलेगा!” ही भावना प्रबल झाली. प्रभा खरेला काढून टाका, इथपर्यंत मजल गेली.
पण तपासनीस आले आणि सारे वातावरण बदलले. तपासनीस प्रभाच्या साऱ्या वर्गांवर गेले.सातवी ते दहावी! सारेच वर्ग. इतके की, प्रार्थना पाठ झाली तपासनीसांची.
हेड गुरुजी चिंतित होते. मराठी भाषेचा मुलांमध्ये अभिमान ठासून भरलेला भारलेला! तपासनीस काय शेरा मारतात, हुरहुर मनामध्ये होती. त्यावर शेरा, हेड गुरुजींनी धडधडत्या अंत:करणाने बघितला आणि चाट पडले. स्टाफही चकित झाला.
आख्ख्या शाळेत तपासणी झाली. मराठीचे शिक्षक भाव खाऊन गेले. तो असा होता, चक्क मराठीमध्ये!
‘इंटरनॅशनल शाळेत, प्रभा खरे या बाईंनी, मराठीची पताका उंच फडकावली आहे. महाराष्ट्रात इंटरनॅशनल शाळा अर्धवट मराठी, अर्धवट हिंदी अशा अवस्थेत धडपडत असताना प्रभा खरे यांचा प्रत्येक मुलगा ‘मी जगणार माझ्या देशासाठी’ हे ब्रीदवाक्य बडबडत होता.
मी भारतीय आहे, मज सार्थ गर्व आहे. माझ्याच भारताचे, मी एक बीज आहे. काळीच आई माझी, मजला अतीव प्यारी. तव प्राण रक्षिण्याला, नभ जीव हा करारी. गे मायभू तुला ही, अर्पीन भावमाला. माझ्या पवित्र हाते, माझा प्रणाम तुजला…
माझ्या मिळकतीमधील १० टक्के हिस्सा येथील ‘भारतीय गरीब बांधवासाठी’ आहे हे वाक्य प्रभा खरे यांचे विद्यार्थी सांगत होते. ‘वसुधैव कुटुंबकम्… भारतम् प्रिय भारतम्’ हा नारा कंठी घेऊन होते.
शाळा तपासनीस यांनी शेरा दिला… “ज्या बहुराष्ट्रीय शाळेत प्रभा खरे यांसारखे शिक्षक आहेत त्या शाळांना २०० वर्षें विद्यार्थी जगाशी चिंता करण्याचे कारण नाही!” ऐशी बोलतीच बंद झाली सर्वांची.