Tuesday, July 16, 2024
Homeसाप्ताहिककोलाज‘प्रेमाला वयाचं बंधन नसतं’

‘प्रेमाला वयाचं बंधन नसतं’

मनोरंजन : सुनील सकपाळ

‘तू तेव्हा तशी’ म्हणत शिल्पा तुळसकर आणि स्वप्नील जोशी या जोडीने झी मराठी टीव्हीवर दमदार पुनरागमन केलं आहे. प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली ही मालिका २० मार्च पासून रा. ८ वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येईल. या मालिकेबद्दल शिल्पासोबत साधलेला हा खास संवाद.

अनेक वर्षांनंतर तुम्ही पुन्हा एकदा मध्यवर्ती भूमिकेतून मराठी टीव्ही माध्यमात पुनरागमन करत आहात, त्याबद्दल काय सांगाल?

‘मेघ दाटले’ या मालिकेनंतर जवळपास २० वर्षांनंतर ‘तू तेव्हा तशी’मधून अनामिकाच्या प्रमुख भूमिकेतून मी प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. त्यामुळे खूप जास्त उत्सुकता आहे. मधल्या काळात मी अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये कॅमिओ केले. पण पुन्हा एकदा प्रमुख भूमिकेतून प्रेक्षकांच्या समोर येताना खूप आनंद होतोय.

स्वप्नीलसोबत काम करण्याचा अनुभव?

स्वप्नील आणि मी याआधी एकत्र काम केलं आहे. पण ‘तू तेव्हा तशी’मधून पहिल्यांदांच प्रेक्षक आम्हाला प्रमुख जोडी म्हणून पाहू शकतील. स्वप्नीलसोबत खूप वेळानंतर पुन्हा एकदा काम करतेय त्यामुळे एकत्र काम करताना ऑनस्क्रीन, ऑफस्क्रीन एक पॉझिटिव्ह एनर्जी कायम असते.

‘तू तेव्हा तशी’मालिकेविषयी काय सांगशील?

ही गोष्ट आहे प्रेम व्यक्त करण्याचं राहून गेलेल्या सौरभ आणि अनामिकाची. २० वर्षांनंतर ते पुन्हा एकदा एकमेकांसमोर येतात आणि त्या काळात दोघांच्याही आयुष्यात बरेच बदल झाले आहेत. अशा वेळी सौरभला त्याचं प्रेम मिळणार की शेवटपर्यंत ‘प्रेम करायचं राहून गेलं’ हीच भावना सौरभसोबत राहणार? या प्रश्नाचं उत्तर प्रेक्षकांना लवकरच या मालिकेतून मिळेल. हे कथानक खूपच वेगळं आणि सुंदर आहे. प्रेमाला वयाचं बंधन नसतं आणि या मालिकेतून ते सुंदररीत्या मांडण्यात आलं आहे जे प्रेक्षकांनादेखील आवडेल, याची मला खात्री आहे.

तू आणि स्वप्नीलसारखे लोकप्रिय चेहरे मालिकेत असल्यामुळे प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळतोय याबद्दल काय सांगशील?

लोकप्रिय चेहऱ्याचा चाहता वर्ग मालिका पाहायला आपसूकच पसंती देतो. मात्र या गोष्टीचा विचार न करता चांगल्या भूमिका निवडणं आणि त्यांना न्याय देणं मला जास्त महत्त्वाचं वाटतं. मात्र, मालिका सुरू होण्याआधीच प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहता आमची जबाबदारीही वाढली आहे. मात्र, सक्षम कथानक आणि सर्वच कलाकारांचे भरीव योगदान पाहता प्रेक्षक आमच्यावर कायम प्रेम करतील, अशी मला आशा आहे.

माझ्या वयाची भूमिका साकारतोय : स्वप्नील जोशी

मी या मालिकेबाबत खूप उत्सुक आहे. जळपास ७-८ वर्षांनंतर मेनस्ट्रीम टेलिव्हिजन करतोय. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी या मालिकेत माझ्या वयाची भूमिका साकारतोय. मी ४४ वर्षांचा आहे आणि या वयोगटातली ही प्रेमकथा आहे. खूप वेगळी आणि आजची गोष्ट आहे, जी प्रेक्षकांनी आजवर पाहिली नाही आहे. मी आणि शिल्पा बऱ्याच वर्षांनंतर एकत्र काम करतोय तसेच आम्ही मंदारसोबत देखील पहिल्यांदाच काम करतोय. त्यामुळे ही मालिका त्यातील व्यक्तिरेखा हे सगळंच खूप फ्रेश आहे. एकमेकांसोबत काम करत अनेक नवीन गोष्टी शिकत या शूटिंगच्या प्रोसेसची मजा आम्ही घेतोय, असे स्वप्नील म्हणाला. नवीन मालिकेबद्दल उत्सुकता व्यक्त करताना स्वप्नील म्हणाला, या नवीन वर्षाचं माझं रिझॉल्यूशन होतं की, मला मालिका करायची आहे आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो की, ही मालिका माझ्या वाट्याला आली. या मालिकेचं कथानक खूप रिफ्रेशिंग आहे तसेच संपूर्ण टीमही खूप कमाल आहे. त्यामुळे मला आनंद आहे की, मी या मालिकेचा एक भाग आहे. ‘तू तेव्हा तशी’ मालिकेत स्वप्नील जोशी आणि शिल्पा तुळसकर अनुक्रमे सौरभ आणि अनामिका दीक्षितची भूमिका साकारणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -