गुलदस्ता : मृणालिनी कुलकर्णी
‘होळी रे होळी पुरणाची पोळी’ म्हणत रंगाची उधळण करत येणारी, जीवनात समृद्धीचे रंग भरणारी, आयुष्य आनंदाने जगा असा आशीर्वाद देणारी, पुरणपोळी खाऊन मराठी महिन्याचा शेवट गोड करणारी ही ‘मिठी मिठी पूनम, होळी पौर्णिमा, फाल्गुन पौर्णिमा’
वसंत पंचमीनंतर ४० दिवसांनी येणारी ही होळी; हा हिंदूंचा एक धार्मिक सण आहे. त्याला रंगाचा, प्रेमाचा आणि वसंत ऋतूचाही सण असे म्हणतात. होळीपासून हिवाळा संपून उन्हाळ्याला सुरुवात होते. फाल्गुन पौर्णिमेच्या संध्याकाळी विधिवत अग्नीची पूजा करून, होलिकाच्या दहनाने होलिकोत्सव सुरू होतो. त्यासाठी शेकोटी पेटवली जाते. या शेकोटीत वाईटाचा नाश व्हावा, अशी प्रार्थना करतात. हीच छोटी होळी. दुसऱ्या दिवशी धूलिवंदनाने खरी होळी सुरू होते. ‘वाईट शक्तीच्या दहनाचे प्रतीक म्हणजे होळी.’ ‘आयुष्यात चांगुलपणाचा वाईटावर नेहमीच विजय’ ही होळीची शिकवण देणारी ऐतिहासिक गोष्ट.
हिरण्यकश्यपू हा राक्षस असुरांचा राजा होता. त्याला मिळालेल्या विशेष वरदानामुळे तो उन्मत्त होऊन स्वतःला देव समजू लागला. त्याच्या आग्रहामुळे भीतीपोटी सारी प्रजा त्याची पूजा करीत होते; परंतु त्याचा मुलगा प्रल्हाद भगवान विष्णूचा भक्त होता. प्रल्हादाला विष्णूच्या भक्तीपासून दूर करण्यासाठी हिरण्यकश्यपूचे सारे प्रयत्न निष्फळ झाले. शेवटी प्रल्हादला मारण्यासाठी हिरण्यकश्यपूने आपली बहीण होलिकाची मदत घेतली. होलिकाला अग्नीपासून बचावाचे वरदान मिळालेले असल्याने तिने प्रल्हादाला फसवून मांडीवर घेत आगीच्या चितेत बसली. भगवान विष्णूने भक्त प्रल्हादाला वाचविले आणि दुष्ट मनाची होलिका आगीत जळून भस्मसात झाली. होलिकाला जाळणे म्हणजे दुष्ट विचार, प्रवृत्तीला जाळणे होय.
त्याच रात्री होणारी शिमग्याची बोंब हा जुन्या काळात एक जागर होता. असे वाचले की, संत एकनाथ महाराज हे समाजाला जागे करण्यासाठी अमंगळ वस्तू भस्मसात कर, खोटे मुखवटे जाळून टाका, हे सांगत. अग्नीला साक्ष ठेवून गत वर्षातील चुका जाळून, भूतकाळ विसरून दहन करा आणि येणाऱ्या वसंत ऋतूचे स्वागत करा, म्हणून होळीला वसंत ऋतू सण असेही म्हणतात. होळीच्या भडकलेल्या ज्वालेत प्रत्येकाचा चेहरा उजळून निघतो.
होळीच्या दुसऱ्या दिवशी धूलिवंदनाला, मैत्रीच्या भावनेने, मोकळ्या वातावरणात, मोकळेपणानी गुलाल, अबीर उधळत आनंद घेणे असा हा रंगोत्सव! घरी येणाऱ्याला प्रथम रंग लावला जातो. नंतर पुरणपोळीने तोंड गोड केले जाते. रंग जीवनातली नकारात्मकता दूर ठेवत लोकांना एकत्र आणतो. रंग लावणे, भिजवणे याचा संदर्भ धार्मिक ग्रंथात वृदांवनात बालपणी राधा-कृष्णाने सुरू केलेल्या रंग होळीशी आहे.
आज होळीच्या रात्री दारूचे अतिसेवन करून बोंबा मारणे. हानिकारक रंगाचा उपयोग करणे. होळी यायच्या आधीच मुलींवर पाण्याचे फुगे मारणे, अशा बेजबाबदार गोष्टींमुळे आताची होळी आपलीशी वाटत नाही. याच वाईट कृती, वृत्ती जाळल्यास किंवा कायमच्या बंद झाल्यास होळीचे खरे उद्दिष्ट साध्य होईल. कासगावच्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेने नेहमीच्या होळी परंपरेला छेद देत मुलांमध्ये स्वच्छतेचे, श्रमाचे, पर्यावरण संरक्षणाचे, सहकार्याचे महत्त्व समजावे त्याहीपेक्षा अनिष्ट रूढी-परंपरांना बगल देत गावातील मुलांनी साफ केलेल्या कचऱ्याची होळी केली. त्या होळीत मुलांनी आपल्या मनातील वाईट विचार, सवयी एका कागदावर लिहून तो कागद होळीत टाकला. साधा पण विचार करायला लावणारा हा होळीचा अभिनव उपक्रम.
वर्धा तालुक्यातील आचार्य विनोबा भावे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज तसेच नानाजी महाराज यांच्या कार्यामुळे सुरगावात आधीच वैचारिक परिवर्तन झाले होते. यांच्याकडूनच प्रेरणा घेऊन वीस वर्षांपूर्वी प्रवीण देशमुख या युवकाने होळी उत्सवातील दारू, अर्वाच्य शब्द बंद करण्यासाठी पुढाकार घेतला आणि ग्रामस्थांनी हळूहळू रंगाविना होळी ही कल्पना स्वीकारली. सफाईच्या कचऱ्याची, रूढीप्रमाणे होळी पेटवून दुसऱ्या दिवशी रामनामाचा गजर करीत प्रभातफेरी निघते. सारे एकत्र येतात. नंतर तीन दिवस पर्यावरण जागृती, व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन, सामूहिक विवाह असे गावांच्या विकासाशी संबंधित उपक्रम राबविले जातात. शेवटी लोकवर्गणीतून गावाला जेवण दिले जाते. समाज जागृतीचा आयाम असलेली सुरगावची होळी बाजूच्या गावानेही स्वीकारली.
होळी सणाचा विचार रुजविणारी एक गोष्ट शेअर करते. एक राजा हत्तीवर बसून राज्यात फिरताना अचानक एका दुकानदारासमोर थांबला नि आपल्या मंत्र्याला म्हणाला, “का माहीत नाही, मला या दुकानाच्या मालकाला फाशी द्यायची आहे.” हे ऐकून मंत्र्याला फार वाईट वाटले.
दुसऱ्या दिवशी साध्या नागरिकांच्या वेशात त्या मंत्र्यांनी दुकानदाराशी त्याच्या व्यवसायासंबंधी गप्पा मारल्या. त्याच्या दुकानात ग्राहक येतात. चंदनाचा वास घेत प्रशंसा करून निघून जातात. चंदन विकत कोणीच घेत नाही. दुकानदाराची आशा, राजा लवकर मरेल; त्याच्या अंत्यसंस्कारासाठी मोठ्या प्रमाणात चंदन माझ्या दुकानातून खरेदी केले जाईल. मंत्री समजला. दुकानदाराच्या नकारात्मक विचाराच्या लहरींचा राजावर परिणाम झाला. (टेलिपॅथी) क्षणभर सूज्ञ मंत्र्याने विचार करून त्याच्याकडून चंदन विकत घेतले. दुकानदाराला खूप आनंद झाला. चांगल्या कागदात बांधून ते चंदनाचे लाकूड त्याला दिले. तो मंत्री राजाकडे गेला. एका चंदन दुकानदाराने आपल्याला भेट पाठविली आहे, असे म्हणून त्यानी ते चंदन राजाला दिले. बंडल उघडताच ते सोनेरी रंगाचे चंदन, त्याचा सुगंध पाहून राजाने खुशीने चंदन व्यापाराला काही सोन्याची नाणी पाठविली. दोघांना एकमेकांना मारण्याच्या कल्पनेचा मनात पश्चाताप झाला. मंत्र्याने युक्तीने, विचारपूर्वक दोघांच्याही मनातील एकमेकांना मारण्याचा वाईट विचार जाळून टाकून एकमेकांविषयी आदर निर्माण केला. आपणही तसा प्रयत्न करूया. होळीच्या सर्वांना शुभेच्छा!