स्वयंसिद्धा : प्रियानी पाटील
कोकणात साजरी होणारी होळी ही एका विशिष्ट देवखेळे आणि गोमूच्या नाचांनी आकर्षित करणारी ठरते. देवांचं रूप म्हणून याकडे पाहिले जाते. होळी, शिमगा म्हटला की, संकासुरा रे… चा सूर जसा दुमदुमू लागतो, तसाच ढोल-ताशा, झांजांचा सूरही कानांना हवाहवासा वाटून जातो. यामध्ये लहानांपासून थोरांपर्यंत आकर्षित करणारं ठरतं ते स्त्री वेषातील गोमूचं, राधेचं नृत्य.
स्त्रीचे लावण्य रूप लेऊन यावेळी साजरे होणारे गोमू, राधांचे नृत्य अवघ्या परिसरात तालावर ठेका धरणारे ठरतात. राधा नृत्यासाठी खास स्त्री वेष धारण केला जातो. नऊवारी साडी, केसांचा अंबाडा, दर दिवशी नवे गजरे, वेण्या, फुलांचा साज केसात माळला जातो. नवनवीन साड्या दरदिवशी लेऊन ही नृत्यं घरोघरी जाऊन सादर केली जातात.
स्त्रीचा वेष धारण करण्याचा खास उद्देश हाच असतो की, परंपरा, संस्कृतीचे प्रतीक म्हणून दरवर्षी ही प्रथा गावोगावी जतन केली जाते. प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन होळीच्या दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी देवांची निशाणे नेऊन त्यांचे पूजन केले जाते. त्यानंतर रंगपंचमीपर्यंत जवळजवळ पाच दिवस गोमू, राधानृत्य केले जातात.
पूर्वीच्या प्रथेप्रमाणे स्त्री वेषधारी पुरुष हे नवसाप्रमाणे दरवर्षी ठरवले जातात. विशेषत: कोकणात ही प्रथा दिसून येते. मुंबई चाकरमान्यांची गर्दी यावेळी कोकणात असते. होळी-शिमगोत्सवाला फुलून येणारे कोकण, गजबजणारी घरं, प्रत्येकाच्या घरी घुमणारे ढोल, झांजा, शिमगोत्सवाची गाणी, घुमटावर थाप पडून घराघरांसमोर येणारा घुंगराचा निनाद आणि जपलं जाणारं कोकणच्या वैभवाचं प्रतीक कोकणच्या भूमीत परंपरा जपताना दिसून येतं.
कोकणात स्त्री वेष धारण करून शिमगोत्सवात खासकरून पुरुषांनी स्त्री वेषात होळी ते रंगपंचमी असा सण पार पडेपर्यंत राहावे लागते. यावेळी सलग पाच दिवस त्यांना कायमस्वरूपी मेकअप करूनच वावरावे लागते. पायात घुंगरू, हातात बांगड्या, केसात गजरे, नाकात नथ असा पूर्ण स्त्री वेष धारण करावा लागतो.
आपल्या घरासमोर येणारे राधानृत्य पाहिले की, लहान मुलेच काय मोठ्यांनाही उत्साह वाटतो. घरातील गृहिणी मग ताम्हणामध्ये नारळ, दिवा, हळदी-कुंकू असे ओवाळणीचे साहित्य घेऊन या राधा (कोळीण) यांना मान देऊन ओवाळतात. दारी आलेल्या या रूपाला देवाचे रूप मानले जाते व त्यांचा सन्मान केला जातो. त्यांच्यासाठी खास गजरे, वेण्या बनवून त्यांच्या केसामध्ये माळल्या जातात.
शिमगोत्सव, होळी म्हणजे कोकणचा मानाचा उत्सव असतो. प्रत्येक घरी अंगणात सडा, रांगोळी केली जाते. शिमगोत्सवात लहान मुलांचा सहभाग आवर्जून असतोच असतो. शिमगोत्सवाची गाणी ठरलेली असतात. ही गाणी इतर वेळी कधी कानावर पडणार नाहीत.मात्र शिमगोत्सवातील गाण्यांची लय, ताल, सूर निराळाच दिसून येतो. शिमगोत्सवाचा उत्साह अवर्णनीय असतोच, मात्र एकदा उत्सव संपला की, पुन्हा दुसऱ्या वर्षी होळी कधी येते, याची वाट पाहिली जाते.
गोमू नृत्याची तर शानच निराळी. लांब लांब केसांची गोमू, हातामध्ये लाकडी खंजीर, त्यांच्यासोबत असणारे नाकवा आणि त्यांना साथ देण्यासाठी असणारी त्यांची एकूण टीम असं स्वरूप या नाकवा आणि गोमू नृत्याचं दिसून येतं. यावेळी असणारी गोमू नृत्याची गाणी ही ठरलेलीच असायची. अलीकडे कोळीगीतांचा समावेशही दिसून येतो.
गोमू असो किंवा राधा स्त्री वेषात त्यांचं वावरणं हे देवतेचे प्रतीक मानले जाते. त्यांचा आदर केला जातो. सन्मानपूर्वक त्यांना वागणूक दिली जाते. दरवर्षी नवीन राधा ठरवली जाते किंवा नवसाप्रमाणे प्रत्येकांची पाच वर्षे, एक वर्ष अशी ठरवल्याप्रमाणे त्यांना तो मान दिला जातो.
कोकणात ठिकठिकाणी होळीचा उत्सव साजरा करताना राधा, गोमू नृत्य असतातच असतात. त्याशिवाय होळीचे रंग फिके ठरावेत. कारण प्रथा- परंपरा जपताना प्रत्येक गावची होळी ही आजवर अनोखे वैशिष्ट्य जपणारी ठरली आहे.
गाव कोणताही असो, त्या ठिकाणची होळी आणि वैशिष्ट्यपूर्ण ठरणारी परंपरा ही वर्षानुवर्षे जतन केली जाते. खासकरून गृहिणी यावेळी घरादाराची साफसफाई ते अंगणात सारवण, सडा – रांगोळी करून येणाऱ्या पाहुण्यांचे औक्षण करून स्वागत करताना दिसतात.
उत्सव रंगांचा होळी, आनंदाच्या रंगात रंगणारी होळी… नावीन्याच्या रंगात नेहमीच उमलताना दिसते. या आनंदात सारेच चिंब होऊन जातात. दृष्ट काढावं असं दिसणारं होळी सणातलं साजरं स्त्री रूप हे देखणं तेवढंच मान-सन्मानाचं प्रतीक ठरून जातं हेही नक्कीच!