स्टेटलाइन : सुकृत खांडेकर
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भारतीय जनता पक्षाला सलग दुसऱ्यांदा सत्ता मिळवून दिली आणि राज्याच्या विधानसभा निवडणुकीत नवा इतिहास रचला.
उत्तर प्रदेश हे देशातील सर्वात मोठे राज्य आहे. देशाला सर्वाधिक पंतप्रधान या राज्याने दिले आहेत. केंद्रातील सत्तास्थापनेचा मार्ग हा उत्तर प्रदेशातून जातो, असे म्हटले जाते. या राज्याला अनेक दिग्गज मुख्यमंत्री मिळाले. पण पाच वर्षे पूर्ण करून पुन्हा लागोपाठ मुख्यमंत्री होण्याची संधी आणि मान मतदारांनी केवळ योगी आदित्यनाथ यांना दिला आहे. डॉ. संपूर्णानंद, चंद्रभानू गुप्ता, नारायण दत्त तिवारी, मुलायम सिंग यादव, मायावती असे मुख्यमंत्री या राज्याला मिळाले. मुलायम सिंग व मायावती यांना दोनपेक्षा अधिक वेळा मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली. पण योगी आदित्यनाथ यांना सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होण्याचे जे भाग्य मिळाले, ते त्यांना लाभले नाही. योगींनी निवडणूक काळात चारशे प्रचारसभांमधून भाषणे केली, अडीचशे मतदारसंघांचा दौरा केला. २०२२ मध्ये उत्तर प्रदेश कसा बदलला आहे, पाच वर्षांत डबल इंजिनमुळे विकासकामांना कशी गती आली आहे, हे सांगितले. पण त्यांच्या बोलण्या-वागण्यात कुठेही मुख्यमंत्रीपदाचा अहंकार नव्हता.
२०१७ साली मुख्यमंत्री झाल्यावर २०१९ची लोकसभा निवडणूक ही योगींपुढे मोठी परीक्षा होती. या निवडणुकीत उत्तर प्रदेशातील ८० पैकी ६४ मतदारसंघात भाजपचे खासदार विजयी झाले व योगी यांनी आपली मुख्यमंत्रीपदासाठी पक्षाने केलेली निवड सार्थ असल्याचे सिद्ध करून दाखवले. २०२२च्या विधानसभा निवडणुकीची तयारी भाजपने वर्षभर अगोदरपासून सुरू केली होती. मोदी-योगी पाठमोरे चालले आहेत व योगींच्या खांद्यावर मोदींनी हात ठेवला आहे, असा फोटो निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर व्हायरल झाला. देशाच्या सर्वोच्च नेत्याचा विश्वास योगींनी संपादन केला आहे, हाच संदेश त्यातून जनतेला मिळाला. पंतप्रधानांनी एका जाहीर सभेत, ‘योगी आपके लिए है उपयोगी…’ असे उद्गार काढले होते, ते जनमान्य असल्याचे या निवडणूक निकालाने दाखवून दिले.
पाच वेळा गोरखपूर मतदारसंघातून भाजपचे खासदार म्हणून निवडून गेलेल्या योगींना २०१७मध्ये भाजपने लखनऊला मुख्यमंत्री म्हणून पाठवले, हा योगींच्या जीवनात टर्निग पॉइंट होता. तेव्हा ते विधानसभा किंवा विधान परिषद अशा कोणत्याच सदनाचे सदस्यही नव्हते. मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत त्यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या ३६ हजार कोटी रुपये कर्जमाफीचा निर्णय घेतला. टिंगलखोरांना रोखण्यासाठी अँटी रोमियो स्कॉड, परवडणारी घरे व स्वच्छतागृहे या केंद्राच्या योजनांची धडक अंमलबजावणी, कोरोना काळात १५ कोटी लोकांना मोफत रेशन, अशा अनेक योजनांमुळे सामान्य जनतेला मोठा आधार मिळाला. विधानसभा निवडणुकीत २०१७ प्रमाणेच उत्तर प्रदेशच्या जनतेने भाजपला स्पष्ट जनादेश दिला. भगव्या वस्त्रातील संन्याशाने दुष्ट प्रवृत्ती, समाजकंटक व देशद्रोह्यांवर बुलडोझर चालविण्याचा निर्णय घेतला. योगींच्या जाहीर सभांच्या ठिकाणी बुलडोझर उभे असत. १० मार्चनंतर दुष्टप्रवृत्तींवर पुन्हा बुलडोझर चालून जाईल, असे योगी सांगत. त्याला मतदारांनी प्रचंड दाद आणि साथ दिली.
२०१७च्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा नव्हता. निवडून आलेल्या पक्षाच्या ३१२ आमदारांपैकी कोणालाही मुख्यमंत्री न करता, मोदी-शहा यांनी योगींना थेट लखनऊला पाठवले. भगव्या वस्त्रातील संन्यासी हा भाजपचा देशभरात हिंदुत्वाचा चेहरा म्हणून ओळखला जाऊ लागला. एकीकडे कठोर प्रशासक व दुसरीकडे कल्याणकारी योजना थेट गरिबांच्या घरापर्यंत, अशा कामांमुळे योगींना जनतेने नंबर १ म्हणून पसंती दिली. पाच वर्षांत यूपीतील गुंडागर्दी, माफिया राज, समाजकंटक यांचा बिमोड करण्यासाठी योगींनी ‘बुलडोझर’ हे प्रतीक वापरले. सर्वसामान्य जनतेला बुलडोझरचे आकर्षण वाढले. बाबांचा बुलडोझर हा आपल्या सुरक्षिततेसाठी आहे, अशी भावना महिला वर्गात बळावली. निवडणूक काळात भाजपचे झेंडे लावून बुलडोझर सर्वत्र फिरत होते. त्यातून भाजपची व्होट बँक भक्कम झाली. भाजपचे पावणेतीनशे आमदार विजयी झालेच, पण स्वत: योगी गोरखपूरमधून एक लाखाहून अधिक मताधिक्य घेऊन विजयी झाले.
उत्तर प्रदेशच्या राजकारणात योगींनी अनेक गैरसमज व अंधश्रद्धा आपल्या कामाने दूर केल्या आहेत. नोएडाला भेट देणारा मुख्यमंत्री हा सुरक्षित नसतो, असा समज या राज्यात होता. नोएडाला भेट दिली की, तो मुख्यमंत्री परत सत्तेवर येऊ शकत नाही, असे म्हटले जायचे. नोएडा हे राजधानी दिल्लीच्या सीमेवर असून आयटी, सायबर आणि कॉर्पोरेट कंपन्यांचे मोठे केंद्र आहे. आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञानाने विकसित असलेल्या या शहरात गेले की, आपले मुख्यमंत्रीपद जाते हा समज योगींनी खोटा ठरवला. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव मुख्यमंत्री असताना नोएडाला जाणे टाळत असत. एका समारंभप्रसंगी ते नोएडात न जाता दिल्लीच्या सीमेवर गेले व तेथूनच त्यांनी शिलान्यास केला. वीरबहादूर सिंग मुख्यमंत्री असताना नोएडाला गेले होते आणि त्यानंतर त्यांची मुख्यमंत्रीपदाची खुर्ची गेली.
नारायण दत्त तिवारी मुख्यमंत्री असताना नेहरू पार्कचे उद्घाटन करायला नोएडाला गेले, नंतर काँग्रेसचे सरकार पुन्हा सत्तेवर आलेच नाही. कल्याण सिंग व मुलायम सिंग हे नोएडाला कार्यक्रमासाठी गेले होते आणि योगायोगाने त्यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले. राजनाथ सिंग यांनी मुख्यमंत्री असताना नोएडा येथील एका फ्लायओव्हर ब्रीजचे उद्घाटन केले, पण तेही दिल्लीच्या सीमेवरून. योगी मात्र मुख्यमंत्री म्हणून गेल्या पाच वर्षांत अनेक वेळा नोएडाला गेले. त्यांचे काहीच वाईट झाले नाही. यापूर्वीचे मुख्यमंत्री अयोध्येला जात असत. पण राम मंदिरात जाऊन दर्शन घेण्याचे टाळत असत. राम मंदिराला भेट दिली व पूजा केली, तर मुख्यमंत्रीपद जाईल, अशी भीती या पूर्वीच्या मुख्यमंत्र्यांना वाटत असे. पण हा समजही योगींनी दूर केला. योगी यांनी मुख्यमंत्री म्हणून अनेक नेत्यांसह अयोध्येला जाऊन राम मंदिरात जाऊन अनेकदा पूजा केली आहे. त्यांच्यावर रामलल्ला प्रसन्न झाला व त्यांना सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होण्याचा योग प्राप्त झाला. पाच वर्षांपूर्वी योगींना मुख्यमंत्रीपद देण्याचा जुगार भाजपने खेळला होता. तो यशस्वी तर झालाच, पण योगींनी पक्षाला भरघोस लाभांश मिळवून दिला.