बंगळूरू (वृत्तसंस्था) : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा आणि अंतिम कसोटी सामना (दिवस-रात्र) बंगळूरूतील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. आश्वासक सलामीनंतर रोहित शर्मा आणि सहकाऱ्यांना दुसरीही मॅच जिंकून निर्भेळ विजय (व्हाइटवॉश) नोंदवण्याची संधी चालून आली आहे.
मोहालीतील पहिली कसोटी एकतर्फी झाली. पाहुण्यांनी अवघ्या तीन दिवसांत पराभव पत्करला. मात्र, भारताच्या उंचावलेल्या खेळाकडे दुर्लक्ष करता येणार नाही. रवींद्र जडेजाचा अष्टपैलू खेळ यजमानांच्या विजयाचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले. त्याची १७५ धावांची नाबाद खेळी आणि यष्टिरक्षक, फलंदाज रिषभ पंतच्या ९६ धावांमुळे भारताने प्रथम फलंदाजी करताना ८ बाद ५७४ धावांचा डोंगर उभा केला. हा एकमेव डाव प्रतिस्पर्धी संघासाठी पुरेसा ठरला. त्यानंतर जडेजाने ऑफस्पिनर आर. अश्विनसह श्रीलंकेवर फॉलोऑन लादताना दीड दिवसांत दोनदा बाद करताना झटपट विजय मिळवून दिला.
भारताची सांघिक कामगिरी उंचावली तरी मयांक अगरवालसह कर्णधार रोहित शर्मा या बिनीच्या जोडीसह श्रेयस अय्यरला मोहाली कसोटीत मोठी खेळी करण्यात अपयश आले आहे. गोलंदाजीत उपकर्णधार जसप्रीत बुमराला अपेक्षित मारा करता आलेला नाही. अश्विन-जडेजाच्या रूपाने फिरकी मारा सक्षम असला तरी पाच गोलंदाजांसह खेळताना ऑफस्पिनर जयंत यादवच्या जागी तंदुरुस्त डावखुरा स्पिनर अक्षर पटेलला संधी मिळू शकते.
पाहुण्या श्रीलंकेसमोर मालिका पराभव टाळण्याचे मोठे आव्हान आहे. त्याची मोठी जबाबदारी फलंदाजांवर असेल. प्रथुम निसंका आणि निरोशन डिकवेला वगळता त्यांच्या एकाही फलंदाजाला पन्नाशी पार करता आलेली नाही. त्यातच पाठदुखीमुळे निसंका दुसऱ्या कसोटीत खेळणार नाही. पायाचा घोटा दुखावल्यामुळे दुशमंत चमीरा संघनिवडीसाठी उपलब्ध नाही. त्यामुळे पाहुण्यांच्या अडचणीमध्ये भर पडली आहे. त्यामुळे राखीव क्रिकेटपटूंना संधी मिळू शकते. मात्र, प्राप्त परिस्थितीत भारताच्या फलंदाजांचा आणि गोलंदाजांचा सामना करण्याशिवाय दुसरा पर्याय त्यांच्याकडे नाही.
वेळ : दु. २.३० वा.
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमरा (उपकर्णधार), मयांक अगरवाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, प्रियंक पांचाल, रिषभ पंत (यष्टिरक्षक), आर. अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, अक्षर पटेल, सौरभ कुमार, शुबमन गिल, हनुमा विहारी, उमेश यादव, जयंत जाधव, श्रीकर भरत.
श्रीलंका : दिमुथ करुणारत्ने(कर्णधार), धनंजय डिसिल्व्हा, चरिथ असलंका. दुशमंत चमीरा, दिनेश चंडिमल (यष्टिरक्षक), निरोशन डिकवेला (यष्टिरक्षक), लसित इम्बुलडेनिया, विश्वा फर्नांडो, प्रवीण जयविक्रमा, चमिका करुणारत्ने, लहिरू कुमारा, सुरंगा लकमल, अँजेलो मॅथ्यूज, कुसल मेंडिस, प्रथुम निसंका, लाहिरू थिरिमने जेफ्री वँडर्से.