मुंबई : महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारमधील अनेक नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांची टांगती तलवार असून, काही नेत्यांना अटकही करण्यात आली आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोप होत आहेत. परिवहन मंत्री अनिल परब यांच्या सीएची आयटी चौकशी सुरु असतानाच आज भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा ट्विट करत आता अनिल परबांचा नंबर लागणार असल्याचे त्यात म्हटले आहे.
किरीट सोमय्या यांनी आपल्या ट्विटमध्ये दापोलीतील मुरुड येथील रिसॉर्टचे दोन फोटो शेअर केले आहेत. आता अनिल परब यांचा नंबरही लागणार. अनधिकृत, बेनामी रिसॉर्ट आणि रिसॉर्ट बांधकामासाठी आलेला पैसा या सगळ्यांची चौकशी होणार. भारत सरकारने दापोलीतील न्यायालयात तक्रार दाखल केली असून, या याचिकेवरील सुनावणी ३० मार्च रोजी होणार आहे, असे किरीट सोमय्या यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांचे रिसॉर्ट आणि बंगला बेकायदेशीर असल्याचा दावा केला होता. मुरुड गावात उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय अनिल परब यांनी बेकायदेशीररित्या रिसॉर्ट आणि बंगला बांधला आहे. ज्याची चौकशी सुरु आहे.