मुंबई : मुंबई पोलिसांनी मला नोटीस पाठवली आहे, बीकेसीच्या सायबर पोलीस ठाण्यात उद्या ११ वाजता बोलावले आहे. मी निश्चितपणे उद्या तिथे जाणार आहे. आता जी काही राज्य सरकारची परिस्थिती आहे आणि विशेषत: परवाचा जो षडयंत्राचा भांडाफोड मी स्वत: केला. त्यामुळे राज्य सरकार आणि पोलीस किंवा पोलिसांमधील काही अधिकारी यांना आता त्याचे उत्तर सूचत नसल्याने, अशा प्रकारची नोटीस मला देण्यात आली आहे. मी निश्चितपणे उद्या ११ वाजता बीकेसीच्या सायबर पोलीस स्टेशनला हजर राहील, अशी माहिती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेऊन माध्यमांना दिली. यावेळी त्यांच्यासोबत विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपा नेते आशिष शेलार हे देखील उपस्थित होते.
पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “आज १२ मार्च आहे, आपल्या सर्वांना कल्पना आहे की, मुंबईचा बॉम्बस्फोट हा १२ मार्च रोजी झाला होता आणि आता तीन दशकं झाली तरी त्याचे पडसाद आणि त्याचे घाव हे आपल्या मनावर कायम आहेत. आज एकीकडे १२ मार्च १९९३ रोजी झालेल्या बॉम्बस्फोटात शहीद झालेल्या सर्व मुंबईकरांना मी श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्याचवेळी बॉम्बस्फोटाच्या आरोपींशी व्यवहार करणारे, तुरुंगात जाऊनही महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कायम आहेत, याबद्दल मी खंत व्यक्त करतो.”
ते पुढे म्हणाले की, “मार्च २०२१ मध्ये भाजप कार्यालयात पत्रकार परिषदेत मी महाविकास आघाडीच्या गृहमंत्रालयातील बदल्यांचा घोटाळा बाहेर काढला होता. त्याची सर्व माहिती माझ्याकडे असल्याचेही सांगितले होते. ते गृह सचिवांना देतोय हेदेखील सांगितले होते. त्याच दिवशी मी ही माहिती देशाच्या गृहसचिवांना दिली. त्याचे गांभीर्य ओळखून न्यायालयाने यासंदर्भातील तपास सीबीआयला दिला. या प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे. अनिल देशमुखांचीही चौकशी त्यात आहे,” अशी माहिती राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
आता सायबर सेलकडून देवेंद्र फडणवीस यांना नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकरणात त्यांना रविवारी चौकशीसाठीही बोलावण्यात आले आहे.
जी काय या घोटाळ्याची सगळी माहिती माझ्याकडे होती. ही सगळी माहिती त्याच दिवशी मी दिल्लीला गेलो आणि देशाचे गृह सचिव यांना ही सगळी माहिती मी सादर केली. त्यानंतर त्याचं गांभीर्य ओळखून, न्यायालयाने या संदर्भातील सगळी चौकशी ही सीबीआयकडे सुपूर्द केली आहे आणि आता या बदल्या घोटाळ्याची चौकशी सीबीआय करत आहे. अनिल देशमुखांची देखील चौकशी त्यामध्ये आहे, ते सध्या तुरुंगात आहेत. अनेक महत्वपूर्ण यातील बाबी हळूहळू समोर येत आहेत. मात्र ज्यावेळी ही सगळी चौकशी सीबीआयकडे गेली, त्यावेळी राज्य सरकारने आपला घोटाळा दाबण्यासाठी एक एफआयआर दाखल केला आणि ऑफिशयल सिक्रेट अॅक्ट मधली माहिती लिक कशी झाली? अशा प्रकारचा एफआयआर आहे. या एफआयआरच्या संदर्भात मला पोलिसांकडून उत्तर मागितलं गेलं. मी त्यांना एक उत्तर दिलं होतं की मी याची माहिती आपल्याला देईन. खरंतर पहिल्यांदा विरोधी पक्षनेता म्हणून माझा विशेषाधिकार आहे. माझी माहिती कुठून आली, याचा प्रश्न मला विचारला जाऊ शकत नाही, असे फडणवीस यांनी सांगितले.
तसेच माझ्याकडे ही माहिती कशी आली यापेक्षा हा अहवाल राज्याकडे सहा महिने पडला आहे. त्यांनी यावर कोणतीही कारवाई केली नाही म्हणून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे की ज्यांनी घोटाळा बाहेर काढला त्यांनाच उलट चौकशीसाठी पाचारण केले पाहिजे, असा सवाल फडणवीस यांनी केला.
तसेच न्यायालयानेच ही सर्व माहिती सीबीआयला दिली आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे अधिकृत माहिती, पेनड्राईव्ह, ट्रान्सस्क्रिप्ट राज्याला सीबीआयला सोपवाव्या लागल्यात, त्यामुळे या केसमध्ये अर्थ उरत नाही. सध्या राज्याची जी परिस्थिती आहे आणि परवाचा जो षडयंत्राचा भांडाफोड केला, त्यामुळे मला ही नोटीस देण्यात आली आहे. यावेळी त्यांनी आपल्याला पुणे पोलिसांनी कोणतीही नोटीस दिली नसल्याचे स्पष्ट केले.
याचबरोबर “ तथापि मला पुन्हा एकदा प्रश्नावली पाठवली गेली आणि न्यायालयात सांगण्यात आलं, मला वारंवार उत्तर मागितलं जात आहे आणि मी उत्तर देत नाहीए आणि काल मुंबई पोलिसांनी मला नोटीस पाठवली आहे. याच बदल्यांच्या घोटाळा प्रकरणात त्यांनी दाखल केलेल्या एफआयआरच्या संदर्भात मला उद्या ११ वाजता बीकेसीच्या सायबर पोलीस स्टेशनला बोलावलं आहे. पहिल्यांदा तर मी स्पष्टपणे सांगतो, जरीही मला विशेषाधिकार आहे आणि माझ्या माहितीचा स्त्रोत हा विचारला जाऊ शकत नाही. दुसरं असं आहे, ही सगळी माहिती मी थेट देशाच्या गृह सचिवांना दिली आहे. त्यातली कुठलीही माहिती मी बाहेर येऊ दिली नाही. या उलट जी माहिती बाहेर आली, ती राज्य सरकारच्या मंत्र्यांनी त्या दिवशी माध्यमांना दिली. ज्याचे पुरावे माझ्याजवळ आहेत. तथापि मी स्वत: त्या ठिकाणी जाणार आहे आणि पोलीस जी काही चौकशी करतील, त्याला योग्य ते उत्तर मी देणार आहे. याचं कारण मी राज्याचा गृहमंत्री देखील राहिलेलो आहे. त्यामुळे पोलिसांनी चुकीची केस केलेली असली तरी देखील त्यांनी तपासात माझं सहाय्य मागितलं आहे, तर मी ते निश्चितपणे देईन. माझी अपेक्षा एवढीच आहे, की माहिती बाहेर कशी आली? याचा तपास करण्यापेक्षा योग्यवेळी कारण सहा महिने सरकारकडे हा अहवाल पडला होता. त्या अहवालात कोणी किती पैसे दिले आहेत. कोण पैसे देऊन कुठल्या पोलीस स्टेशनला गेलं आहे किंवा कोण कुठल्या जिल्ह्यात गेलं आहे. अशी सगळी संवेदनशील माहिती असताना, सहा महिने त्यावर कुठलीही कारवाई सरकारने त्यावर का केली नाही, असा सवालही फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केला.