मुंबई : मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांची सीबीआयकडून चौकशी करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, संजय पांडे यांची सीबीआयने जवळपास सहा तास चौकशी केली. यात त्यांना अनेक प्रश्न विचारण्यात आल्याचे समजते.
सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांची सीबीआयकडून जवळपास सहा तास चौकशी करण्यात आली. महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात चौकशी सुरू आहे. त्या प्रकरणात पांडे यांची चौकशी करण्यात आल्याचे कळते. याबाबत अधिकाऱ्यांनी शनिवारी माहिती दिली आहे. अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपये वसुलीचा आरोप आहे. त्यासंबंधी ही चौकशी करण्यात आली. माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना या प्रकरणात प्रभावित केल्याचा आरोप आहे. दरम्यान, सीबीआयने अनिल देशमुख यांच्याविरोधात कथितरित्या गुन्हेगारी कट रचल्याप्रकरणी विविध कलमान्वये आणि भ्रष्टाचार प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे.
मुंबई पोलीस आयुक्तपदावरून हटवल्यानंतर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून यासंबंधी आरोप केले होते. देशमुख यांनी कथितरित्या मुंबई पोलीस विभागातील बडतर्फ अधिकारी सचिन वाझे याला मुंबईच्या बार आणि रेस्तराँमधून एका महिन्यात १०० कोटी रुपयांहून अधिक वसुली करण्यास सांगितले होते, असा आरोप त्यांनी केला होता. प्राथमिक चौकशीत महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि इतर व्यक्तींनी चुकीच्या पद्धतीने आणि भ्रष्टाचाराच्या मार्गातून लाभ मिळवण्याचा प्रयत्न केल्याचा दिसून येत असल्याचा आरोप सीबीआयकडे दाखल एफआयआरमध्ये करण्यात आलेला आहे.