नवी दिल्ली : आयसीसी महिला वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाने वेस्ट इंडिजचा पराभव करून दणदणीत विजय मिळवला. भारतीय महिला संघाने 155 धावांनी वेस्ट इंडिज महिला संघावर विजय मिळवला. या विजयामुळे भारत गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे.
हा सामना हॅमिल्टन सेडन पार्क येथे खेळण्यात आला. नाणेफेक जिंकत भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने 50 षटकात 8 विकेट्स गमावून वेस्ट इंडिजला 318 धावांचे लक्ष्य दिले होते. मात्र, वेस्ट इंडिज महिला संघाला हे लक्ष्य पूर्ण करण्यात अपयश आले. वेस्ट इंडिजने 40.3 षटकांत 162 धावा केल्या.
हरमनप्रीत कौर आणि स्मृती मानधना या सामन्याच्या शिल्पकार ठरल्या. हरमनप्रीतने 107 बॉल्समध्ये 109 धावा केल्या. तर, मंधानाने 119 बॉलमध्ये 123 धावा केल्या. यामध्ये 13 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश आहे.