Tuesday, April 22, 2025
Homeदेशभाजपला पराभूत करण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यायलाच हवे

भाजपला पराभूत करण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यायलाच हवे

ममता बॅनर्जींचा हल्लाबोल

काँग्रेसची वाट पाहण्यात आणि काँग्रेसवर अवलंबून राहण्यात आता अर्थ नाही

कोलकाता : भाजपविरोधात लढा देण्यास इच्छुक असलेल्या सर्व राजकीय पक्षांनी एकत्र काम केले पाहिजे. काँग्रेसवर अवलंबून राहण्यात आता अर्थ नाही, असे तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. देशात झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपला चार राज्यात मोठे यश मिळाले आहे. यानंतर काँग्रेसवर चौफेर टीका होत असताना ममता बॅनर्जी यांनीही काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे.

काँग्रेस आता सगळीकडे पराभूत होत चालली आहे. काँग्रेसला आता जिंकण्यात काही स्वारस्य राहिलेले आहे, असे दिसत नाही. काँग्रेसची विश्वासार्हता संपत चालली आहे आणि आता त्यांच्यावर अवलंबून राहण्यात अर्थ नाही, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले.

काँग्रेस आधी जिंकत असे, कारण काँग्रेस पक्षाचे संघटन चांगले होते, असे सांगत भाजपविरोधी गटामध्ये काँग्रेसला एकत्र ठेवण्यात अर्थ नाही. कारण ती गोष्ट आता काँग्रेसमध्ये राहिली नाही, असा टोलाही ममता बॅनर्जी यांनी लगावला. अनेक मजबूत प्रादेशिक पक्ष आहेत आणि ते एकत्र आले तर अधिक प्रभावी होतील. आता काय करायचे आहे हे काँग्रेसने ठरवायचे आहे. पण भाजपला पराभूत करण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यायला हवे, असे मला वाटते. काँग्रेसची वाट पाहण्यात अर्थ नाही, असेही ममता बॅनर्जी म्हणाल्या.

विरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावण्याची तुमची योजना आहे का, या प्रश्नावर बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, ते इतरांना ठरवू द्या. स्टॅलिन आणि के. चंद्रशेखर राव यांनी गेल्या महिन्यात फोनवरील संभाषणात हा प्रस्ताव मांडला होता, अशी माहिती बॅनर्जी यांनी दिली. तत्पूर्वी, तृणमूल काँग्रेसवर पलटवार करताना, केंद्रातील मोदी सरकार आणि भाजप काँग्रेसमुक्त भारताचे नारे देतात, तर दुसरीकडे ममता बॅनर्जी काँग्रेसशिवाय विरोधकांची आघाडी करू इच्छिते, असा दावा काँग्रेसकडून करण्यात आला आहे.

दरम्यान, भाजपला राष्ट्रीय पातळीवर लढा देण्यात काँग्रेसला अपयश आले आहे. काँग्रेस पक्षाचे तृणमूल काँग्रेस पक्षात विलीन होण्याची वेळ आली आहे. काँग्रेसने तृणमूलमध्ये विलीन होऊन पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्त्वाखाली काम करावे. हीच योग्य वेळ आहे, असे तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी सांगत काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -