मुंबई : मुंबईतील गिरण्यांचे भोंगे कुणी बंद केले? गिरण्यांच्या जागांसाठी नियमावली कुणी बदलली? गिरणी कामगार कुठे गेला? कोळीवाडे गावठाणांची स्वतंत्र नियमावली कोणी रोखली? असे अनेक प्रश्न उपस्थित करीत नटसम्राट नाटकातील आप्पा बेलवलकरांप्रमाणे मुंबईतील मराठी माणूस शिवसेनेला विचारतोय टू बी ऑर नॉट टू बी? त्याला शिवसेना सांगतेय “तो मी नव्हेच” अशी टीका भाजपा नेते आमदार अॅड आशिष शेलार यांनी वरळी येथे केली.
वरळी कोळीवाड्यात शुक्रवारी भाजपातर्फे मराठी कट्ट्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार सुनील राणे आणि पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आ. शेलार म्हणाले की, भाजपाची सत्ता असताना मुंबईतील गावठाण आणि कोळीवाड्यांचे सीमांकन झालं पण सरकार बदललं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार गेले माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार आले, त्यानंतर सिमांकन बंद झालं. एवढंच नाही तर गावठाण आणि कोळीवाडा मध्ये राहणाऱ्यांचे परिवार वाढला मुलं मोठी झाली, मुंबईबाहेर घर घेण्याची ऐपत आहे म्हणून घर वाढवायचे असेल तर परवानगी मिळत नाही, घर दुरुस्ती करता येत नाही. महापालिका अधिकारी लगेच हातोडा घेऊन येतात. दुरुस्ती व देखभाल करायची असेल तर साधा नियम सुद्धा नाही त्यासाठी आम्ही संघर्ष करतोय पण सरकार परवानगी देत नाही. दुसरीकडे कोळीवाडे गावठाणांना झोपडपट्टी जाहीर करण्यात आले ही वस्तुस्थिती समजून घ्या, असे आवाहन त्यांनी केले. तशीच परिस्थिती मच्छीमार महिलांची आहे. त्यांना मच्छीमार्केट मध्ये लायन्स दिली नाही. त्यासाठी नियम बनवला नाही. वरळी कोळीवाड्यातील मच्छीमार कोस्टल रोगमुळे त्यांची मासेमारी कशी धोक्यात आलेय सांगून आंदोलन करीत आहेत पण वरळीचे आमदार आणि पर्यावरण मंत्र्यांना यांना भेटायला वेळ नाही.
मुंबईमध्ये मराठी शाळांची स्थिती गेल्या पंधरा वर्षांमध्ये एक हाती सत्ता एका परिवाराची शिवसेनेची असताना मुंबईच्या महानगरपालिकेच्या मराठी अनुदानित शाळा 221 बंद पडल्या. एस एस सी बोर्डा ऐवजी सीबीएससी बोर्ड आणले. मुंबई महानगरपालिकेच्या शाळांना नाव दिलं मुंबई पब्लिक स्कूल मग तुम्ही मराठीचे कैवारी कसे ? असा सवाल करीत महापालिकेतील शिवसेनेच्या कारभारावर जोरदार टीका केली.
शिवसेना हिंदूहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना होती त्यावेळी समाजकारण 80 टक्के आणि राजकारण 20 टक्के होतं, आजच्या शिवसेनेचा स्वरूप माझे कुटुंब माझी जबाबदारी एवढीच सिमीत आहे असे सांगत त्यांनी मुंबईकरांच्या विषयावर शिवसेनेने कसा अन्याय केला याबाबत सविस्तर उहापोह केला.