मुंबई (प्रतिनिधी) : नुकत्याच रंगतदार झालेल्या गोवा विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला मोठा विजय मिळाला आहे. पूर्ण बहुमत नसले, तरी सत्तास्थापनेसाठी दावा करण्याइतपत यश भाजपच्या पारड्यात मतदारांनी टाकले आहे. या पार्श्वभूमीवर ‘गोवा – उत्तर प्रदेश झांकी है, महाराष्ट्र अभी बाकी है’, अशी विधाने महाराष्ट्रातील भाजप नेत्यांकडून केली जात आहेत. भाजपच्या नेतेमंडळींनी केलेल्या अशा विधानांमुळे तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
यासंदर्भात देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, ‘या विजयानंतर महाराष्ट्रात भाजपवर विश्वास वृद्धिंगत होईल. कार्यकर्त्यांचे नीतीधैर्य वाढत जाईल. जनतेच्याही नीतीधैर्यात फरक पडेल. पण भाजपला पूर्णपणे निवडून आणण्यासाठी आमची २०२४ साठीची तयारी सुरू आहे. दरम्यानच्या काळात सरकार पडले, तर आम्ही आमचे सरकार बनवू. लोकांच्या मनात अशा विजयांमुळे एक प्रकारची सकारात्मकता तयार होते’.
गोव्यात आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांनी सेना-राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मोठी सभा घेतली होती. त्यानंतर देखील या युतीला गोव्यात खाते उघडता आले नसल्याची चर्चा सुरू आहे. यासंदर्भात फडणवीसांनी खोचक टोला लगावला आहे. ‘आदित्य ठाकरेंनी, संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात खूप मोठी सभा घेतली होती. आमचे मुख्यमंत्री पडणार असे देखील म्हटले होते. पण प्रमोद सावंतांच्या विरोधातील त्यांच्या उमेदवाराला फक्त ९७ मते मिळाली आहेत’, असे फडणवीस म्हणाले.
जब तक शिवसेना का सुपडा साफ नहीं करता…
चित्रा वाघ यांचा संजय राऊतांना खोचक टोला
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी या निकालांवरून थेट संजय राऊत आणि शिवसेनेवर खोचक शब्दांत निशाणा साधला आहे. ‘सर्वज्ञानींच्या झंझावाती प्रचारदौऱ्यांचा परिणाम : …शिवसेनेच्या गोवा, यूपीमधल्या सगळ्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होताना दिसत आहे. झुकेगा नहीं…जबतक महाराष्ट्र में इसी तरह शिवसेना का सुपडा साफ नहीं करता… इति सर्वज्ञानी’, असे चित्रा वाघ यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे. या ट्वीटमध्ये चित्रा वाघ यांनी संजय राऊतांना देखील टॅग केले आहे. शिवसेनेने उत्तर प्रदेश, गोवा आणि मणिपूरमध्ये उमेदवार उभे केले होते.