अभय दातार, मुंबई ग्राहक पंचायत
मध्यंतरी काही सेलेब्रिटी, पत्रकार, अशांनी केलेल्या ट्वीटमुळे सगळीकडे एकच खळबळ माजली. आपण न घेतलेले कर्ज आपल्या नावावर आले कसे, या आशंकेने उडालेली ही खळबळ होती. जानेवारी – फेब्रुवारी २०२२ मध्ये या प्रकरणाला अचानक वाचा फुटली. अनेक वर्तमानपत्रांनी (बहुतांशी इंग्रजी वर्तमानपत्रे) या घोटाळ्याची दखल घेऊन ज्यांची फसवणूक झाली आहे, त्यांच्याशी बातचीत केली. नक्की काय झाले? एका प्रतिथयश बिगर बँकिंग वित्त कंपनीने ‘धनी’ नावाचे एक मोबाइल अॅप विकसित केले आहे. या अॅपमार्फत कर्ज मिळण्यासाठी अर्ज करता येतो. पॅन कार्डवर असलेल्या माहितीचा गैरवापर करून ही कर्जे घेतली गेली असे प्रथमदर्शनी दिसले. वाढत्या गरजांमुळे जनतेचा कर्ज घेण्याचा कलही वाढत चालला आहे. अनेक जण अशावेळी आपले पत गुणांकन (क्रेडिट स्कोअर) काय आहे ते सिबिल किंवा तत्सम अन्य कंपन्यांच्या संकेतस्थळावर जाऊन पाहतात किंवा ज्या बँकेत कर्जासाठी अर्ज केला आहे, ती बँकही या गुणांकनाची पडताळणी करते. तेव्हा बऱ्याच जणांच्या लक्षात आले की, त्यांनी ज्या कर्जासाठी अर्जही केला नव्हता, कोणत्याही कागदपत्रांवर सह्या केल्या नव्हत्या, अशी कर्जे त्यांच्या नावावर आहेत! अधिक चौकशी करता असे लक्षात आले की, बहुतांश लोकांचा पॅनकार्डचा तपशील वापरून अनोळखी लोकांच्या नावे ही कर्जे दिली गेली आहेत. पॅनकार्ड ज्यांच्या नावे आहे, त्यांना याबाबत काहीही विचारले गेलेले नव्हते किंवा त्यांची संमतीही घेण्यात आलेली नव्हती.
एका पत्रकाराने त्याच्या ट्विटरवर लिहिले की, “माझा क्रेडिट रिपोर्ट पाहिल्यावर मला धक्काच बसला. आयव्हीएल नावाच्या एका वित्त कंपनीने माझे पॅनकार्ड आणि माझे नाव वापरून कर्जे दिलेली दिसली आणि पत्ते चक्क उत्तर प्रदेश, बिहार येथील होते. मला कोणताही सुगावा लागला नाही. हे होऊच कसे शकते?” हिंदी चित्रपटसृष्टीतील एका प्रसिद्ध अभिनेत्रीने म्हटले की, “कोणातरी बदमाशाने माझ्या नावावर कर्ज घेऊन माझा सिबिल स्कोअर खराब केला आहे. हे धक्कादायक आहे.” बहुतेकांचे म्हणणे आहे की, त्यांनी ‘धनी’ अॅपमार्फत कधीच कर्जासाठी अर्ज केला नाही. तरीही त्या कंपनीमार्फत पैसे परत करण्यासाठी तगादा लावला जात आहे. वारंवार फोन केले जात आहेत. अनेकांनी धनी, रिझर्व्ह बँक, अर्थ मंत्रालय इत्यादींना लक्ष्य करून म्हटले आहे की, ते मोठ्या प्रमाणावर झालेल्या डेटा चोरीचे बळी आहेत.
“ही डेटा चोरी आहे किंवा कसे, याबद्दल आम्ही तपास करीत आहोत आणि तसे आढळल्यास या नोंदी दुरुस्त केल्या जातील,” असे कंपनीचे म्हणणे आहे. पूर्वी ‘इंडियाबुल्स कन्झ्युमर फायनान्स लिमिटेड’ या नावाने आणि आता ‘धनी’ या नावाने ओळखली जाणारी ही कंपनी वैयक्तिक कर्जे तसेच छोट्या-मोठ्या व्यवसायांसाठी कर्ज देते, इतरह काही आर्थिक सेवा देते. मात्र ही कंपनी ठेवी स्वीकारत नाही. कर्ज मिळवण्यासाठी या कंपनीचे ‘धनी’ याच नावाचे करावे लागते. ते वापरण्यासाठी आपल्या आधार/पॅनकार्डचा तपशील भरावा लागतोवे द्यावे लागतात. आपले बँक खाते कोणत्या बँकेत, कोणत्या शाखेत आहे, खात्याचा क्रमांक काय, ही माहितीसुद्धा भरावी लागते. एका निरीक्षणानुसार गुगल प्ले स्टोअरमधून आतापर्यंत सुमारे पाच कोटी वेळा हे अॅप डाऊनलोड केले गेले आहे.
राजशेखर राजहरीया हे सायबर सुरक्षा या विषयातील एक तज्ज्ञ आहेत. त्यांनी म्हटल्याप्रमाणे मागील वर्षी, म्हणजे २०२१ साली काही सायबर चाच्यांनी लाखो पॅनकार्ड्सचा तपशील चोरला आहे. हा तपशील आपल्याच देशातील एका कंपनीच्या सर्व्हरमधून चोरला गेला असे त्यांनी फेब्रुवारी, २०२१ साली आपल्या ट्वीटरवर म्हटले आहे. त्यापैकी एकाने भामट्यांना सुमारे दीड लाख पॅन कार्ड्सच्या डेटाची विक्री केली आहे. यात सायबर गुन्हेगार आणि इतरही काही लोक आले. या लोकांनी मिळालेल्या माहितीचा दुरुपयोग करून धनी अॅपद्वारे कर्ज मिळवले आहे आणि अजूनही अनेक जणांना आपल्या नावे कर्ज घेतल्याची खबरही लागलेली नाही. सर्व संबंधित यंत्रणांनी हे प्रकरण अतिशय गंभीरपणे घेऊन सखोल चौकशी करायला हवी आणि गुन्हेगारांना लवकरात लवकर पकडायला हवे, अशी मागणी राजशेखर यांनी केली आहे.
हे सर्व झाले. पण वाचकांपैकी कोणाच्या बाबतीत हे घडले असेल, तर त्यांनी काय करावे? तर सर्वप्रथम ‘धनी’ कंपनीकडे तक्रार दाखल करावी. जवळच्या पोलीस ठाण्यातही तक्रार नोंदवावी. तसेच आपल्या शहरात आर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग असेल, तर तिथेही तक्रार दाखल करावी. मुंबईमध्ये हा विभाग दक्षिण मुंबईतील जी. टी. रुग्णालय आणि क्रॉफर्ड मार्केटजवळ आहे. ज्यांना शक्य असेल, त्यांनी तातडीने या विभागात जावे व सर्व तपशील सादर करावा.