Monday, July 1, 2024
Homeदेशभ्रष्टाचाराविरोधातील लढाई सुरूच राहणार : पंतप्रधान नरेंद्र मोदी

भ्रष्टाचाराविरोधातील लढाई सुरूच राहणार : पंतप्रधान नरेंद्र मोदी

काहींकडून केंद्रीय तपास यंत्रणांवर दबाव आणण्याचा प्रयत्न

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ‘भ्रष्टाचाराच्या विरोधात लढाई सुरू केल्यानंतर ज्यांच्यावर कारवाई केली जात आहे, त्यांच्याकडून केंद्रीय तपास यंत्रणांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातो’, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या नेत्यांना लगावला आहे. पाचपैकी चार राज्यांमध्ये भाजपने मिळविलेल्या नेत्रदीपक यशानंतर दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हणाले, ‘‘केंद्र सरकारने भ्रष्टाचाराच्या विरोधात लढा पुकारला आहे. राजकारणाच्या आडून अनेकांनी पैसा कमावला. अशा लोकांवर आता कारवाई केली जात आहे. ज्यांच्यावर कारवाई केली जाते त्यांच्याकडून केंद्रीय तपास यंत्रणांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केले जातात. पण लोकांचा केंद्र सरकारवर विश्वास आहे. मोदी सरकार देशातील भ्रष्टाचार संपवणार असा त्यांना विश्वास आहे. लोकांचा विश्वास असल्याने केंद्र सरकार भ्रष्टाचाराविरोधातील लढाई सुरूच ठेवणार’.

उत्तर प्रदेशसह चार राज्यांत विराट विजय मिळवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी भाजप कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी जनता जनार्दनाचे आणि कार्यकर्त्यांचे मोदींनी आभार मानले. चार राज्यांत मिळालेल्या दणदणीत विजयानंतर आगामी लोकसभा २०२४ च्या निवडणुकीसंदर्भात यावेळी मोदींनी मोठे वक्तव्य केले आहे. याआधी २०१७ च्या यूपी निवडणूक निकालाने २०१९ची दिशा ठरवली होती. आता २०२२च्या निवडणूक निकालाने आगामी २०१४ चे भविष्य निश्चित केले आहे, असे मोदी म्हणाले.

पाच राज्यांच्या निवडणुकींचे निकाल समोर आले आहेत. यात भाजपने दणदणीत यश मिळवले आहे. पाचपैकी चार राज्यात भाजपने पुन्हा निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. भाजपच्या दणदणीत विजयाचे सेलिब्रेशन राजधानी नवी दिल्लीच्या भाजप मुख्यालयात पार पडले. या सोहळ्याला पंतप्रधान मोदींची प्रमुख उपस्थिती होती. मोदींबरोबर, भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आदी उपस्थित होते.

मोदी म्हणाले, ‘२०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीत लोकांनी पुन्हा भाजपला सत्तेत बसवले. पण राजकीय विश्लेषक म्हणत होते, की हे आधीच ठरले होते, ज्यावेळी २०१७ मध्ये यूपीचा निकाल आला होता. योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली तेव्हा भाजपला यश मिळाले होते’.

एकंदरित पंतप्रधान मोदींना हे सूचित करायचे होते की, २०२२ ला पुन्हा योगी सत्तेत आलेत, म्हणजेच २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा भाजपचे सरकार येईल.

‘उत्तर प्रदेशच्या जनेतला आतापर्यंत फक्त जातीयवादात बांधून ठेवले होते. जातीवादी म्हणत उत्तर प्रदेशला बदनाम केले होते. पण आज यूपीच्या जनतेने सगळ्यांना रोखठोक प्रत्युत्तर दिले आहे. आता विरोधकांना विकासाचा नव्याने विचार करावा लागेल’, असा टोला मोदींनी विरोधकांना लगावला.

मोदी म्हणाले, ‘गरिबांच्या घरी विकासाची गंगा पोहोचवल्याविना मी शांत बसणारा व्यक्ती नाही. सरकार चालविताना किती अडचणी येतात, हे मला माहीत आहे. तरीही मी हिम्मत केली, ती हिम्मत लाल किल्ल्यावरून केली. त्यावेळी मी म्हटले होते, भाजपला जिथे जिथे सेवा करण्याची संधी मिळेल, तिथे प्रत्येक गरिबाच्या घरी, अगदी तळातल्या व्यक्तीपर्यंत विकासाची गंगा पोहोचली पाहिजे. आज निवडणुकीचे निकाल पाहताना, माझे स्वप्न सत्यात उतरल्याचा आनंद होत आहे. महिला, युवक, कष्टकरी सगळ्यांनीच भाजपवर विश्वास ठेवला.

ज्यांनी ज्यांनी भाजपला मतदान केले, त्यांचे मी आभार मानतो. भाजपच्या बंपर विजयाला तुम्ही सगळे जबाबदार आहात. कार्यकर्ते भाजपच्या विजयाचे सारथी बनले. कार्यकर्त्यांनी दिवस – रात्र काम केल्याने हा विजय शक्य झाला आहे’.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -