Saturday, June 29, 2024
Homeमहत्वाची बातमीमोदींमुळे भाजपला मोठा विजय

मोदींमुळे भाजपला मोठा विजय

रामदास आठवले यांचे प्रतिपादन

शिवसेनेची अवस्था काँग्रेससारखीच दयनीय होईल

नाशिक (प्रतिनिधी): पाच राज्यांतील निवडणूक निकालानंतर भारतीय जनता पक्ष व मित्र पक्षांचे नेते अधिकच आक्रमक झाले असून त्यांनी विरोधकांवर शाब्दिक हल्ले चढवायला सुरुवात केली आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार विशेषत: शिवसेना व राष्ट्रवादी हे पक्ष भाजप आणि मित्रपक्षांच्या रडारवर आहेत. केंद्रीय सामाजिक न्यायराज्यमंत्री रामदास आठवले यांनी निवडणूक निकालांचे विश्लेषण करताना शिवसेनेवर बोचरी टीका केली आहे. ‘शिवसेनेची अवस्था देखील काँग्रेससारखीच दयनीय होणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत या पक्षाच्या तीन ते चार जागा तरी निवडून येतील की नाही ही शंका आहे,’ असे ते म्हणाले. तसेच ‘शिवसेना-भाजपने एकत्र यायला हवे. सत्तावाटपाचे अडीच – अडीच वर्षांचे सूत्र ठरवायला हवे. संजय राऊत किंवा शिवसेनेचे इतर खासदार भेटले की मी त्यांना सूचना करत असतो’, असेही आठवले यांनी सांगितले.

ते म्हणाले की, चार राज्यांमध्ये भाजपचा विजय झाला असून त्यात मोठा हात हा नरेंद्र मोदींचा आहे. त्यांनी वेगवेगळे योजना नागरिकांच्या विकासासाठी तयार केल्या आणि त्या प्रत्यक्षात अंमलबजावणीसाठी आणल्या. म्हणूनच भाजपचा विजय झाला असे सांगून ते म्हणाले की ‘उत्तर प्रदेश मे योगी आदित्यनाथ यांनी गुंडाराज संपवले आणि विकासाचे राजकारण केले. विकासाची दिशा उत्तर प्रदेश मध्ये सुरू केली, म्हणूनच उत्तर उत्तर प्रदेशमध्ये भाजपचा पुन्हा एकदा मोठा विजय झाला आहे’. पंजाब मध्ये ‘आप’ला सत्ता मिळाली असून मी जे समीकरण मानले होते ते समीकरण चुकीचे ठरले याचा खेद वाटतो, असे सांगून ते म्हणाले ‘पंजाबमधील विजयाबद्दल आपचे नेते अरविंद केजरीवाल यांचे मनापासून अभिनंदन करीत आहोत. पंजाबमध्ये लोकशाहीचा कल हा आम्हाला मान्य आहे. तसेच आगामी २०२४ च्या निवडणुकीत भाजपला ४०० जागा मिळतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. ते म्हणाले की, पंजाबमध्ये मोदींनी शेतकऱ्यांसाठी कायदे मागे घेतले आणि लोकांना काँग्रेस नको होती. पण त्यामध्ये भाजपाची ताकद कमी पडली याचा खेद वाटतो आहे. परंतु पुढील वेळी भाजपच्या माध्यमातून अधिक प्रयत्न करू आणि ‘आप’ला सत्तेतून बाहेर काढू’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

नाशिकमध्ये ते पत्रकारांशी बोलत होते. ‘काँग्रेस पक्षाला नेतृत्व मिळणे अशक्य आहे. राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला यश मिळणे अशक्य आहे. प्रियांका गांधी यांचीही जादू उत्तर प्रदेशमध्ये चाललेली नाही. काँग्रेसला नवीन नेतृत्वाची गरज आहे. पण त्या पक्षात सक्रिय असा नेताच नाही. हा पक्ष दिसेनासा झाला आहे. काँग्रेसला भवितव्य नाही’, असे मत आठवले यांनी व्यक्त केले. काँग्रेसवर टीका करताना आठवले यांनी शिवसेनेवरही तोंडसुख घेतले.

…म्हणून ईडीचे छापे पडतायत!

‘महाविकास आघाडीच्या नेत्यांवरच ईडीचे छापे पडत आहेत, असे नाही. व्यवहारात अनियमितता आहे म्हणून छापे पडत आहे. त्याच्याशी सरकारचा काहीही संबंध नाही. आम्हाला कुणाला त्रास द्यायचा नाही. चुकीच्या पद्धतीने पैसे कमावलेले नेते जेलमध्ये जातील’, असेही ते म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -