Saturday, July 13, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखबाबांचा बुलडोझर, विरोधकांवर भारी…

बाबांचा बुलडोझर, विरोधकांवर भारी…

उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, पंजाब आणि मणिपूर या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका म्हणजे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचा ट्रेलर असेल, असे विरोधी पक्षाने म्हटले होते. उत्तर प्रदेशात तर परिवर्तन अटळ आहे, अशी फुशारकी अखिलेश यादव, शरद पवारांपासून आदित्य ठाकरेंपर्यंत सर्वांनी मारली होती. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने अन्य राज्यात पक्ष विस्ताराची संधी शोधली आणि उत्तर प्रदेश व गोव्यात निवडणूकही लढवली. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या करिष्म्यापुढे आणि अमित शहा आणि जे. पी. नड्डांच्या संघटन कौशल्यापुढे काँग्रेस, सपा, बसप, एमआयएम, तृणमूल काँग्रेस सारेच विरोधक साफ झाले. अखिलेश यादव यांनी यंदाची निवडणूक जिंकण्यासाठी सर्वस्व पणाला लावले होते. हिंदू विरोधी मतांना एकत्र करून आणि भाजप विरोधकांची मोट बांधून योगींच्या नेतृत्वाखालील भाजपला हटविण्याचा चंग बांधला होता. पण जनतेत बाबा म्हणून लोकप्रिय असलेल्या योगींचा बुलढोझर सायकल, पंजा आणि हत्तीला फारच भारी पडला आणि सलग दुसऱ्यांदा भाजपने देशातील या सर्वात मोठ्या राज्याची सत्ता काबीज केली.

एखादा अपवाद वगळता उत्तर प्रदेशात कोणत्याही पक्षाच्या सरकारला दुसऱ्यांदा सलग सत्ता मिळाली नाही किंवा कोणीही निवडणुकीनंतर पुन्हा मुख्यमंत्री झाला नाही. योगी आदित्यनाथ यांनी या राज्यात इतिहास रचला आहे असेच म्हणावे लागेल. योगीबाबा पुन्हा मुख्यमंत्री होतील, असे भाजपने निवडणूक प्रचाराला सुरुवात करतानाच जाहीर केले होते. गोव्यातही भाजपची पुन्हा सत्ता स्थापन होत आहे. गेल्या वेळी बहुमत नसताना काँग्रेस व अन्य पक्षांच्या आमदारांची तोडफोड करून भाजपने सत्ता काबीज केली असा आरोप झाला होता, यावेळी भाजपला बहुमताकडे गोव्यातील जनतेने नेले आहे आणि मावळते मुख्यमंत्री प्रमोद सावंत हेही या निवडणुकीत विजयी झाले आहेत. पंजाबमध्ये आपने दोन तृतियांश जागा जिंकून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. पंजाबमध्ये भाजपची शक्ती मर्यादित आहे. शिरोमणी अकाली दलाने तीस वर्षे असलेली भाजपची मैत्री शेतकरी कायद्याचे निमित्त सांगून तोडली, त्याचा तोटा अकाली दलाला झाला आणि हा पक्ष तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला. पंजाबच्या निवडणुकीत चार माजी मुख्यमंत्र्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आणि आपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार भगवंत मान विजयी झाले. उत्तराखंडमध्ये मावळते मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी पराभूत झाले. पण भाजपने या राज्यात आपली सत्ता कायम राखली. पंजाब वगळता अन्य चार राज्यांत भाजपला सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. चार राज्यांत भाजपचे सरकार येईल, असे नड्डा व शहा यांनी निवडणूक काळात ठामपणे सांगितले होते, त्यांचे म्हणणे खरे ठरले आहे.

केंद्रात मोदी व राज्यात योगी अशा डबल इंजिनचा लाभ उत्तर प्रदेशच्या विकासासाठी गेली पाच वर्षे झालाच, पण निवडणुकीत त्याचा राजकीय लाभही भाजपला झाला हे निकालाने दाखवून दिले आहे. गेल्या वेळी २०१७ मध्ये भाजपने मित्र पक्षांसह ३१२ जागा जिंकल्या होत्या. ४०३ जागांच्या विधानसभेत बहुमतासाठी २०२ जागा जिंकणे आवश्यक आहे. भाजपने जेव्हा अडीचशे जागांच्या पलीकडे आघाडी घेतली तेव्हाच लखनऊच्या भाजपच्या प्रदेश कार्यालयासमोर बुलढोझर आया है, अशा घोषणा देत जल्लोश सुरू झाला. राजधानी दिल्लीच्या सीमेवर शेतकरी कायद्याच्या विरोधात वर्षभर झालेल्या आंदोलनात पश्चिमी उत्तर प्रदेशातील शेतकरी मोठ्या संख्यने सहभागी झाले होते. त्याचा फटका या निवडणुकीत भाजपला बसेल, अशी विरोधी पक्षांनी अटकळ बांधली होती. पण या प्रदेशातूनही भाजपला घवघवीत यश मिळाले. लखनऊ, आगरा, मथुरा, नोएडा, अयोध्या, हाथरस, लखीमपूर, गोरखपूर, रायबरेली, सहारनपूर, प्रतापगड, कन्नोज अशा सर्व ठिकाणी भाजपने आघाडी घेतली, त्याने सपाचे गणित कोलमडले. भाजप व काँग्रेसच्या विरोधात स्थापन केलेल्या व दलितांचा पक्ष म्हणून संघटना उभारलेला बहुजन समाज पक्ष या निवडणुकीत अस्ताकडे चालला आहे, असे जाणवले. २०१७ पेक्षाही कमी जागा या पक्षाला मिळाल्या. मायावती, अखिलेश, प्रियंका वढेरा यांचा प्रचार कमळापुढे निष्प्रभ ठरला. योगींचा बुलढोझर भारी ठरला.

पंजाबमध्ये मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांचा दोन्ही जागांवर पराभव झाला, यापेक्षा काँग्रेसचे काय दुर्दैव असू शकते. पाच वेळा मुख्यमंत्री राहिलेले ९४ वर्षं वयाचे प्रकाशसिंग बादल, माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमिरिंदरसिंग, मावळते उपमुख्यमंत्री सुखजिंदर रंधवा यांचा आपच्या झंझावातात पराभव झाला. अकाली दल आणि काँग्रेस यांना कंटाळलेल्या जनतेने पर्याय म्हणून आपचा स्वीकार केला.

गोवा देशातील एक छोटे राज्य. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी तिसऱ्यांदा विजय मिळवला. तृणमूल काँग्रेसने गोव्यात कशासाठी निवडणूक लढवली याचे कारण त्यांना ठाऊक. पण या पक्षाने उभे केलेले सर्व २६ उमेदवार पराभूत झाले. निकालाच्या अगोदर काँग्रेसने आपल्या सर्व उमेदवारांना एका पंचतारांकित हाॅटेलमध्ये बंद करून ठेवले होते. सरकार स्थापनेसाठी पी. चिदंबरम व डी. के. शिवकुमार गोव्यात दाखल झाले होते. पण त्यांना हात हालवत परतावे लागले.

महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना असे महाविकास आघाडीचे सरकार आहे. या तीनही पक्षांना विधानसभा निवडणुकीत तेथील जनतेने साफ नाकारले आणि त्यांना घरचा रस्ता दाखवला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -