पणजी : गोवा विधानसभा निवडणुकीत भाजप बंडखोर उत्पल पर्रिकर यांचा ८०० मतांनी पराभव झाला. उत्पल हे दिवंगत भाजप नेते मनोहर पर्रिकर यांचे पुत्र असून त्यांनी पणजी येथून अपक्ष निवडणूक लढवली होती. भाजपचे उमेदवार बाबूश मोन्सेरात यांनी पर्रिकर यांचा पराभव केला.
मतमोजणीला सुरुवात झाल्यावर उत्पल पर्रिकर यांनी आघाडी घेतली होती. परंतु मतमोजणीच्या फेऱ्या जसजशा पुढे सरकू लागल्या तशा उत्पल पर्रिकर यांची पिछेहाट होऊ लागली. उत्पल पर्रिकर यांनी भाजप उमेदवाराला चांगली लढत दिली. परंतु मोन्सेरात यांनी आपली आघाडी शेवटपर्यंत कायम राखली आणि विजय मिळवला.
दिवंगत मनोहर पर्रिकर या मतदारसंघातून तब्बल ६ वेळा विजयी झाले होते. त्यामुळे उत्पल पर्रिकर यांना त्यांच्या वडिलांच्या पारंपरिक जागेवर निवडणूक लढवायची होती. त्यामुळेच तिकीट न मिळाल्याने त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.
यासंदर्भात प्रतिक्रिया देताना उत्पल पर्रिकर म्हणाले की, अपक्ष उमेदवार म्हणून चांगली लढत झाली. मी सगळ्यांचे आभार मानतो. दिलेल्या लढतीबद्दल समाधानी आहे पण निकालाने काहीशी निराशा झाल्याचे त्यांनी सांगितले.