नवी दिल्ली : पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे पहिल्यांदाच सरकार बनणार आहे. ‘आप’कडून भगवंत मान यांच्या नावाची मुख्यमंत्रीपदासाठी याआधीच घोषणा झालेली आहे.
पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत चन्नी दोन जागांवर निवडणूक लढवत होते, पण दोन्ही जागांवर त्यांचा पराभव झाला आहे. याबद्दल बोलताना केजरीवाल यांनी सांगितले की, ‘आपल्या पक्षाची ताकद काय आहे, हे चन्नींच्या पराभवावरुनच समजली. चन्नींचा पराभव कुणी मोठ्या नेत्याने नाही, तर एका मोबाईल रिपेअर करणाऱ्या सामान्य व्यक्तीने केला.’
‘पंजाबचे मुख्यमंत्री चन्नी यांचा पराभव करणारे लाभसिंग उगोके हे एका मोबाईल फोन दुरुस्तीच्या दुकानात काम करतात, त्यांची आई सरकारी शाळेत सफाई कामगार आणि वडील शेतमजूर आहेत. ही आहे एका आम आदमीची खरी ताकद, असे केजरीवाल म्हणाले. तसेच, काँग्रेसचे दिग्गज नेते नवज्योतसिंग सिद्धू यांचा पराभव करणाऱ्या महिला उमेदवार जीवन ज्योती कौर यादेखील एक सामान्य कुटुंबातील आहेत, अशी माहितीही केजरीवाल यांनी दिली.