Monday, March 24, 2025
Homeदेशभाजपच सुस्साट! देशातील चार राज्यांमध्ये स्पष्ट बहुमत

भाजपच सुस्साट! देशातील चार राज्यांमध्ये स्पष्ट बहुमत

पंजाबमध्ये आम आदमी पार्टीला अभूतपूर्व यश

नवी दिल्ली : देशातील पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीत भाजपला चार राज्यांमध्ये स्पष्ट बहुमत मिळाले आहे. उत्तरप्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमध्ये भाजपने निर्णायक आघाडी घेत राजकीय करिष्मा कायम ठेवला आहे. तर पंजाबमध्ये काँग्रेसचा धुव्वा उडवत आम आदमी पार्टीने (आप) अभूतपूर्व यश संपादित करत विजयाचा शंखनाद केला.

उत्तर प्रदेश निकाल : देशातील पाच राज्यांपैकी सर्वात मोठी लढाई 400 हून अधिक विधानसभा मतदारसंघ असलेल्या उत्तर प्रदेशची होती. उत्तर प्रदेशच्या जनतेने भाजपला स्पष्ट बहुमत दिले आहे. भाजपने 267 जागा पटकावल्या असून समाजवादी पक्षाला 131 जागांवर समाधान मानावं लागलं. तर बहुजन समाज पक्ष एक आणि काँग्रेस दोन जागी कसाबसा जिंकल्याने दोन्ही पक्षांचा सुपडा साफ झाला आहे.

गोवा निकाल : गोव्यात भाजप सलग दुसऱ्यांदा सत्ता स्थापन करणार आहे. गोव्यात बहुमताचा आकडा 21 इतका आहे, सध्या भाजप 20 जागांवर असून बहुमतासाठी 2 जागांची गरज आहे. तर 3 अपक्षांच्या समर्थनासह गोव्यात भाजपचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याशिवाय अतिरिक्त संख्याबळासाठी महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाशी भाजपची बोलणीही सुरु केली आहे. त्यामुळे आता भाजप राज्यपालांना भेटून सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे.

पंजाब निकाल : पंजाब विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये अरविंद केजरीवाल यांच्या आप पक्षाची राजकीय त्सुनामी आली आहे. आप पक्षाने पंजाबमध्ये सत्ताधारी काँग्रेसचा पूर्ण पराभव केला आहे. पंजाबमधील जनतेने आप पक्षाच्या बाजूने कौल दिला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, पंजाबमध्ये अनेक दिग्गजांना पराभवाचा धक्का बसला आहे. पंजाबमध्ये 92 जागांवर आपचे उमेदवार विजयी झाले आहेत.

उत्तराखंड निकाल : उत्तराखंडमध्ये भाजपने सर्व पक्षांना मागे सोडत 49 जागांवर सर्वात मोठी आघाडी घेतली आहे. तर काँग्रेसला 14 जागांवर समाधान मानावे लागले आहे. उत्तराखंडमध्ये आम आदमी पक्षाला खातेही उघडता आले नसून इतर पक्ष 4 जागांवर आहेत. सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या निवडणुकीच्या निकालाबाबत बरेच चढ-उतार पाहायला मिळाले. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांना त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराकडून कडवी स्पर्धा झाली. दुसरीकडे, काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांचा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला.

मणिपूर निकाल : मणिपूरमध्ये विधानसभा निवडणुकीच्या 60 जागांसाठीचे बहुते निकाल हाती आले असून यामध्ये भाजपने एकहाती सत्ता स्थापन करण्याच्या दिशेने यशस्वी पाऊल टाकले आहे. भाजप उमेदवार आतापर्यंत 60 पैकी 28 जागी विजयी झाले आहेत. तर काँग्रेस 09, एनपीपी 09 आणि इतर 08 जागांवर आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -