अलिबाग (प्रतिनिधी) : पावसाळा हंगाम सुरू होण्यास अजून तीन महिने उरले असताना अलिबाग तालुक्यातील रांजणखार डावली आणि मिळकतखार या दोन गावांतील महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. दोन्ही गावांना जिल्हा परिषदतर्फे टँकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ आली आहे. रांजणखार डावली आणि मिळकतखार गावाला जलजीवन मिशन योजने अंतर्गत पाणी योजना मंजूर झाली आहे. या योजनेचे काम सुरू झाल्यानंतर ग्रामस्थांचा पाणी प्रश्न सुटणार आहे. मात्र तोपर्यंत तरी महिलांना पाण्यासाठी धावाधाव करावी लागणार आहे.
रायगड जिल्ह्यात पावसाचे प्रमाण चांगले असताना अनेक भागांत डिसेंबरपासूनच पाण्याची समस्या नागरिकांना जाणवू लागते. जिल्ह्यात प्रत्येक ठिकाणी जलजीवन, ग्रामीण पाणी पुरवठा योजना कार्यन्वित केल्या आहेत. तरीही पाण्याचे योग्य नियोजन होत नसल्याने नागरिकांना पाणीटंचाई समस्येला सामोरे जावे लागत आहे. अलिबाग तालुक्यातही रेवस विभाग हा नेहमीच तहानलेला असतो. जानेवारी महिन्यापासूनच या विभागात पाणी टंचाई समस्येला नागरिकांना सामोरे जावे लागते.
तालुक्यातील रांजणखार डावली आणि मिळकतखार भागही नेहमीच तहानलेला असतो. पाण्यासाठी येथील महिलांना वणवण करावी लागते. अनेकदा विकतचे पाणी घ्यावे लागत असते. फेब्रुवारी महिन्यापासूनच या गावांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागले आहे. या दोन्ही गावांसाठी नव्याने पाणी योजना कार्यन्वित केली जात आहे. मात्र, तिचे काम अद्याप सुरू झालेले नाही.
रोज एक टँकरच पाणी
पाणीटंचाई असल्याने रोज पाण्याचा एक टँकर या गावांना दिला जात आहे. त्यामुळे या टँकरच्या पाण्यावर येथील नागरिकांना अवलंबून राहावे लागत आहे. दरम्यान, या गावांचा पाण्याचा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा, अशी मागणी ग्रामस्थांतर्फे प्रशासनाकडे केली जात आहे.