मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीत भाजपचे १३४ अधिक संख्याबळ असेल असा विश्वास भाजप आमदार आशिष शेलार यांनी व्यक्त केला. आतापर्यंत शिवसेनेला मुंबई महापालिकेत कधीच बहुमत मिळाले नाही जे ११४ संख्याबळ व्हायचे ते आमच्यामुळे असे देखील शेलार म्हणाले.
मुंबई महापालिकेतून विधान परिषदेवर निवडून गेलेले आमदार राजहंस सिंह यांनी पत्रकारांशी अनौपचारिक चर्चेचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी शेलार बोलत होते. या कार्यक्रमात भाजपचे आमदार अॅड. आशिष शेलार, आमदार योगेश सागर, आमदार नितेश राणे, पालिकेतील गटनेते प्रभाकर शिंदे, भालचंद्र शिरसाट, भाजपचे नगरसेवक उपस्थित होते.
दरम्यान मुंबई महापालिकेत शिवसेनेला कधीही बहुमत मिळाले नाही. मात्र आता मुंबई महापालिकेला १३४ वर्षे होत आहेत आणि आगामी निवडणुकीत भाजपचे १३४ हून अधिक नगरसेवक निवडून येतील, असे शेलार म्हणाले. आगामी निवडणुकीत भाजप स्वबळावर लढणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तर मुंबई महापालिकेत भाजप पहारेकऱ्यांची भूमिका पार पाडत असून आतापर्यंत भाजपने सत्ताधारी शिवसेनेच्या कारभारावर लक्ष ठेवले होते. मात्र आता भाजपची प्रशासकांवरही करडी नजर असल्याचे शेलार म्हणाले.
प्रशासकांच्या काळात व्हाइट कॉलर भ्रष्टाचार होण्याची भीती जास्त असते. त्यामुळे पालिकेचा २३६ प्रभागांमध्ये आम्ही पहारेकऱ्यांच्या नियुक्त्या करणार आहोत. तसेच आमदार, खासदार यांचीही नजर पालिकेच्या कामावर असेल असेही ते म्हणाले.
विशेष म्हणजे त्या पद्धतीने निवडणुका पुढे जात आहेत, त्या जायला नको. निवडणुका वेळेतच व्हायला हव्यात अशी अपेक्षाही शेलार यांनी यावेळी व्यक्त केली. शिवसेनेचे मानसिक खच्चीकरण झाले असल्याचेही शेलार म्हणाले.