Friday, July 5, 2024
Homeताज्या घडामोडीबाळासाहेब, आपलेच सुपुत्र सत्तेसाठी आंधळे झालेत

बाळासाहेब, आपलेच सुपुत्र सत्तेसाठी आंधळे झालेत

देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरे सरकारविरोधात घणाघात

मुंबई : भाजपाने राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी मुंबईत मोर्चा काढला. यावेळी विधानसभा विरोधी पक्षनेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर परखड शब्दांत टीका केली.

नवाब मलिक यांना जमीन खरेदी व्यवहार प्रकरणी ईडीकडून अटक झाल्यानंतर त्यावरून राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. यानंतर भाजपाकडून नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी तीव्र करण्यात आली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील याचे पडसाद उमटले. त्यांच्या राजीनाम्यासाठी आता भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

आज आझाद मैदानात धडक मोर्चात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिकांच्या राजीनाम्यावरून ठाकरे सरकारविरोधात जोरदार निशाणा साधला. “जर अनिल देशमुखांचा राजीनामा घेतला जातो, संजय राठोडांचा राजीनामा घेतला जातो, तर दाऊदच्या माणसाचा राजीनामा का नाही? कुणाच्या दाढ्या कुरवाळताय म्हणून तुम्ही राजीनामा घेत नाहीत?”, असा सवाल देवेंद्र फडणवीसांनी उपस्थित केला आहे.

“शरद पवार म्हणतात राजीनामा देऊ देणार नाही. उद्धव ठाकरे म्हणतात राजीनामा देऊ देणार नाही. उद्धवजी, तुमचं आमचं जमत नसेल, सोडून द्या. पण एक दिवस बाळासाहेब ठाकरेंना उत्तर द्यायचं आहे. तेव्हा तुम्हाला विचारलं जाईल, अशी व्यक्ती तुमच्यासोबत मंत्रिमंडळात होती. तेव्हा काय उत्तर द्याल? आम्ही तर बाळासाहेबांना सांगू, की नाही बाळासाहेब, आम्ही संघर्ष केला. पण काय करणार, आपलेच सुपुत्र मुख्यमंत्री होते. ते सत्तेसाठी एवढे आंधळे होते, की ते त्यांचा राजीनामा घेऊ शकले नाहीत. कारण त्यांना माहिती होतं, की राजीनामा घेतला, तर माझं सरकार जाईल”, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.

दरम्यान, यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीसांनी नवाब मलिकांचा राजीनामा घेतल्याशिवाय संघर्ष थांबणार नसल्याचं म्हटलं आहे. “हा देशद्रोह्याच्या विरोधात हा संघर्ष आहे. पाकिस्तानधार्जिण्या लोकांच्या विरोधात हा संघर्ष. जोपर्यंत बॉम्बस्फोटाचे आरोपी असलेल्यांसोबत व्यवहार करून जेलमध्ये गेलेल्या नवाब मलिकांचा राजीनामा घेत नाहीत, तोपर्यंत संघर्ष थांबणार नाही. आम्ही काही रोज राजीनामे मागत नाहीत. ही घटना राज्यासाठी लाजिरवाणी आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

भाजपाकडून नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आझाज मैदान ते मेट्रो सिनेमापर्यंत मोर्चा काढण्यात आला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार अशा भाजपाच्या इतरही ज्येष्ठ नेत्यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -