नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नवी दिल्ली येथील राष्ट्रपती भवनात आयोजित विशेष समारंभात ‘नारी शक्ती पुरस्कार’ – २०२० आणि २०२१ प्रदान केले.
२०२० आणि २०२१ या वर्षांसाठी २८ उत्कृष्ट आणि उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. महिला सक्षमीकरणासाठीच्या विशेषत: मागास आणि उपेक्षित महिलांसाठी केलेल्या असाधारण कार्याचा गौरव म्हणून २८ महिलांना, अठ्ठावीस पुरस्कार (वर्ष २०२० आणि २०२१ साठी प्रत्येकी १४) प्रदान करण्यात आले. महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठी, महिला सक्षमीकरण आणि सामाजिक कल्याणासाठी केलेल्या अथक सेवेबद्दल आणि महिलांचा परिवर्तनकारी, सकारात्मक बदलाचे उत्प्रेरक म्हणून सन्मान करण्यासाठी महिला आणि संस्थांना महिला आणि बाल विकास मंत्रालय नारी शक्ती पुरस्कार प्रदान करते. कोरोना साथरोगामुळे २०२० आणि २०२१ मध्ये पुरस्कार सोहळा होऊ शकला नव्हता.
महाराष्ट्रातल्या तीन महिलांना ‘नारी शक्ती पुरस्कार
‘नारीशक्ती पुरस्कार’ मध्ये महाराष्ट्रातील तीन महिलांचा समावेश आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्रालयाच्यावतीने ‘नारीशक्ती पुरस्कारा’ची घोषणा करण्यात आली. यामध्ये कथक नृत्यांगना डाऊन सिंड्रोमप्रभावित सायली आगवणे, वनिता बोराडे या पहिल्या महिला सर्पमित्र यांना वर्ष २०२० साठी तर वर्ष २०२१ साठी उद्योजिका कमल कुंभार यांना जाहीर झाला आहे. आज जागतिक महिला दिनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रपती भवन येथे आयोजित कार्यक्रमात या पुरस्काचे वितरण करण्यात आले.
नारी शक्तीच्या कामगिरीला नमन- पंतप्रधान
जगातील विविध क्षेत्रात अतुलनीय योगदान देऊन आपल्या कर्तृत्त्वाचा ठसा उमटवणाऱ्या नारी शक्तीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने नमन केले आहे. आपल्या संदेशात मोदी म्हणाले की, ‘आर्थिक समावेशापासून ते सामाजिक सुरक्षेपर्यंत, दर्जेदार आरोग्य सेवेपासून ते गृहनिर्माणापर्यंत, शिक्षणापासून उद्योजकतेपर्यंत, भारताच्या विकासाच्या प्रवासात नारी शक्तीला पुढे ठेवण्यासाठी अनेक प्रयत्न केले गेले आहेत. पुढील काळात हे प्रयत्न अधिक जोमाने सुरू राहतील. महिला दिनानिमित्त मी नारी शक्ती आणि त्यांच्या विविध क्षेत्रातील कामगिरीला नमन करतो. सन्मान आणि संधींवर विशेष भर देऊन भारत सरकार आपल्या विविध योजनांद्वारे महिला सक्षमीकरणावर भर देत राहील अशा शब्दात मोदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.