Saturday, October 5, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यपालिकेसाठी भाजपची जोरदार तयारी

पालिकेसाठी भाजपची जोरदार तयारी

सीमा दाते

शियातील सर्वात श्रीमंत असलेल्या मुंबई महापालिकेवर आपली सत्ता मिळवण्यासाठी सगळेच पक्ष तयारीला लागले असताना भाजपचा अॅक्शन मोड ऑन असल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपचे सगळ्याच मार्गाने प्रयत्न सुरू असून भाजपची संघटनात्मक मजबूत बांधणीही सुरू आहे.

महापालिकेवर गेल्या ३० वर्षांपासून शिवसेनेची सत्ता आहे. गेली कित्येक वर्षे मित्र पक्ष असलेला शिवसेना आणि भाजपमध्ये मात्र फूट पडण्यास सुरुवात झाली आणि २०१७ मध्ये महापालिकेवर शिवसेनेची एकहाती सत्ता आली, अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या नगरसेवकांचे संख्याबळ भाजपला कमी पडले होते, त्यामुळे भाजपला सत्ता मिळवता आली नाही. मात्र आगामी महापालिका निवडणुकीत भाजप हा डॅमेज भरून काढणार आहे आणि याची सुरुवात भाजपने आधीपासूनच केलेली आहे.

सध्या भाजप शिवसेना नेत्यांचे भ्रष्टाचार बाहेर काढण्याच्या मागे लागली आहे. एकूणच काय तर शिवसेनेला आर्थिक बाजूने डॅमेज करण्याचे प्रयत्न भाजपचे सुरू आहेत की काय असे वाटायला लागले आहे. महाविकास आघाडी सरकारमधल्या मंत्री नवाब मलिक यांना अटक, शिवसेनेचे महापालिकेतील सर्वात मोठे नेते यशवंत जाधव यांची चौकशी, महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावरील आरोप हे सगळं पाहता शिवसेनेला धक्का देण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे, अर्थातच याचा परिणाम आगामी महापालिका निवडणुकीवर होण्याचीही शक्यता आहे, तर दुसरीकडे शिवसेनेने आरोप झेलतही आपले निवडणुकीचे काम सुरू ठेवले आहे, तर यावेळी व्होट बँक मिळवण्यासाठी गुजराती कार्ड शिवसेना वापरणार आहे.

विशेष म्हणजे गेली कित्येक वर्षे मराठीच्या नावावर मतं मागणारी शिवसेना आता जिंकण्यासाठी गुजराती मतांचाही वापर करणार आहे, शिवसेनेनेही आपली तयारी सुरू केली आहे, तर भाजपकडून ही तयारी सुरू असून भाजपने प्रचाराचा नारळ आधीच फोडला होता. मोठ्या नेत्याला सोबत घेऊन भाजपने मुंबई महापालिकेची तयारी आणि शक्तिप्रदर्शन केले होते, याची सुरुवात भाजप केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेपासून सुरू झाली होती. या यात्रेत उसळलेली गर्दी, कार्यकर्ते पाहता भाजपचे मिशन मुंबई २०२२ साठीचे प्रयत्न पूर्ण झाले की काय असेच वाटत होते. त्यातच आता राणे कुटुंबीयांकडून थेट शिवसेनेला आवाहन केले जातेय यावरूनच भाजपचं पारडं किती जड आहे हे दाखवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तर आमदार नितेश राणेंसारखा चेहराही मुंबई महापालिकेसाठी भाजपने दिला आहे. त्यामुळे भाजप तयारीनिशी निवडणुकीत उतरणार हे तर आहे. एकीकडे मुंबईतील प्रभागांच्या फेररचनेमुळे एक विभाग दोन वॉर्डमध्ये विभागला गेला असल्यामुळे मतदानासाठी परिणाम होणार आहे. मात्र यावरही भाजपने अभ्यासपूर्वक विश्लेषण केले असून कुठे भाजपचा उमेदवार देता येईल हे देखील ठरवून ठेवले आहे, तर जिथे शिवसेनेचे सगळेच नगरसेवक आणि आदित्य ठाकरे आमदार असलेल्या वरळीमध्येही भाजपच्या उमेदवारांची तयारी सुरू आहे.

आगामी महापालिका निवडणूक राष्ट्रवादी, काँग्रेस, मनसे आणि आप या पक्षांची जरी असली तरी ही दुरंगी निवडणूकच पाहायला मिळणार आहे. भाजप आणि शिवसेना यांची ही अटीतटीची निवडणूक असणार आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी शिवसेनेने यंदाच्या पालिकेच्या अर्थसंकल्पातही मोठ्या तरतुदी केल्या आहेत. मोठे विकासकाम सुरू केले आहे. विशेष म्हणजे नगरसेवकांचा कार्यकाळ संपत आला असून विकासकामांच्या भूमिपूजनांच्या कार्यक्रमांचा सपाटा लावला आहे.

तर भाजपनेही आपले संख्याबळ कसे वाढवता येईल, याचा विचार केला आहे. सध्या मुंबई महापालिकेतील संख्याबळ : शिवसेना – ९९, भाजप – ८३, काँग्रेस – ३०, राष्ट्रवादी – ८, समाजवादी पार्टी – ६, मनसे – १, एमआयएम – २ असे आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजपला १००च्या वर संख्याबळ मिळवावे लागणार आहे. भाजपने सध्या पक्षातील मोठ्या चेहऱ्यांना मुंबई महापालिका निवडणुकीची धुरा सांभाळण्यासाठी दिली आहे.
भाजपच्या मुंबई अध्यक्षपदी मंगलप्रभात लोढा आहेत, तर तरुण तडफदार आमदार आशीष शेलार यांच्या नेतृत्वात भाजप मुंबई महापालिकेची निवडणूक लढणार आहे. त्यासाठी संघटनात्मक बांधणी पक्की करण्यात आली. २५ समित्यांची नियुक्ती केली. विशेष म्हणजे विरोधी पक्षनेते देवेंद्र
फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासोबत चर्चा करून या समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. निवडणूक समित्यांमध्ये खासदार गोपाळ शेट्टी, खासदार पूनम महाजन, मनोज कोटक, किरीट सोमय्या असे चेहरे आहेत. त्यामुळे भाजपने मोठी तयारी केली आहे हे दिसतेय. निवडणुकांची तारीख जरी जाहीर झाली नसली तरीही मात्र जिंकण्यासाठी सगळ्याच पक्षांची कसरत सुरू आहे.

seemadatte@@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -