Saturday, July 13, 2024
Homeक्रीडाजडेजा-अश्विनचा अचूक मारा

जडेजा-अश्विनचा अचूक मारा

पहिल्या कसोटीत श्रीलंकेचा डावाने पराभव

मोहाली (वृत्तसंस्था) : श्रीलंकेविरुद्धची पहिली कसोटी भारताने अवघ्या तीन दिवसांत एक डाव आणि २२२ धावांनी जिंकली. डावखुऱ्या रवींद्र जडेजासह ऑफस्पिनर आर. अश्विनचा (प्रत्येकी ४ विकेट) अचूक आणि प्रभावी मारा यजमानांच्या विजयाचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले. अष्टपैलू जडेजाने विराट कोहलीची १००वी कसोटी आणि रोहित शर्माची कर्णधार म्हणून पहिली कसोटी अविस्मरणीय बनवली. १७५ धावांची नाबाद खेळी आणि दोन्ही डाव मिळून ९ विकेट घेणारा रवींद्र जडेजा विजयाचा प्रमुख शिल्पकार ठरला. त्यालाच सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.

श्रीलंकेच्या फलंदाजांकडून फार संघर्ष पाहायला मिळाला नाही. कर्णधार रोहित शर्माने आक्रमक क्षेत्ररक्षण लावताना श्रीलंकेच्या फलंदाजांना चुका करण्यास भाग पाडले. प्रत्येक गोलंदाजासाठी रोहितने वेगवेगळे आणि अचूक क्षेत्ररक्षण लावले होते आणि हे पाहून महान फलंदाज सुनील गावस्कर यांनीही कौतुक केले. पहिला डाव १७४ धावांवर आटोपल्यानंतर पाहुण्या संघावर फॉलोऑनची नामुष्की ओढवली. तब्बल ४०० धावांनी पिछाडीवर पडलेल्या लंकेच्या बॅटर्सना दुसऱ्या डावातही खेळ उंचावता आला नाही. पहिल्या डावाच्या तुलनेत त्यांनी दुसऱ्या डावात केवळ चार धावा अधिक केल्या. भारताने पहिला डाव ८ बाद ५७४ धावांवर घोषित केला.

पहिल्या डावात श्रीलंकेचा पथुम निसंका (नाबाद ६१) वगळल्यास कर्णधार दिमुथ करुणारत्ने (२८), चरिथ असलंका (२९) व अँजेलो मॅथ्यूज (२२) हे लंकेकडून सर्वाधिक धावा करणारे फलंदाज ठरले. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा व आर. अश्विन यांनी प्रत्येकी दोन, तर मोहम्मद शमीने एक विकेट घेतली. रवींद्र जडेजाने ४१ धावांत ५ फलंदाज बाद केले.

दुसऱ्या डावातही श्रीलंकेची पडझड कायम राहिली. आर अश्विनने तिसऱ्या षटकात श्रीलंकेचा सलामीवीर लाहिरू थिरीमनेला (०) बाद केले. रोहितने स्लीपमध्ये सुरेख झेल टिपला. पहिल्या डावातील नायक पथून निसंका दुसऱ्या डावात कमाल करू शकला नाही. अश्विनने त्याला ६ धावांवर झेलबाद केले. या विकेटसह अश्विनने भारताकडून कसोटीत सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये कपिल देव यांच्यासह संयुक्तपणे (४३४ विकेट) दुसरे स्थान पटकावले. महान लेगस्पिनर अनिल कुंबळे हे ६१९ विकेटसह अव्वल स्थानावर आहे. मोहम्मद शमीने तिसरा धक्का देताना दिमुथ करुणारत्नेला (२७ धावा) बाद केले.

धनंजय डी सिल्वा आणि अँजेलो मॅथ्यूज यांनी चौथ्या विकेटसाठी १०२ चेंडूंत ४९ धावांची भागीदारी करताना भारताला टक्कर देण्याचा प्रयत्न केला. पण, पुन्हा एकदा जडेजाने मौके पे चौका मारला.

त्याने फिरकीच्या जाळ्यात धनंजयला अडकवले आणि श्रेयस अय्यरकडे सोपा झेल देण्यास भाग पाडले. धनंजय ३० धावांवर बाद झाला. चहापानानंतर जडेजाने एका षटकात पुन्हा दोन धक्के दिले आणि त्यात अश्विनच्या एका विकेटची भर पडली. अश्विनने या विकेटसह कपिल देव यांचा ४३४ विकेटचा विक्रम मोडला. निरोशन डिकवेलाने थोडा प्रतिकार केला. लसिथ इम्बुल्डेनियासोबत त्याने श्रीलंकेचा पराभव टाळण्याचे प्रयत्न सुरू ठेवले होते.

पण, जडेजाने पुन्हा कमाल केली आणि त्याने लसिथला बाद केले. मोहम्मद शमीने ९वी विकेट घेताना विश्व फर्नांडोला (०) बाद केले. अश्विनने अखेरची विकेट घेताना श्रीलंकेचा दुसरा डाव १७८ धावांवर गुंडाळला. डिकवेला ५१ धावांवर नाबाद राहिला.

त्यापूर्वी, रिषभ पंतसह (९६ धावा) हनुमा विहारी (५८) यांच्यानंतर रवींद्र जडेजाची बॅट तळपली. त्याने २२८ चेंडूंवर १७ चौकार व ३ षटकारांसह १७५ धावांची नाबाद खेळी केली. त्याच्या मोठ्या खेळीच्या बळावर भारताने पहिला डाव ८ बाद ५७४ धावांवर घोषित केला.

विराटची शंभरावी कसोटी संस्मरणीय

वैयक्तिक शंभराव्या कसोटीमध्ये सांघिक विजय मिळवण्याचा मान विराट कोहलीला मिळाला. याआधी अनिल कुंबळे, व्ही. व्ही. एस. लक्ष्मण, हरभजन सिंग व इशांत शर्मा यांना त्यांच्या १००व्या कसोटीत विजय अनुभवता आला.

रोहितचा कर्णधार म्हणून सलग १३वा विजय

रोहित शर्माने भारताचे नेतृत्व करताना ४२ सामन्यांत ३६ विजय मिळवले आहेत, तर ६ सामने गमावले आहेत. हा त्याचा सलग १३ वा विजय ठरला. २१व्या दशकात कसोटी संघाचा कर्णधार म्हणून पदार्पणाचा सामना जिंकणारा रोहित हा पाचवा कर्णधार ठरला. याआधी रिडली जेकब्स, ग्रॅमी स्मिथ, केन विलियम्सन, क्विंटन डी कॉक यांच्या वाट्याला असा मान आला आहे. पॉली उम्रीगर यांच्यानंतर कर्णधार म्हणून पहिल्याच कसोटीत डावाने विजय मिळवणारा रोहित शर्मा हा दुसरा भारतीय कर्णधार ठरला. पॉली उम्रीगर यांनी १९५५/५६मध्ये न्यूझीलंडविरुद्ध मुंबई कसोटीत एक डाव व २७ धावांनी विजय मिळवला होता.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -