पुणे (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी बहुप्रतिक्षित पुणे मेट्रोचे उद्घाटन केले. पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या या उद्घाटन सोहळ्यावेळी पंतप्रधान मोदींनी आपल्या खास शैलीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. ‘मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन माझ्या हस्ते झाले होते आणि आता उद्घाटनही माझ्या हस्ते झाले. मात्र यापूर्वी भूमिपूजन झाल्यानंतर प्रकल्प पूर्ण कधी होणार हे कळत नव्हते. पूर्वीच्या या सुस्त वृत्तीने देशाचे मोठे नुकसान झाले’, असा टोला नरेंद्र मोदी यांनी लगावला.
पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रोचे उद्घाटन झाल्यानंतर मोदींनी गरवारे मेट्रो स्टेशन ते आनंदनगरपर्यंत मेट्रोने प्रवास केला. मेट्रोचे तिकीट स्वतः पंतप्रधान मोदींनी काढले. या उद्घाटन सोहळ्यात त्यांनी चक्क दिव्यांग मुलांसोबत प्रवास केला. त्यांच्यासोबत दिलखुलास गप्पा मारल्या. पंतप्रधान मोदी यांनी सर्वप्रथम पुणे महापालिकेतील महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण केले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आसनारूढ भव्य पुतळ्याचे अनावरण त्यांच्या हस्ते झाले.
या कार्यक्रमानंतर ते पुणे मेट्रोच्या उद्घाटनासाठी रवाना झाले. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महापौर मुरलीधर मोहोळ, खासदार उदयनराजे भोसले, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते.
‘मास ट्रान्सपोर्ट ही काळाची गरज आहे. त्यामुळे सरकारचा मेट्रो प्रकल्पांवर भर आहे. महाराष्ट्रातही मेट्रो प्रकल्पांची निर्मिती व विस्तार होत आहे. आपण कितीही मोठे असलो तरी मेट्रोतून प्रवास करण्याची सवय सर्वांनी लावून घ्यावी. प्रवास मेट्रोने कराल तितकीच शहराला मदत होईल,’ असे आवाहन मोदी यांनी केले. तसेच ग्रीन टान्सपोर्ट, स्मार्ट मोबिलिटीवर भर असल्याचे ते म्हणाले.
फडणवीसांचे केले कौतुक…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले आहे. ‘देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना या प्रकल्पासंबंधित कामासाठी दिल्लीत येत होते. या प्रकल्पासाठी त्यांनी पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून मी त्यांचे अभिनंदन करतो. कोरोना महामारीच्या काळात मेट्रो सेवा सुरू झाली आहे,’ असे मोदी यांनी यावेळी आवर्जून सांगितले.
पुणेकरांनी दरवर्षी नदी उत्सव करावा…
पुणे शहरातील मुळा, मुठा नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी ११०० कोटी रुपयांच्या प्रकल्पाच्या कामाला प्रारंभ होत आहे, अशी माहिती यावेळी नरेंद्र मोदी यांनी दिली. तसेच पुणेकरांनी दरवर्षी नदी उत्सव साजरा करावा, त्यामुळे लोकांना नदीचे महत्त्व कळेल, असेही ते म्हणाले.
ऑपरेशन गंगा यशस्वी…
पंतप्रधान मोदी म्हणाले की, युक्रेनच्या युद्धातही भारत आपल्या देशातील नागरिकांना संकटातून बाहेर काढत आहे. इतर देशांना असे करण्यात अडचणी येत आहेत, पण ‘मिशन गंगा’च्या माध्यमातून भारताने ते करून दाखवत आहे. कारण हा भारताच्या वाढत्या प्रभावाचा परिणाम आहे. देशात येणाऱ्या प्रत्येक बदलाचे क्रेडिट तुम्हाला जाते. आपल्या देशातील नागरिकांना जाते’.
शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण, शाही फेट्याने स्वागत…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे महापालिकेत आल्यानंतर सर्वप्रथम महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर महापालिकेच्या आवारात बसवण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणांनी आणि तुताऱ्यांच्या निनादाने महापालिकेचा परिसर दणाणून गेला. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पंतप्रधानांना खास तयार केलेला फेटा, उपकरणे आणि छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन त्यांचे स्वागत केले. या कार्यक्रमासाठी महापालिकेच्या हिरवळीवर उपस्थित असणाऱ्या भाजपच्या नगरसेवकांची आणि कार्यकर्त्यांची मोदींनी भेट घेतली.
फडणवीस – अजितदादांच्या गुजगोष्टी…
पंतप्रधान मोदी यांनी पुणे दौऱ्यात बहुचर्चित अशा पुणे मेट्रोचे उद्घाटन केले. यानिमित्ताने माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि आजी उपमुख्यमंत्री अजित पवार एकाच व्यासपीठावर आले. यावेळी त्यांच्यात बराच वेळ गुजगोष्टी रंगल्या. त्यांच्या या मैफलीची खुसखुशीत चर्चा सुरू झाली. बघा एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने पंतप्रधानांच्या मांडीला मांडी लावून कार्यक्रमात भाग घेतला. तर दुसरीकडे त्यांच्या या दौऱ्याला विरोध करत रोषही व्यक्त केला. हे फक्त आणि फक्त ‘राष्ट्रवादी’लाच जमू शकते, अशी चर्चाही यानिमित्ताने रंगली. त्याला अनेक मागचे आणि पुढचेही संदर्भ होते. मोदी यांनी पुण्यात मेट्रोच्या उद्घाटनापासून ते अनेक कार्यक्रमांचा धडाका लावला. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महापौर मुरलीधर मोहोळ, खासदार उदयनराजे भोसले, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते. मात्र या दौऱ्यात व्यासपीठावर देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांच्या गुजगोष्टी रंगल्या आणि अनेकांना जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.
पंतप्रधानांसमोरच अजितदादांचा राज्यपालांना टोला
अजित पवार यांनी राज्यपाल कोश्यारी यांना अप्रत्यक्ष टोला लगावला. ‘पंतप्रधानांच्या लक्षात मी एक बाब आणू इच्छितो. अलीकडे महत्त्वाच्या पदांवरील सन्माननीय व्यक्तींकडून अनावश्यक वक्तव्ये होत आहेत. ती वक्तव्ये महाराष्ट्रातील कोणत्याही व्यक्तीला न पटणारी आहेत. ती मान्य देखील होणारी नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांनी, राजमाता जिजाऊंनी रयतेचे स्वराज्य स्थापन केले. महात्मा फुले, सावित्रीबाईनी देशात स्त्रीशिक्षणाचा पाया रचला. या महामानवांच्या उत्तुंग विचारांचा वारसा आपल्याला पुढे न्यायचा आहे. कुणाच्याही बद्दल आसूया न ठेवता राजकारण न करता हा वारसा आपल्याला पुढे न्यायचा आहे हे मी नम्रतापूर्वक सांगतो’, असे अजित पवार म्हणाले.