मुंबई : एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण शक्य नसल्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी विधीमंडळात घोषित केल्यानंतर आता एसटी कर्मचाऱ्यांनी आपला लढा अधिक तीव्र करत सोमवार ७ तारखेपासून अन्नत्याग उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.
बीड आगारात सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला १२२ दिवस पूर्ण झाले आहेत. येथील एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आज अर्धनग्न आंदोलन करून लक्ष वेधले आहे.
राज्य शासनाने आणि त्यांनी नियुक्त केलेल्या समितीने आमच्या मागण्यांकडे कसल्याही प्रकारचे लक्ष न दिल्याने एसटी कर्मचाऱ्याकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत आहे आणि हाच निर्णय पूर्णपणे घोळवा घोळविचा असल्याचे पाहायला मिळते. यामुळे आम्ही येत्या सात तारखेपासून अन्नत्याग उपोषण करणार आहोत. आता यानंतर जे होईल त्याला जबाबदार राज्य शासन राहील, असे एसटी कर्मचारी म्हणाले आहेत.
एसटी कर्मचाऱ्यांच्या या निर्णयानंतर आता राज्य शासन कोणती भूमिका ङेणार? त्यांच्या मागण्या पूर्ण होतील का? आणि या कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का? हे पाहणे गरजेचे आहे.