Wednesday, March 19, 2025
Homeसंपादकीयतात्पर्यसुजाण सजग महिला दिन

सुजाण सजग महिला दिन

वसुंधरा देवधर, मुंबई ग्राहक पंचायत

‘अगं sss या वीकएंडला सेल आहे.’

‘कुठे आणि कशाचा? हल्ली lockdown मधला जुना माल खपवायला सारखे सेल लागतच असतात.’ ‘तसा सेल नाही, म्हणजे वस्तूंचा नाही’ ,

‘मग कसला असतो सेल?’

‘आपले लाड करून घ्यायचा’.

निरनिराळ्या प्रकारे महिलांना स्वत:चे लाड करून घेण्यासाठी, त्यांना स्वत:च्याच खिशात हात घालायला लावणारे सेल दरवर्षी दिसतात, ते आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या आसपास. केश-रचना, हाता-पायांना मालिश करणे, सौंदर्य खुलविण्याचे उपाय करणे, मर्यादित वेळेची पार्टी करणे, या आणि अशा विविध सेवांचे दर महिला दिनाला अगदी अर्धे सुद्धा केले जातात. आंतरराष्ट्रीय महिला दिन असतो ८ मार्चला. त्यानिमित्ताने व्यवसाय वाढविण्याच्या अशा अनेक क्लृप्त्या अवलंबिल्या जातात. त्या सवलतींचा लाभ अगदी हक्काने घेतलाही जातो. त्यामुळे मुळात हा दिवस कधीपासून आणि का सुरू झाला, याची जाणीव अनेक स्त्री-पुरुषांना कितपत असते हा प्रश्न पडतो.

स्त्री-पुरुष समानतेच्या दिशेने होणारे प्रयत्न अधिक डोळस व्हावेत आणि त्याविषयी सजगता वाढावी, हा या दिवसाचा मुख्य उद्देश. ही समानता खरं तर रोजच अमलात आणायची आहे. मात्र असा एखादा दिवस त्यासाठी मुक्रर केला की, त्या विषयाबाबत झालेली प्रगती, प्रयत्न इ. चा आढावा घेता येतो आणि अजून काय/कसे काम करायला हवे आहे त्याची जाणीव होते. ही गोष्ट आणखी एका आठवड्याने १५ मार्चला येणाऱ्या ‘जागतिक ग्राहक हक्क दिना’ला सुद्धा लागू पडतेच.

ज्याप्रमाणे आपण स्त्री/पुरुष म्हणून जन्म घेतो व सर्वसाधारणपणे स्त्री/पुरुष म्हणूनच जगतो, तसेच आपण जन्मापासून कायम ग्राहक सुद्धा असतोच. त्यामुळे ग्राहक म्हणून आपण सजग होऊ लागलो, की ती सजगता आपल्या आयुष्याचा जणू एक भाग बनून जाते. म्हणून मग महिला दिनासारखे अनेक दिन हे माल खपविण्याचे एक निमित्त म्हणून दीनवाणे झाल्यासारखे दिसतात. सजग ग्राहकत्व आपले कान आणि डोळे सताड उघडून ‘काय चाललंय?” याचा कानोसा घेऊ लागते, तेव्हा लक्षात येतात अनेक तपशील, खासकरून सद्यपरिस्थितीत नजरेस येणारे.

गेली दोन वर्षे ‘जग हे बंदी शाळा’, असा अनुभव घेतल्यावर आता जणू ही ‘मस्तीकी पाठशाला’, असावी अशा प्रकारे मंडळी खरेदीसाठी बाहेर पडताना दिसत आहेत. त्यातच आलाय महिला दिन! व्यावसायिक ही संधी कशी सोडतील. मुळात ग्राहकांना आपल्याकडे वळविण्याच्या अनेक योजना त्यांच्या विक्रीकुशल तंत्राद्वारे आपल्यापर्यंत पोहोचत असतात. जिथे शक्य तिथे जाहिरात करणे, ही व्यावसायिक म्हणून एक गरज आहेच. पण, ग्राहकांची मानसिकता, हळव्या जागा, दुखरी नस या मुद्द्यांचा खूप खोलवर विचार करून कोणता माल, कुठे, कुणाला, कसा आणि काय भावाने सादर करायचा, याची गणिते मांडली जातात. त्यामुळेच महिला दिनासाठी म्हणून आघाडीच्या online विक्री कंपन्यांनी १० ते ८० टक्केपर्यंत सूट जाहीर केली आहे. ही सूट ७ आणि ८ तारखेस केलेल्या खरेदीवर असेल. महिलांना सूट मिळण्यासाठी पात्र असणाऱ्या या उत्पादनाच्या यादीत कुठे संगणक, टीव्ही, पुस्तके किंवा व्यायाम करायची काही साधने इ. काही सुद्धा सहजपणे आढळून आले नाही. एक वेगळी बातमी दिसली, ती म्हणजे कोची मेट्रो रेल्वेने महिला दिनी सर्व स्त्रियांना मोफत प्रवास देऊ केला आहे. दिवसभरात मेट्रोच्या कोणत्याही स्थानकावरून कुठल्याही मेट्रो स्थानकावर फुकटात जाता येईल.

हे वाचून तर हा महिला-दिन अजूनच दीन झाल्यासारखे वाटले. महिला दिनानिमित्त एखादी सेवा किंवा वस्तू फुकटात देऊ करणे, ही महिलांचा आदर करण्याची पद्धत असू शकते? आता कुणाचा दृष्टिकोन असाही असू शकतो की, ही एक प्रकारची भेट आहे. हरकत नाही, भेट वस्तू नाही तर एक दिवसाचा प्रवास भेट. पण मुळात महिलांना नक्की काय हवंय आणि या वर्षीच्या या दिवसाचे ‘घोषवाक्य’ (theme) काय आहे, हे सुद्धा महत्त्वाचे नाही का?

केवळ स्त्री म्हणून ज्या असमानतेचा अनुभव जगभर स्त्रियांना घ्यावा लागला आणि अजूनसुद्धा लागतो आहे, त्याविषयी जाणीव, जागृती व्हावी व त्यातून कृतिशील बदल घडून यावेत, ही या दिनामागाची मूळ कल्पना. १९७७ पासून हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून जगभरात साजरा होऊ लागला आहे. यावर्षी या दिवशी ‘पूर्वग्रह तोडा (सोडा)’ #break the Bias असे आवाहन तमाम महिला वर्गाने करावयाचे आहे. आपणास माहीत आहे की, पूर्वग्रह आपल्या विचारावर प्रभाव टाकतात. व्यक्तीविषयक पूर्वग्रह हे वैयक्तिक संबंधापुरते मर्यादित असतात. मात्र स्त्रियांबद्दल विविध देशात, संस्कृतीत, सामाजिक स्तरात पूर्वापार चालत आलेले समज, गैरसमज म्हणजेच पूर्वग्रह असतात. ते सोडा असे आवाहन या दिनाच्या निमित्ताने करण्यात येत आहे.

या समज-गैरसमजांना खत-पाणी मिळणार नाही, यासाठी महिलांनी पण त्यासंदर्भात सुजाण होणे आणि सजग राहणे आवश्यक आहे. मग ती सजगता जगण्याचा एक भाग होईल. तसे झाले की महिला दिनानिमित्त जाहीर झालेल्या ऑनलाइन/ऑफलाइन सेलची भुरळ पडणार नाही.

[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -