Tuesday, April 29, 2025
Homeमहत्वाची बातमीरशियाच्या हल्ल्यात युरोपातील सर्वात मोठ्या न्यूक्लिअर प्लांटमध्ये आग

रशियाच्या हल्ल्यात युरोपातील सर्वात मोठ्या न्यूक्लिअर प्लांटमध्ये आग

स्फोट झाल्यास चेर्नोबिलच्या १० पट विध्वंस होईल आणि तो युरोपचा शेवट असेल

युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी चिंता व्यक्त करत दिला निर्वाणीचा इशारा

किव्ह : रशियाच्या हल्ल्यात युक्रेनमधील एनरहोदर भागात असलेल्या युरोपातील सर्वात मोठ्या न्यूक्लिअर प्लांटमध्ये आग लागली असून त्यामुळे आता इथे स्फोट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. येथे स्फोट झाल्यास चेर्नोबिलच्या १० पट विध्वंस होईल आणि तो युरोपचा शेवट असेल असा निर्वाणीचा इशारा दिला युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमीर झेलेन्स्की यांनी दिला आहे.

रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा आज ९वा दिवस आहे. दरम्यान, आता परिस्थिती अधिकच बिकट होत चालली आहे. रशियाकडून सातत्याने युक्रेनवर हल्ले सुरू आहेत. दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी होत आहे. दरम्यान, रशियाने युक्रेनमधील झापोरिझ्झिया ओब्लास्ट प्रांतातील एनरहोदर शहरात मोठा हल्ला केला. या हल्ल्यानंतर युरोपातील सर्वात मोठ्या अणुऊर्जा केंद्रातून धूराचे लोट उठताना दिसत असल्याचा दावा युक्रेनियन अधिकार्‍यांनी केला आहे.

वोलोडिमीर झेलेन्स्की यांनी युक्रेनमधील अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला झाल्यानंतर त्यासंदर्भात तातडीचा व्हिडीओ संदेश जारी केला आहे. या संदेशामध्ये झेलेन्स्की यांनी जगाला गंभीर इशारा दिला आहे. “जर या अणुउर्जा केंद्रावर स्फोट झाला, तर तो सर्वांचा शेवट असेल. तो युरोपचा शेवट असेल. संपूर्ण युरोप रिकामा करावा लागेल, युरोपचा मृत्यू होऊ देऊ नका”, असे झेलेन्स्की म्हणाले आहेत.

युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्रो कुलेबा यांनी आगीनंतर युरोपातील सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पावरील हल्ले बंद करण्याचे आवाहन रशियन सैन्याला केले. “जर हा स्फोट झाला तर तो चेर्नोबिलपेक्षा १० पट मोठा स्फोट असेल! रशियन लोकांनी हे त्वरित थांबवलं पाहिजे,” असे ट्वीट कुलेबा यांनी केले.

रशियन सैन्यानं एनरहोदर शहरावर हल्ला केला. हे शहर झापोरिझ्झिया पासून अवघ्या काही अंतरावर आहे. झापोरिझ्झिया अणुऊर्जा प्रकल्पात ६ रिअॅक्टर्स आहेत. हे युरोपमधील सर्वात मोठे, तर पृथ्वीवरील नववे सर्वात मोठे रिअॅक्टर आहेत. सध्या रशिया या ठिकाणी मोर्टार आणि आरपीजीतून हल्ला करत आहे. अणुऊर्जा केंद्राच्या काही भागांमध्ये सध्या आग लागली असून रशियानं अग्निशमन दलाच्या गाड्यांवरही गोळीबार केल्याचं वृत्त काही माध्यमांनी दिलं आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -