भिवंडी (वार्ताहर) : भिवंडी शहरातील स्व. राजीव गांधी उड्डाणपूल भिवंडीच्या प्रथम नागरिक महापौर प्रतिभा विलास पाटील व भिवंडी महानगरपालिकेच्या आयुक्त डॉ. सुधाकर देशमुख यांनी हिरवा झेंडा दाखवून वाहनांसाठी खुला केला आहे.
या उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्यामुळे हा उड्डाणपूल मागील अनेक महिन्यांपासून दुरुस्तीसाठी बंद होता. मात्र आता हा उड्डाणपूल वाहनांसाठी खुला करण्यात आला आहे; परंतु कोट्यवधी रुपये खर्च करूनसुद्धा या उड्डाणपुलावरून अवजड वाहनांची बंदी असल्याने वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागणार हे निश्चित झाले आहे.
८ कोटींहून अधिक खर्च या उड्डाणपुलाच्या दुरुस्तीसाठी करूनही या उड्डाणपुलावरून अवजड वाहनांची वाहतूक पूर्ण होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना वाहतूक कोंडीतून थोडा दिलासा जरी मिळाला असला, तरी कोट्यवधी रुपये खर्च करूनसुद्धा या उड्डाणपुलावरून अवजड वाहनांची वाहतूक होत नसल्याने नागरिकांमध्ये व अवजड वाहनचालकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
उड्डाणपुलावर फक्त सिमेंट काँक्रेट व डांबरी रस्ते तयार करण्यात आले आहेत. कोणत्याही प्रकारची रंगरंगोटी या उड्डाणपुलाला केली नाही, असे दिसून येत आहे. या उड्डाणपुलाच्या दुरुस्तीनंतर हिरवा झेंडा दाखवत हा उड्डाणपूल खुला करण्यात आला आहे.
या वेळी महापौर प्रतिभा विलास पाटील, आयुक्त डॉ. सुधाकर देशमुख उपमहापौर इम्रान वली खान, अॅड. मयुरेश पाटील, जनसंपर्क अधिकारी मिलिंद पळसुले आदी उपस्थित होते.