मुंबई (प्रतिनिधी) : कोरोना विषाणूच्या १०व्या जनुकीय सूत्र निर्धारण चाचणीचे निष्कर्ष जाहीर करण्यात आले आहे. या १०व्या फेरीत ३७६ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यापैकी २३७ नमुने मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील होते, तर उर्वरित नमुने हे मुंबई मनपा क्षेत्राबाहेरील होते. मुंबई मनपा क्षेत्रातील २३७ नमुन्यांपैकी १०० टक्के अर्थात सर्वच्या सर्व २३७ नमुने हे ‘ओमायक्रॉन’ या उपप्रकाराने बाधित असल्याचे निदर्शनास आले असल्याची माहिती महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे देण्यात आली आहे.
दरम्यान या २३७ नमुन्यांमध्ये निष्कर्षांचे वयोगटानुसार विश्लेषण केले असता, २३७ रुग्णांपैकी २९ टक्के अर्थात ६९ रुग्ण हे २१ ते ४० या वयोगटातील आहेत, तर ४१ ते ६० या वयोगटात देखील २९ टक्के म्हणजे ६९ एवढेच रुग्ण आहेत. २५ टक्के म्हणजे ५९ रुग्ण हे ६१ ते ८० या वयोगटातील आहेत. १२ टक्के म्हणजेच २९ रुग्ण हे ‘० ते २०’ या वयोगटातील, तर ५ टक्के म्हणजे ११ रुग्ण हे ८१ ते १०० या वयोगटातील आहेत. चाचण्या करण्यात आलेल्या २३७ नमुन्यांमध्ये ० ते १८ या वयोगटातील २५ नमुन्यांचा समावेश होता. ज्यापैकी, ४ नमुने हे ० ते ५ वर्षे या वयोगटातील, ९ नमुने ६ ते १२ वर्षे या वयोगटातील, तर १२ नमुने १३ ते १८ वर्षे या वयोगटातील होते. हे सर्व नमुने ‘ओमायक्रॉन’ या कोविड विषाणूच्या उपप्रकाराने बाधित असल्याचे आढळून आले. तथापि, या रुग्णांना कोविड बाधा झाल्याची कोणतीही गंभीर लक्षणे दिसून आली नाहीत.
विशेष म्हणजे २३७ पैकी ६ रुग्णांनी लसीची केवळ पहिली मात्रा घेतलेली होती. यापैकी एका रुग्णास रुग्णालयात दाखल करावे लागले. लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या १२८ रुग्णांपैकी ७ रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले. यापैकी एका रुग्णास ऑक्सिजनची गरज भासली, तर एका रुग्णास अतिदक्षात विभागात दाखल करावे लागले. एकूण रुग्णांपैकी १०३ रुग्णांनी कोविड प्रतिबंधात्मक लसीची एकही मात्रा घेतलेली नव्हती. यापैकी १८ रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले, तर २ रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासली आणि एका रुग्णास अतिदक्षता कक्षात दाखल करावे लागले, अशी माहिती आरोग्य खात्याद्वारे देण्यात आली.
दिवसभरात ८० नव्या रुग्णांची नोंद
मुंबईत कोरोना नियंत्रणात असून गुरूवारी २४ तासांत ८० नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे, तर ११८ रुग्ण बरे झाले आहेत. दरम्यान सध्या मुंबईत ६५० रुग्ण सक्रीय आहेत. आजपर्यंत मुंबईत १०,३६,५०७ एवढे जण कोरोनामुक्त झाले आहेत. बरे झालेल्या रुग्णांचा दर ९८ टक्के आहे. रुग्ण दुपटीचा दर ५४४१ दिवस झाला आहे.