शेखर भोसले
मुलुंड : कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्याने शासनाची अनलॉक प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे; परंतु कोरोनाबाबत नागरिकांची चिंता कमी होऊ लागल्याने लसीकरण करून घेण्याचे प्रमाण सध्या घसरताना दिसत आहे. परिणामी लसीकरण केंद्र रिकामी पडल्याचे आढळून येत आहेत. लसीकरणातील जनतेची उदासीनता बघता मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दुःख व्यक्त केले असून लसीकरणाचे प्रमाण वाढवण्यासाठी या लसीकरण केंद्राचे मोबाईल लसीकरण युनिट कॅम्पमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले. तसेच जम्बो लसीकरण सेंटर्सबाबतही लवकरच निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.
ज्या लसीकरण केंद्राचे शिबिरात रूपांतर होत आहे, त्यांचा उपयोग महाविद्यालये आणि गृहसंकुलांमध्ये करण्यात येणार आहे. लसीकरण केंद्राचे कर्मचारी तेथे जाऊन शिबिराचे आयोजन करून विद्यार्थ्यांचे लसीकरण करतील. हीच प्रक्रिया गृहसंकुलातही केली जाणार आहे. ज्या सोसायट्यांमध्ये किशोरवयीन व इतर नागरिक मोठ्या प्रमाणात लसीकरणाविना आहेत, तेथे लसीकरण शिबिरे आयोजित करण्यात येणार असल्याचे काकाणी यांनी सांगितले.
ज्या लसीकरण केंद्राचे मोबाइल लस युनिटमध्ये रूपांतर करण्यात आले आहे, ते युनिट दिवसभर परिसरात फिरून उर्वरित लोकांना लसीकरण करतील, असे काकाणी म्हणाले.