ठाणे (प्रतिनिधी) : मध्य रेल्वेच्या मार्गातील रहिवाशांना रेल्वेचे अधिकारी घरे खाली करण्यासाठी धमकावत असल्याने “उद्या रेल्वे बंद पडल्यास दोष देऊ नका,’ असा इशारा डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी रेल्वेमंत्री अश्विनीकुमार, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि रेल्वे अधिकाऱ्यांना दिला आहे.
डॉ. जितेंद्र आव्हाड आणि खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांना दिलेल्या आश्वासनाचे काय झाले, असे म्हणत “गरीब की जान क्या जान नही होती शेठ?” असा सवालही गृहनिर्माणमंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर केला आहे.
दिव्याच्या पाचव्या आणि सहाव्या लाईनच्या उद्घाटनासाठी रेल्वेमंत्री अश्विनी कुमार, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे ठाण्यात आले होते. त्यावेळी गृहनिर्माणमंत्री ना. जितेंद्र आव्हाड यांनी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांची भेट घेत रेल्वे लाईन लगतच्या रहिवाशांचे आधी पुनर्वसन करा, मगच ही जागा रिकामी करा, त्यासाठी राज्य सरकार म्हाडामार्फत या रहिवाशांना आजुबाजूच्या परिसरात नव्याने पुनर्वसन करून घरे देता येतील, त्यासाठी रेल्वेनेही सहकार्य करण्याची मागणी गृहनिर्माणमंत्री ना. डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केली होती. त्यावेळी रेल्वेमंत्री अश्विनीकुमार व रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनीही सकारात्मकता दर्शविली होती. तसेच जोपर्यंत रहिवाशांचे पुनर्वसन होत नाही, तोपर्यंत कारवाई होणार नाही, असे आश्वासन दिले होते.
मात्र रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आव्हाडांच्या मागणीला केराची टोपली दाखवत रेल्वे अधिकाऱ्यांना रेल्वे लाईन परिसरातील घरे खाली करण्याचे आदेश देत रहिवाशांना धमकावण्याचे सत्र सुरू केले आहे. त्यामुळे रहिवाशांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.