Saturday, December 14, 2024
Homeमहत्वाची बातमीकुलभूषण जाधव यांच्यासाठी वकील नियुक्त करा

कुलभूषण जाधव यांच्यासाठी वकील नियुक्त करा

पाकने भारताला सुनावले

इस्लामाबाद : पाकिस्तानमधील इस्लामाबादच्या हायकोर्टाने काल गुरुवारी भारताला कुलभूषण जाधव यांच्यासाठी १३ एप्रिलपर्यंत वकील नियुक्त करण्यासाठी सांगितले आहे. यानंतर पाकिस्तानकडून जाधव यांना दिली गेलेली मृत्यूच्या शिक्षेवर पुन्हा एकदा चर्चा करण्यात येईल. भारतीय नौसेनेचे सेवानिवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांना एप्रिल २०१७ मध्ये हेरगिरी आणि दहशतवादाच्या आरोपाखाली पाकिस्तानी सैन्याच्या कोर्टाने मृत्यूची शिक्षा सुनावली होती.

भारताने या शिक्षेला आव्हान देण्यासाठी पाकिस्तानविरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. दोन्ही पक्षांची बाजू ऐकल्यानंतर हेगमधील कोर्टाने जुलै २०१९ मध्ये असा निर्णय दिला होता की, पाकिस्तानने जाधव यांना भारताच्या काऊन्सिलरसाठी परवानगी द्यावी आणि त्यांना दिलेल्या या मृत्यूच्या शिक्षेवर पुनर्विचार करावा.

इस्लामाबाद हायकोर्टाने ऑगस्ट २०२० मध्ये मुख्य न्यायाधीश अतहर मिनल्लाह, न्यायमूर्ती अमीर फारुक आणि न्यायमूर्ती मियांगुल हसन औरंगजेब यांच्या तीन सदस्यीय पीठाची नियुक्ती केली होती. त्यांनी वारंवार भारताला जाधव यांच्यासाठी पाकिस्तानमधून एक वकिल नियुक्त करण्यास सांगितले होते. मात्र, भारताने वारंवार भारतीय वकीलांची नियुक्ती करण्याची संधी देण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

पाकिस्तानचे अटॉर्नी जनरल खालिद जावेद खान यांनी भारतीय पक्षाची बाजू ऐकल्यानंतर कोर्टाने गुरुवारी भारताला जाधव यांच्यासाठी १३ एप्रिलपर्यंत वकील नियुक्त करण्यास सांगितले आहे. तसेच खान यांनी कोर्टाला म्हटले होते की, भारत जाणीवपूर्वक या प्रकरणी उशीर करत आहे. जेणेकरुन त्यांना पुन्हा आंतरराष्ट्रीय कोर्टामध्ये धाव घेता येईल आणि पाकिस्तानविरोधात तक्रार करण्याची खोड काढता येईल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -