मॉस्को : गेल्या आठ दिवसांपासून रशिया आणि युक्रेन या दोन देशांमध्ये युद्ध सुरु आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांची सुटका भारत सरकारच्या ‘ऑपरेशन गंगा’अंतर्गत करण्यात येत आहे. तसेच दुसऱ्या बाजूला या दोन्ही देशांमध्ये शांतता चर्चा देखील सुरु झाली असून त्या चर्चेची दुसरी फेरी नुकतीच पार पडली आहे. युक्रेनशी संबंधित परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.
युक्रेनच्या खार्किव आणि सुमी या शहरातून भारतीय विद्यार्थी आणि इतर परदेशी लोकांना रशियाच्या बेल्गोरोड प्रदेशात नेण्यासाठी १३० रशियन बसेस तयार आहेत, अशी माहिती रशियाचे राष्ट्रीय संरक्षण नियंत्रण केंद्राचे प्रमुख कर्नल जनरल मिखाईल मिझिनत्सेव्ह यांनी गुरुवारी दिली असल्याचे रशियन न्यूज एजन्सी टीएएसएसने म्हटले आहे.