Tuesday, July 16, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यदेशाच्या उद्योग मंत्रालयाची गंगा कोकणात...!

देशाच्या उद्योग मंत्रालयाची गंगा कोकणात…!

संतोष वायंगणकर

फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कोकणात देशाच्या सूक्ष्म, लघू आणि मध्यम विभागाच्या मंत्रालयांतर्गत येणाऱ्या विभागानी मेळावा, मार्गदर्शन आणि प्रदर्शन या माध्यमातून कोकणातील जनतेसाठी एक मोठं दालन निर्माण केलं आहे. पूर्वी ‘‘दिल्ली तो बहोत दूर है’’ असे म्हटले जायचे; परंतु केंद्रीय सूक्ष्म, लघू, मध्यम विभागाचे मंत्री नारायण राणे यांनी केंद्रात केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर कोकणातील, महाराष्ट्रातील लोक मोठ्या प्रमाणावर दिल्लीला नारायण राणे यांची सदिच्छा भेट घेऊन आले. कोकणातील तर शेकडो लोक जाऊन आले. आजवर फार दूर वाटणारी दिल्ली फारच जवळ वाटू लागली. दिल्लीलाही कोकण आपलसं वाटू लागलं. म्हणूनच की काय २४,२५,२६ असे तीन दिवस कोकणात सूक्ष्म, लघू, मध्यम मंत्रालयाचे सर्व वरिष्ठ अधिकारी कोकणात आले. उच्च आणि अतिउच्च दर्जाचे हे ६० अधिकारी कोकणात आले. काथ्या उद्योगाचे क्षेत्रीय कार्यालयही कोकणात सुरू झाले. आता खऱ्या अर्थाने आपली जबाबदारी वाढली आहे. जेव्हा देशाचे उद्योग मंत्रालय आपल्या कोकणात येते तेव्हा कोकणवासीयांनी अधिक जबाबदारीने कोकणात उद्योग निर्मिती कशी होईल हे पाहिले पाहिजे. कोकण हे देशातील उद्योग क्षेत्रात प्रथम क्रमांकावर असावं, असा प्रयत्न यातून होऊ शकतो. सगळ्याच विषयांची मोजणी आणि माप काढण्याची मानसिकता किमान इथे तरी कोणी डोकावू देऊ नये. कोकणातील जनतेची मानसिकता ही अतिचिकित्सक आहे. चिकित्सक असण्यात काही गैर नाही; परंतु चांगल्या कामाच्या आड येणारी किंवा चांगल्या कामाचा अपशकुन करणारी मानसिकता नसावी. पहिले कोकणात उद्योग मंत्रालयाच्या माध्यमातून उद्योगांचे जाळे निर्माण करा. कोकणात उद्योग मोठ्या प्रमाणावर होऊ देत आणि मग अनेक उद्योजक एक श्रीमंतांचं जाळ निर्माण झालं की, मग स्पर्धा होऊ दे. राजकारणही करा, पण आता यातलं काही नको उभ राहण्यापूर्वीच मोडून टाकण्याची कुंपमंडुकवृत्ती बदलणार केव्हा. गेल्या तीन दिवसांत पश्चिम महाराष्ट्रातील अनेकांनी या उद्योग मार्गदर्शनात सहभाग घेऊन त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधला. महाराष्ट्रातील इतर भागांतील तरुण कोकणात, सिंधुदुर्गात येऊन सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. कोकणातीलही तरुणांनी सहभाग घेतला; परंतु दुर्दैवाने ज्या प्रमाणात यात सहभागी होणे आवश्यक होते, त्या प्रमाणात तसे काही घडले नाही. ते घडायला हवे होते. याचच नव्हे तर प्रत्येक बाबतीत असेच असते. कोकणी माणूस नको त्या गजालींमध्ये नको तितका रमतो ते त्यातल चांगलं आहे. आपल्या हिताचं आहे त्याचा विचार करून त्याचा आपण जास्तीत-जास्त लाभ कसा घेऊ शकतो, असा सकारात्मक विचार केला पाहिजे; परंतु दुर्दैवाने असा विचार करणाऱ्यांची संख्या ही फार नगण्य आहे. या तीनदिवशीय उद्योगवाढीसाठीच्या खऱ्या अर्थाने जे प्रयत्न झालेले आहेत, त्यात आपण कुठे? याचा शोध आपणच घेतला पाहिजे. ज्यांना ज्या गोष्टींचे राजकारण करावयाचे असेल, त्यांना ते करू द्यावे; परंतु खरोखरीच ज्यांना या अशा संधीच सोनं करण्यात स्वारस्य आहे, अशांनी मात्र यात प्रामाणिक प्रयत्न करायला पाहिजेत. अशा संधी वारंवार उपलब्ध होत नाहीत. एवढं सारं उद्योग विश्व आपणासमोर उभं केल्यानंतरही जर आपण… यांनी काय केलं? म्हणून जर प्रश्न उपस्थित करत असू तर ते आपल दुर्दैव आहे.

खादी व ग्रामोद्योग, काथ्या उद्योग यामध्ये माणसं उभं करण्याची ताकद आहे. फक्त आपली प्रामाणिक कष्टाची तयारी हवी. कोणताही उद्योग व्यवसाय उभा करताना प्रामाणिक कष्टांची तयारी हवी. या तीन दिवसांत देशभरातील विविध राज्यांतील असे काही उद्योगी समोर आले की, कुणालाही आश्चर्य वाटल्यावाचून राहावत नाही. अळंबीच्या उत्पादनातून ७००० कुटुंबांना रोजगार निर्मिती झाली हे हिमाचल प्रदेशमधील एका तरुणीने किमया घडवली. आपणच आपल्या कार्य कर्तृत्वाचा परिघ प्रामाणिक कष्टातून वाढवला पाहिजे. काहीही प्रयत्न न करता आपल्याकडे काही होणार नाही, असे म्हणणे योग्य ठरणारे नाही. प्रयत्न महत्त्वाचे आहेत. उद्योग विश्वातील भरारी ही सहज सोपी नसते; परंतु ती अवघडही नसते. योग्य नियोजन, अपार कष्ट या जोरावर उद्योग विश्वात स्वत:च वेगळेपण सिद्ध करता येऊ शकते. वीस वर्षांपूर्वी कोकणात पर्यटनाचा विषयाची चर्चा व्हायची तेव्हा कोकणात पर्यटनासाठी कोण येणार? असा प्रश्न उपस्थित केला जायचा; परंतु आज गोव्यापेक्षाही पर्यटक सिंधुदुर्गला पसंती देतात. पर्यटनाची ही किमया काही एका दिवसातली नाही. पंचतारांकित पर्यटनाला सतत विरोध करणाऱ्यांनी कधी पर्यटन व्यवसायातून काय घडू शकते, याचा साधा विचारही केला नाही आणि काही समजूनही घेतले नाही. मात्र तेव्हा ताज, ओबेरॉय या पंचतारांकित हॉटेल उभारणीला विरोध करत राहिले. जे विरोधात बोलतात, विरोध करतात त्यांचा विकासात वाटा शून्य असतो; परंतु विरोध करणे, टीका करणे एवढेच त्यांचे राजकीय भांडवल असते. त्यामुळे स्वत: काहीही उभं करायचं नाही; परंतु कोण काही प्रयत्न करीत असेल, तर त्याला नावं ठेवायची, हा दुर्दैवाने कोकणचा मानवी स्वभाव आहे. कोकणात जर शेजाऱ्याने कार घेतली, तर त्या शेजाऱ्याने घेतलेल्या गाडीतून आपणाला वेळप्रसंगी केव्हाही प्रवास करता येईल, असा विचार करता ती गाडी घ्यायला पैसे कुठून आणले. बँकेला थकवले की, कुणाला फसवले असा नकारात्मक कुपमंडुकवृत्तीचा विचार केला जातो. दुर्दैवाने हे वास्तव बदललं तरच आपली प्रगती होऊ शकेल. नकारात्मकतेच्या विचारातून आपण बाहेर पडण्याची आवश्यकता आहे, तरच उद्योगी प्रयत्नांचा खऱ्या अर्थाने उपयोग होऊ शकेल.

santoshw2601@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -